
कोरोना तपासणीसाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु
मुंबई : कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातलेला असतानाच, शुक्रवारी मुंबईत दोन कोरोना विषाणू संशयित रुग्ण आढळले असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे. हे दोघे संशयित रुग्ण चीनहून मुंबईत दाखल झाले आहेत. चीनमध्ये अनेक भारतीय या विषाणूच्या साथीमुळे अडकले आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने चिचंपोकळीतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या कक्षामध्ये कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून इथेच त्याच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत, असे मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.
चीन मधून मुंबईत आलेल्या या दोन संशयित रुग्णाला खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे डॉ. केसकर यांनी सांगितले. चीनहून मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरलची काही लक्षणे आढळल्यास त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना विमानतळावरील डॉक्टरांना करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.
कोरोना व्हायरसची लागण झाल्याने चीनमध्ये आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप येणे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे अशी लक्षणे आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.