सामाजिक स्वास्थ्य जपणारे उडान फाऊंडेशन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020   
Total Views |


asf_1  H x W: 0

 


नागरीकरण झालेल्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या समाजव्यवस्थेचे स्वास्थ्य जपले जाणे, हे आज एक मोठे आव्हान आहे. समाजात वाढणारी व्यसनाधीनता, ढासळणारे आरोग्य, अस्वच्छता, गरिबी, अनाथ मुलांचे प्रश्न अशा अनेक बाबी समाजव्यवस्थेत प्रश्नचिन्ह होऊन उभ्या ठाकल्या आहेत. विविध सामाजिक संस्था, शासन यांच्यामार्फत या प्रश्नांचे निराकरण होण्याकरिता कार्य केले जात असते. मात्र, अनेकदा यासंबंधीचे कार्य हे शहरी भागात होताना दिसत असले तरी, ग्रामीण भागांत होणारे हे कार्य फारसे दृष्टीपथात येत नाही. शहरी व्यवस्थेपासून भौगोलिकदृष्ट्या दूर आणि नाशिकपासून जवळपास ३० किमी अंतरावर असलेल्या सिन्नर येथे उडान फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य जपण्याचे आणि निर्माण करण्याचे कार्य केले जाते.


उडान फाऊंडेशनबाबत माहिती देताना फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी सांगितले की, "फाऊंडेशनची स्थापना करताना डोळ्यासमोर समाजातील गरीब, अनाथ, मुलेमुली यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी तसेच मुलांमध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता, स्वच्छता आदी विषयांवर प्रत्यक्ष काम या माध्यमातून करता येईल, हा उद्देश ठेवून संस्था सुरू करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात तालुक्यातील शाळेत जाऊन अनाथ, गरीब मुलांची माहिती घेतली जाते. त्यांना हवी असलेली मदत लक्षात घेऊन त्या मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, पादत्राणे आदी वस्तू पुरवल्या जातात. याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविली जाते. विशेषत: महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखराची स्वच्छता मोहीम राबविताना पायथ्यापासून शिखराच्या शेवटच्या टोकापर्यंत साधारण ५० ते ६० फुटांच्या अंतरावर संस्था कचरा बॅग लावत असते व भाविक आणि पर्यटकांना कचरा इतरत्र न टाकता या कचरा बॅगेत टाकण्याची विनंती शिखर मार्गावर विविध ठिकाणी फलकाद्वारे केली जाते. विशेष म्हणजे या मोहिमेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतो व जमा झालेला कचरा पर्यटक व गावकरी देशसेवा म्हणून शिखरावरून खाली आणून ग्रामपंचायतीकडे जमा करतात. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येते. या मोहिमेमुळे कळसूबाई शिखरावर वाऱ्याने इतरत्र पसरणाऱ्या कचऱ्याचे नियंत्रण होणे शक्य झाले आहे.

 

हे काम प्रत्यक्ष सुरू केल्यावर अनेकांनी टिंगलटवाळी सुरू केली. आपला व्यवसाय करायचा सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग कशाला करतात, अशा प्रकारच्या उपहासासदेखील शिंदे यांना सामोरे जावे लागले. परंतु शिंदे यांच्या मनात एकच विचार सुरू होता की, ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि त्या समाजाला आपण काहीतरी दिले पाहिजे. काम करताना नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा अधिक जोमाने काम करण्यास नवी ऊर्जा प्रदान करत असल्याची भावना यावेळी शिंदे आवर्जून व्यक्त करतात. प्रत्येक नवीन वर्षाला काहीतरी नवीन संकल्प करायची सवय शिंदे यांना आहे. त्यांनी जानेवारी २०१७ पासून एक नवीन संकल्प केला. त्यानुसार त्यांनी आपल्या चहाच्या दुकानात एक पेटी ठेवली आणि यात आपल्या व्यवसायाची पहिली बोहनी कितीही असो उदा. १ रु, असो की, १००० रु. असो त्या पेटीत टाकण्यास सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाला अनेकांची साथ मिळाली. याचवेळी लहान वयात शौर्य गाजविणाऱ्या बालकांना शासनाच्या वतीने बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाते, हे शिंदे यांनी जाणले. मात्र, हा बालशौर्य पुरस्कार हा फक्त राष्ट्रपती देत असतात, परंतु ज्या मुलांचे शौर्यकार्य राष्ट्रपतींपर्यंत पोहोचत नाही, त्यांचे काय, हा प्रश्न शिंदे यांना सतावू लागला. अशा ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांनी केलेले अतुलनीय काम इतरांना प्रेरणादायी ठरावे, हा एकमेव उद्देश ठेऊन शिंदे यांनी उडान फाऊंडेशनच्या माध्यमातून बाल शौर्य पुरस्कार देण्यास सुरुवात केली.

 

पुरस्कार देण्यासाठी प्रथम वृत्तपत्रातून पुरस्कारासाठी पात्र मुलांची माहिती मागवली जाते. नंतर त्या माहितीची सत्यता तपासली जाते. यासाठी पात्र उमेदवार हा 18 वर्षांच्या आतील असावा, वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण, कुठे सत्कार झाला असल्यास ते फोटो, गावातील सरपंच, नगरसेवक, शाळेचे मुख्याध्यापक आदींचे पत्र इत्यादी निकष या पुरस्कारासाठी लावण्यात आले आहेत. आजपर्यंत या पुरस्काराच्या माध्यमातून शिंदे यांना पाच शौर्य गाथा ऐकण्यास मिळाल्या असून त्यात तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे. या मुलांचे मनोगत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहत असल्याचे शिंदे सांगतात. अशा शौर्यवान मुलांचा सन्मान करण्याचे भाग्य आमच्या संस्थेला मिळाले, त्यामुळे उडान फाऊंडेशन स्वतःला धन्य समजत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. शिंदे यांच्या या कार्यातून इतर मुलांनादेखील प्रेरणा मिळाली. समाजाचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक असला तरी हवे तेवढे प्रोत्साहन मिळताना दिसत नाही, याची खंत वाटत असल्याचेदेखील शिंदे नमूद करतात. यासाठीच उडान फाऊंडेशन मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बाल शौर्य पुरस्कार देत असते. संस्था भविष्यात मुलांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता तसेच मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारा मोबाईलचा अतिवापर याबाबतही ते जनजागृती करणार आहेत. तसेच आगामी काळात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. या कार्यात भरत शिंदे यांना संदीप चौधरी, बाळासाहेब खैरनार, रामहरी सिरसाठ, राजेश गायकवाड, भाऊसाहेब शेळके, सत्यजित कळवनकर, घनश्याम शिंदे, डॉ. सुधीर कुशारे, दत्ता गोजरे, प्रमोद दुबे, शिवाजी घुगे, शाम गवळी, सोमनाथ आव्हाड, सूर्यभान धाकराव आदी कार्यकर्ते मोलाची साथ देत आहेत. 'मानवसेवा हीच ईश्वरसेवा' या ब्रीदानुसार कार्य करणारे उडान फाऊंडेशन सामाजिक स्वास्थ्य निर्माण करण्यात आणि जपण्यात आगामी कळात नक्कीच मोठे उड्डाण घेईल, यात शंका नाही.

 
 
@@AUTHORINFO_V1@@