मुंबईचा 'वन अधिकारी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020   
Total Views |

tiger_2  H x W:


मुंबईसारख्या मोठ्या शहरातील हरित क्षेत्रात वन्यजीवांची जैवविविधताही तग धरून आहे. या समृद्ध परिसंस्थेची एका अर्थी जबाबदारी असलेले मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष श्रीपती कंक यांच्याविषयी...

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - मुंबईत टिकून असलेल्या हिरवाईमध्ये नांदणार्या वन्यजीवांचे व्यवस्थापन’ अर्थात ‘वनपरिक्षेत्र अधिकारी’ या पदाचा कारभार सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच! कारण, दाट लोकसंख्या असणार्‍या या शहरावर ’मानव-वन्यजीव’ संघर्षाचे सावट नेहमीच असते. मुंबईकरांचा माकड, साप, मगर, अजगर आणि बिबट्यांशी वरचेवर सामना होतच असतो. अशा परिस्थितीत उसळलेल्या जनक्षोभाला शांत करून वन्यजीवांच्या बचावाची जबाबदारी वन्यप्रेमी कार्यकर्त्यांसोबत वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍याचीही असते. गेल्या चार वर्षांपासून ही जबाबदारी एका तडफदार आणि मेहनती वन अधिकार्‍याच्या हाती आहे. या अधिकार्‍याची ’मानव-वन्यजीव’ संघर्ष व्यवस्थापनामधील कामगिरी लक्षात घेता, केंद्र सरकारने त्यांना इंडोनेशियामध्ये प्रशिक्षणकरिता पाठवले होते. मुंबापुरीतील ’मानव-वन्यजीव’ संघर्ष आणि त्यासंबंधीच्या गुन्ह्यांची कारवाई तडीस नेणारे वन अधिकारी म्हणजे संतोष कंक.

 

tiger_3  H x W: 
 

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील म्हसर गावात दि. २३ मार्च, १९७९ साली कंक यांचा जन्म झाला. त्यांचे वडील महसूल विभागात कार्यरत होते. त्यामुळे आपल्यालाही सरकारी नोकरी मिळावी, अशी कंक यांची इच्छा होती. बर्‍याच वेळा वन विभागात काम करू लागल्यानंतरच वन अधिकार्‍यांना निसर्गाची आणि खासकरून जंगलाची गोडी लागते. जबाबदारीच्या अनुषंगाने त्यांनी हाती घेतलेले वनसंवर्धनाचे काम त्यानंतर आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनते. कंक यांचा प्रवासही याच मार्गाने झाला. अगदी महाविद्यालयीन काळापर्यंत त्यांना निसर्गामध्ये काहीच रुची नव्हती. केवळ सरकारी नोकरी मिळण्याच्या दृष्टीने कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी वन विभागाच्या भरतीचा अर्ज भरला. २००४ साली ’वनपाल’ पदावर त्यांची वन विभागात निवड झाली. पुढे वर्षभर या पदाकरिता त्यांचे प्रशिक्षण झाले. २००५ साली ते वन विभागाच्या प्रादेशिक कक्षाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात ’वनपाल’ म्हणून रुजू झाले. लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने बर्‍याच वेळा उत्साही पर्यटक विनापरवाना राखीव वनक्षेत्रात प्रवेश करायचे. अशावेळी राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी कंक यांच्याकडे होती. शिवाय या परिसरात हरणाच्या शिकारीची प्रकरणेही उघडकीस आली. या परिस्थितीत आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम कंक यांनी केले.

 

tiger_1  H x W: 
 

साधारण वन अधिकार्यांना एका वनपरिक्षेत्रात तीन वर्षे काम करता येते. त्यानंतर त्यांची बदली होते. मात्र, कंक यांचे काम पाहून वन विभागाच्या तत्कालीन सचिव नीला सत्यनारायण यांनी त्यांना लोणावळ्यात काम करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली. २००४ ते २००९ दरम्यान लोणावळ्यात काम केल्यावर त्यांची बदली मुळशी तालुक्यातील पौड येथे झाली. पौड मध्ये एका नगरसेवकाच्या मुलाला व एका राष्ट्रीय नेमबाजाला लांडोर शिकार प्रकरणी त्यांनी अटक केली. त्यानंतर २०१२ मध्ये ते सिंहगड वनपरिक्षेत्रात कार्यरत होते. पाणशेतचा संपूर्ण परिसर त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत होता. वन विभागातील कंक यांचे १० वर्षांचे काम पाहून त्यांना २०१४ साली ’वनपरिक्षेत्र अधिकारी’ पदावर पदोन्नती मिळाली. कोकणातील म्हसाळा तालुक्यात ते ’वनपरिक्षेत्र अधिकारी’ म्हणून रुजू झाले. त्यावेळी या संपूर्ण परिसरात ’मानव-बिबट्या’ संघर्ष शिगेला पोहोचला होता. कारण, बिबट्या स्थानिकांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार मारत असल्याने बिबट्यांविरोधात जनक्षोभ उसळला होता. लोकांना वेळीच गुरांच्या मृत्यूची भरपाई मिळत नसल्याने लोकांमध्ये राग होता. कंक यांनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर तत्काळ पंचनामे करून लोकांना भरपाई दिली. तसेच या प्राण्यांविषयी जनजागृती केली. त्यामुळे लोकांच्या मनात बिबट्याविषयी असलेला राग निवळला. बिबट्यांप्रमाणेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाड्यांच्या संवर्धनासाठीदेखील त्यांनी काम केले.

 

tiger_1  H x W: 
 

२०१४ साली कंक यांची मुंबईच्या ’वनपरिक्षेत्र अधिकारी’ पदावर बदली झाली. आता मुंबईतील दाट लोकसंख्येत तग धरून बसलेल्या वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. चिकाटीने काम करण्याच्या वृत्तीने आजवर त्यांनी अनेक साहसी आणि आव्हानात्मक प्रकरणे हाताळली आहेत. २०१९ मध्ये गोरेगावच्या ’दादासाहेब फाळके चित्रनगरी’त घडलेला बिबट्या शिकारीचा प्रकार हा त्याचपैकीच एक. शिकार्‍याच्या सापळ्यामध्ये अडकून एका मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याने मुंबईतील वन्यजीव संवर्धनाचा मुद्दा अधिक संवेदनशील झाला होता. अशावेळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनांतर्गत कंक यांनी हे प्रकरण अगदी शिताफीने हाताळले. विभागातील इतर वन अधिकार्‍यांच्या मदतीने त्यांनी सापळा लावण्यार्‍या आरोपींना जेरबंद केले. त्यांनी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीवरदेखील समाजमाध्यमांवर साप हाताळतानाचे छायाचित्र टाकल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली आहे. शिवाय २५० परदेशी पशुपक्ष्यांच्या जप्तीची कारवाईदेखील त्यांनी पुढाकार घेऊन केली. मुंबईतील मानवी वसाहतीत शिरणार्‍या बिबट्यांच्या बचावकार्यातही त्यांचा सहभाग आहे. राज्य शासनाच्या वृक्षारोपणाच्या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कंक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या आजवरच्या या प्रवासात केंद्र सरकारकडून इंडोनेशियातील वन्यजीव संरक्षण व नियोजनासंबंधीच्या प्रशिक्षण शिबिरात झालेली निवड मानाचा तुरा आहे. त्यांना भविष्यातील वाटचालीकरिता दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

 
 
@@AUTHORINFO_V1@@