विपश्यना अक्षरांची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबईतील विलेपार्ले येथील 'लोकमान्य सेवा संघ' या सुप्रसिद्ध संस्थेतर्फे सुप्रसिद्ध अक्षररचनाकार व जाहिरात तज्ज्ञ सुनील धोपावकर यांच्या बोलक्या अक्षरांचे प्रदर्शन दि. ८ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या दरम्यान लोकमान्य सेवा संघ, गोखले सभागृह, राममंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे. 'एक्स्प्रेसिव्ह टायपोग्राफी' या विषयावरील मुंबईतील हे पहिले प्रदर्शन असून सर्वांसाठी विनामूल्य आहे. वरील कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे. त्यानिमित्ताने धोपावकर यांच्या अद्भुत अक्षरकलेचा आविष्कार चितारणारा हा लेख....


इगतपुरी या नाशिकच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारी असलेले शहर विपश्यना केंद्रामुळे जगाच्या नकाशावर आलं. 'विपश्यना' अर्थात 'चांगले पाहण्यास शिकणे.' दहा दिवसांचा हा मनःशांतीचा मार्ग दर्शविणारा आध्यात्मिक विधी हवं तर उपचार म्हणा, समाजातील घटनांकडे सकारात्मकतेने पाहण्याची कला किंवा वाईट घटनांना चोखाळत न बसता, त्यातूनही चांगलं काहीतरी शोधून स्वतःच्या मनाच्या शांततेचा भंग होऊ न देण्याची क्रिया या केंद्रामध्ये शिकवली जाते. अचूक, कमीत कमी परंतु आशयगर्भ सुसंवादाने व्यक्तित्त्व बहरून येते. हे 'विपश्यना केंद्रा'कडून शिकवले जाते. हीच 'विपश्यना' याच इगतपुरीच्या कुशीतील एका जादुई कलाकाराने लौकिक अर्थाने अक्षरांच्या आशयाचा विचार करून, अक्षरांना अधिक सुलभ आकारात व्यक्त करुन प्रथम आकारांनी आणि नंतर अक्षरयुक्त शब्दांनी समोरच्यालाच बोलायला, डोलायला अन् स्तंभित व्हायला लावलं आहे. हे वाक्य इतकं मोठं लिहिलं तरी त्या कलाकाराच्या आशयाबद्दल अक्षरांनी युक्त शब्दांची महती सांगता येत नाही. सुनील धोपावकर यांच्या 'अक्षरशिल्पां'चे यश असावे, असचं मला वाटतं. 'अक्षरशिल्प' हा शब्द एवढ्यासाठीच योजला की, 'शिल्प' म्हणजे 'दगड-पाषाण.' 'इण्डॉलॉजी' सांगते की, 'पाषाण' म्हणजे 'दगड.' हा नैसर्गिक घटक ९० लाख वर्षे जगतो. पुढे त्याची माती होते. येथे सुनील यांची अक्षरे ही त्यांच्या थाटात संस्कारीत झालेल्या रूपात प्रकट झालेली आहेत. पाहणारा ती विसरूच शकणार नाही, अशा त्यांच्या रचना असतात.

 

भारतीय शास्त्रीय संगीतात 'घराणा'शाही असते. (राजकारणातील 'घराणेशाही' येथे अभिप्रेत नाही.) 'किराणा घराणा', 'घागरा घराणा', 'ग्वाल्हेर घराणा' वगैरे... आता अशा प्रकारची अक्षरकलेतही 'घराणी' निर्माण होऊ लागली आहेत, असे म्हणावसे वाटते. 'कमल शेडगे' यांचे घराणे किंवा पुण्याला बाबू उडपी घराणे, तसे सुनील धोपावकर घराणे! यांच्या अक्षराकारांची प्रचलित कथित स्वभावानुसार कुणी नक्कल वा चौर्यकर्मात्मक 'कॉपी' केली, तर कुणाही व्यक्तीच्या ध्यानात येईल की, सदर 'नक्कलाकारा'ने 'धोपावकर घराण्या'ची नक्कल केली आहे वा 'कमळ शेडगें'च्या शैलीची नक्कल केली आहे. इतके 'उत्तर ध्रुवीय बेसमेंट' असलेले काम 'अक्षराकार', 'चित्रकार', 'अक्षर संकल्पनाकार', 'उपयोजित कलाकार' अशा इगतपुरीच्या, परंतु जगभर पोहोचलेल्या सुनील धोपावकर यांनी करून ठेवलेले आहे. सुदर्शनधीर, लिपीमहर्षि आर. के. जोशी अशी नावे अक्षरे, अक्षरे प्रतीके, चिन्हे (अक्षरविरहित आदर्श-आशयगर्भ या अर्थाने अभिप्रेत समजावे.) वगैरे विषय जेव्हा चर्चेत येतात तेव्हा 'मैलाच्या दगडा'प्रमाणे येतातच येतात. सुनील धोपावकर यांचे नाव अशाच एका 'मैलाच्या दगडा'प्रमाणे कला जगताला, मराठी वा देवनागरी साहित्य वेदीवर कोरले गेलेले आहे.

 

उंच, गुबगुबीत, स्टार्टअप, करंट बुलेट, इंजेक्शन, डोळे, चित्रकार, तांडव, व्यसन, गणपती, नो एन्ट्री, बुद्धिबळ, कैची, नळ, बुडबुडे, काँक्रिट, बेडूक अशा अनेक 'शब्दांना' त्यांनी अगदी 'अबोल'पणे आकारबद्ध केले आहे. 'अबोल' हा शब्दप्रयोगही एवढ्याचसाठी की, ही शब्दाकारांची संकल्पना जेव्हा 'सामनेवाला' पाहतो, तेव्हा तो स्तंभित होतो, थक्क होतो, 'धोपावकर घराण्या'च्या मायाजालात कैद होतो, अगदी अबोल होतो. सुमारे साडेतीनहून अधिक तपे या महा-अक्षरमानवाने अक्षरांवर तपश्चर्या केली आहे. समाजात जशा विविध जाती-प्रजाती आहेत, तशा अक्षरांमध्येही जाती आहेत. त्या जातींना 'फॉन्ट' म्हणतात. 'सुनील धोपावकर घराण्या'ने सुमारे ४२ वर्षांपासून मराठी भाषेत एक नव्हे, तर दोन नव्हे तब्बल ७० 'फॉन्ट्स'ची निर्मिती केली आहे. आपल्याकडे 'फिल्मी' जगतात वा क्रीडा जगतात (नाव मुद्दाम लिहीत नाही. परंतु, वाचकांच्या ध्यानात येतीलच) जर 'पद्म पुरस्कार' दिले जातात, तर आर. के. जोशीस, सुदर्शनधीर यांच्यासह कमल शेडगे वा सुनील धोपावकर यांचाही विचार 'पद्म' पुरस्कारांसाठी व्हायला हवा. वास्तविक चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील 'कलावंत' हे कोट्यवधी रुपये कमावून पडदा वा मैदान गाजवतात. देशासाठीच असतं म्हणा त्यांचं हे कार्य? परंतु, आमच्या या दृश्य कलाकारांचे काय? त्यांची दखल कोण घेणार? बरं. या पुरस्कारांना मिळण्या-मिळविण्यासाठी काही 'सिनिअर-बिनियर' असं पाहिलं जात नाही. मला तरी काय माहिती? परंतु, कुणीतरी मागे एकदा म्हणालं होतं, 'मनोज जोशी यांना 'पद्म पुरस्कार' मिळालाच ना...!' मग आमच्या चित्र-शिल्प व उपयोजित कला क्षेत्रातील अशा कलाकारांसाठी मिळायलाच हवा. नाही का...! असो.

 

आपल्या मराठीइतकी समृद्ध-सार्वभौम आणि सर्वाशय (सर्व आशय युक्त) अशी क्वचितच इतर भाषा आढळेल. इंग्रजी तर मुळीच नाही. या मराठी अर्थात देवनागरी लिपीच्या, लेखनपद्धतींच्या मर्यादांची त्रुटी दूर व्हावी, यासाठी सुनील धोपावकर यांची धडपड आणि तळमळ सुरू आहे. भाषेतील आशय शब्दांच्या माध्यमातून थेट वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अक्षरे करतात. मग अक्षरांनाच सौंदर्याभिरुचीच्या विविध अलंकारांमध्ये बद्ध केले, तर अक्षरकलेचा विकास होईल, असे सुनील धोपावकर यांना वाटते. झाडूने वा आणखी कुठल्याशा 'टूल'ने तीच मुळाक्षरे, तीच व्यंजने फटकार्‍यांनी नाचवणे म्हणजे सौंदर्य नाही, तर त्या अक्षरांना 'तपस्विनी'प्रमाणे सजविणे म्हणजे सौंदर्य. 'मेकअप' उतरला वा उतरवला तर समोरची व्यक्ती ती हीच का, जिला आपण सौंदर्यवती मानत होतो, हा अनुभव प्रत्येकानेच घेतलेला असेल. मात्र, खानदानी देखणेपण, रुपसंपन्न नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी आरशाची गरज लागत नाही. असे सौंदर्य पाहताना मनात वासना जागृत न होता, पावित्र्यपूर्ण नैसर्गिक सुंदरतेचा साक्षात्कार होऊन स्वतःला विसरून जेव्हा आपण जातो, त्याला 'निखळ सौंदर्य' म्हणतात. धोपावकरांच्या अक्षरांमध्ये, अक्षर संकल्पनांमध्ये आणि अक्षरधारांच्या प्रवाहांमध्ये सौंदर्याची निसर्गदत्त झालर आहे. त्यांनी त्या प्रत्येक अक्षराकारात चिरंतन, निसर्ग शोधकार्य सुरू ठेवलं आहे, जणू विपश्यनाच, अक्षर सुलेखनांची...!!

 

- प्रा. गजानन शेपाळ

@@AUTHORINFO_V1@@