रंग आणि अंतरंग...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याचा रंग बदलला आणि तो चर्चेचा विषय झाला. खरे तर भगवा रंग अनेक ठिकाणी वापरला जातो. प्रथमतः भगवा ध्वज हा हिंदुत्वाचा आहे. हिंदुस्थानवरील मुघल राजवट उलथवून टाकण्यासाठी शिवछत्रपतींच्या मावळ्यांना ज्या ध्वजापासून प्रेरणा मिळत असे, तोच हा भगवा ध्वज. तोच ध्वज पुढे हिंदुस्थानातल्या गडकोट-किल्ल्यांवर डौलाने फडकत राहिला आणि अजूनही फडकतो आहे. तसाच तो हिंदुस्थानात मंदिरांवरही फडकलेला आपल्याला दिसतो. ध्वजाचा तोच रंग पुढे अनेक संस्था-संघटनांनी स्वीकारला. शौर्याचे आणि निष्ठेचे प्रतीक अशी त्या रंगाला प्रतिष्ठा मिळाली. सर्वत्र भगवा फडकू लागल्यानंतर संघटनांची ओळख म्हणून त्यावर चिन्हे झळकू लागली. ध्वजाचा रंग तोच, पण त्या चिन्हातून त्यांचे अंतरंग डोकावू लागले. उदाहरणच द्यायचे झाले तर मराठा क्रांती मोर्चाच्या ध्वजावरही शिवरायांची प्रतिमा झळकू लागली. त्याचबरोबर 'एक मराठा, लाख मराठा' म्हणत त्यात निर्धाराची वज्रमूठही उमटू लागली. अशाप्रकारे अनेक संघटनांनी त्यांची प्रतीके ध्वजावर उमटवली. शिवसेनेनेही मराठी माणसांची संघटना म्हणून भगवा ध्वजच हाती घेतला आणि कार्यकर्त्यांना मावळ्यांची उपमा दिली. 'जय भवानी, जय शिवाजी' चा त्यांनीही गजर केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निळ्या-हिरव्या रंगासह सर्वसमावेशक भगवा ध्वज स्वीकारला आणि १४ वर्षांनंतर बदल करत राजमुद्रेसह पूर्ण भगवा रंग असलेला पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून अनावरण केले. त्यावरून शिवसेना आणि मनसेत शेरेबाजी सुरू झाली आहे. हिंदुत्वाची आस असलेल्या भाजपची साथ सोडून शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची कास धरली आणि हिंदुत्वापासून काहीशी दूर गेली. त्यावरून "झेंड्याचा रंग बदलला म्हणून भूमिका बदलणारे आम्ही नव्हे, रंग बदलून सरकारमध्ये जाणारे आम्ही नव्हे," असा टोला राज यांनी उद्धवना लगावला, तर "ना आमचा रंग बदलला, ना अंतरंग बदलले. शिवसेनेचा रंग भगवा होता आणि भगवाच आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले. सभांतून वाग्बाण सोडणे ठीक, पण देशापुढील कठीण प्रसंगात अंतरंग भगवे ठेवले तर ते देशहिताचे ठरेल, हे लक्षात ठेवावे म्हणजे झाले.

 

सतर्क राहा...!

 

केंद्र सरकारने तिहेरी तलाक प्रकरणी घेतलेला निर्णय, काश्मीरमधील रद्द केलेले कलम ३७०, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने दिलेला निर्णय, अशा काही निर्णयांवरून मानवतेचा अंश नसलेले आणि राष्ट्रद्रोही मुसलमान देशात पुन्हा अशांतता माजवू शकतात, याबाबत राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनात काही गोष्टी उघड केल्या. केंद्र सरकारने संमत केलेल्या 'एनआरसी', 'सीएए' कायद्याला येथील मुस्लिमांचा विरोध नाही. पण, बाहेरून आलेल्या राष्ट्रद्रोही शक्ती या कायद्यांना विरोध असल्याचे भासविण्यासाठी मोर्चे काढून देशांत अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी संयम राखत मोर्चे हाताळल्याने त्यांचा उद्देश सफल झाला नाही. पोलिसांच्या कामगिरीची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रशंसा केली आहे. मात्र, 'सीएए' आणि 'एनआरसी'च्या विरोधात ज्यांनी मोर्चे काढून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, अशा शक्तींविरोधात ९ फेब्रुवारी रोजी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून मनसे जशास तसे उत्तर देणार आहे. रझा अकादमीने काढलेल्या मोर्चाने आझाद मैदान परिसरात केलेल्या हिंसक कृत्यांना राज ठाकरे यांनीच मोर्चा काढून उत्तर दिले होते. आताही बाहेरच्या शक्ती येऊन येथील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबाबत पोलिसांनी खरेच सतर्क राहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर राष्ट्रहिताला प्राधान्य देत केंद्र सरकारमार्फत काही कडक पावले उचलली जात आहेत, त्याला राजकीयदृष्ट्या विरोधकांनी समर्थन दिले नाही तरी, जाहीर विरोध करून राष्ट्रद्रोही शक्तींना पाठबळ तरी देऊ नये. आज अनेक ठिकाणी उभे राहणारे बेकायदा मोहल्ले राष्ट्रद्रोह्यांचे अड्डे बनत आहेत. काही ठिकाणे अशी आहेत की, मौलवी येथे जाऊन काही कट रचत असण्याचा संशय आहे. अशा वेळी पोलिसांना खरेच मोकळेपणा दिला पाहिजे. सद्यस्थितीत राज्यात २ लाख, २५ हजार पोलीस कर्मचारी आहेत. पण, ती संख्याही अपुरी आहे. उद्या युद्धाची वेळ आल्यास पोलिसांना अंतर्गत शक्तींबरोबरच लढावे लागेल. राज्य सरकारतर्फे आठ हजार पोलीस कर्मचार्‍यांची भरती प्रस्तावित आहे. मात्र, त्यासाठी मुहूर्त शोधत राहू नये. सतर्कता आणि तत्परता महत्त्वाची आहे.

 

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@