सावधान! मनसे आक्रमक होतेय्‌...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020
Total Views |
Careful Miceare aggressiv
 
 
सावधान! राज ठाकरेंची मनसे नव्याने आक्रमक होणाराय्‌! हो. ज्यांच्या अस्तित्वाची पाळंमुळंच आक्रमकतेत रुजलेली असल्याचा साक्षीदार सारा महाराष्ट्र राहिला, त्याच महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या जनतेला, तीच मनसेना नव्यानं चवताळून उठलेली बघायला मिळणार आहे. मराठी माणसांसाठीचा तो करारी बाणा, परप्रांतीयांविरुद्धचा निम्नस्तरीय लढा लढत झालेले ते खालच्या दर्जाचे राजकारण, गेल्या निवडणुकीच्या मुहूर्तावर केंद्रातल्या धुरिणांविरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सुपारी घेतल्यागत प्रचंड उत्साहात मांडलेला तो थयथयाट, त्यानंतरही मतपेट्यांमधून हाती आलेले धुपाटणे... या पार्श्वभूमीवर मध्यंतरीच्या काळात राजसाहेब अन्‌ त्यांचा पक्ष दिसलाच नाही कुठे. लोकसभेच्या निकालानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेप्रमाणेच त्यांचे नंतरचे गायब होणेही तितकेच ‘अनाकलनीय’ होते! साहेब कुठे गेले, असा प्रश्नही कुणाला पडला नव्हता इतके दिवस. निकालांनी परिस्थितीच तशी दयनीय करून ठेवली होती. पक्षाची अन्‌ साहेबांचीही! तरीही राज्याच्या राजकीय पटलावर त्यांची प्रतिक्रिया उमटली होतीच. 288 पैकी 110 जागा लढवून एका जागेवर विजयवीर पताका फडकाविणार्‍या पक्षाची प्रतिक्रिया महत्त्वाची होतीच शेवटी...
 
 
 
...तर सांगायचा महत्त्वाचा मुद्दा हा की, येत्या काळात याच मनसेचे अधिक आक्रमक स्वरूप मराठमोळ्या मातीला बघायला मिळणार आहे. तसा, त्यासाठीचा मुहूर्तही काढलाय्‌ त्या पक्षाच्या धुरिणांनी. ज्यांच्याशी आयुष्यभर लढले, त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून शिवसेनेने सत्तेसाठी जी स्वत:ची माती करून घेतली, त्यामुळे लोकांच्या मनात निर्माण झालेल्या रोषाचा राजकीय फायदा मनसेला मिळू शकतो का? शिवसेनेपासून दुरावलेला मतदार आपल्या बाजूने वळू शकतो का, याची चाचपणी करत असतानाच स्वत:ला एका वेगळ्या स्वरूपात लोकांसमोर सादर करण्याचा प्रयोगही हा पक्ष करणार आहे म्हणे! करा म्हणावं. तसेही राजकारणात काळानुरूप बदलावे लागते. मुद्यांची काहीशी धरसोड करावी लागते. जुनी टाकून नव्याची कास धरावी लागते. ते विचार, नीती, तत्त्व आदींची होळी तर काय, राजकारणातली अपरिहार्यता ठरतेय्‌ आजकाल. आता मनसेचेच बघाना, शिवसेनेतून बाहेर पडत वेगळी चूल मांडण्यापासून तर परवाच्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मदतीची ठरेल, अशी भूमिका साकारण्यापर्यंतचा प्रवास, विधानसभेतील 13चा आकडा एकावर येण्यापर्यंतचा प्रवास, मोदींवर स्तुतिसुमने उधळण्यापासून तर त्यांना शिव्यांची लाखोळी वाहण्याच्या कोलांटउडीपर्यंतचा प्रवास, गेल्या निवडणुकीत भाजपाला लाखभर शिव्याशाप देऊन झाल्यानंतर आता त्याच्यासोबतीने पुढील राजकीय प्रवासाची दिशा ठरवण्याच्या शक्यतेपर्यंतचा प्रवास... काळानुरूप बदलावे लागण्याच्या अपरिहार्यतेची हीच साक्ष असावी बहुदा.
 
 
 
गेल्या लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत मनसेचे राज ठाकरे नेमके काय करताहेत, ते नेमके कोणाच्या बाजूने बोलताहेत, त्यांच्या पक्षाची राजकीय भूमिका नेमकी उजवी का डावी, की अजून तिसरीच, असे कित्येक प्रश्न उपस्थित व्हावेत, असे अनाकलनीय वागणे राहिले राजसाहेबांचे. बहुधा म्हणूनच की काय पण, ‘लाव रे तो व्हीडिओ’ म्हणत गाजवलेल्या मोठमोठ्या जाहीर सभांमधून टाळ्या तेवढ्या मिळाल्या; पण ती गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होऊ शकली नाही, हेच वास्तव आहे. भीषण असले तरीही! त्याची कारणमीमांसा पक्षपातळीवर झाली असेल, त्यानंतर पक्षाच्या झेंड्यापासून तर अजेंड्यापर्यंत सार्‍याच बाबींवर पुनर्विचार होऊ घातला असेल, बाळासाहेबांच्या जन्मदिनी होणार्‍या अधिवेशनानंतर पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास त्यातून प्रतिध्वनित होणार असेल, तर तो राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचा पथदर्शी प्रवास ठरेल. अन्यथा पुन्हा एकदा भरकटलेपण मनसैनिकांच्या वाट्याला येणे क्रमप्राप्त आहे.
 
 
 
पहिल्या खेपेला पदरी पडलेल्या यशाची परिपाठी मनसेला नंतरच्या काळात कायम राखता आली नाही याचे कारण, त्या पक्षाच्या अस्थिर आणि सतत बदलत गेलेल्या भूमिकेत दडले आहे. पक्षाची नव्याने स्थापना केल्यानंतर पेहरावापासून तर बोलण्याच्या लकबीपर्यंत सार्‍याच बाबतीत काकांची सहीसही नक्कल केली तरी विस्तारार्थ पक्षबांधणी फारशी कधी झालीच नाही. परिणामी शिवसेनेच्या धर्तीवर मनसेलाही मुंबईच्या सीमा ओलांडता आल्या नाहीत फारशा. आताही अधिवेशनासाठी बाळासाहेबांच्या जन्मदिनाचा मुहूर्त साधणे असो की मग शिवसेनेने कॉंग्रेस-राकॉंसोबत जाण्याचा निर्णय म्हणजे जनतेचा विश्वासघात संबोधणे असो, सारेकाही एका चौकटीत स्वत:ला बांधून घेणे आहे. काल-परवा, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला तरी चालेल... असं म्हणत जाहीरसभांचा फड गाजवणार्‍या राज ठाकरेंचा, काही दिवसांतच तीच शिवसेना त्याच कॉंग्रेस-राकॉंच्या सोबतीने सत्तेत सहभागी झाल्याचे बघून तीळपापड झाला नसता तरच नवल! त्यामुळे, गेलेवेळी आपण मोदींना ढीगभर शिव्याशाप दिल्या होत्या याचा सहज विसर पडून त्याच मोदींच्या भाजपाची कास धरण्याची तयारी मनसेने चालवलेली दिसते आहे. पक्षाच्या झेंड्यापासून अजेंड्यापर्यंत सारेकाही दिवसागणिक बदलत नेण्याच्या अस्थिरतेचाच हा परिणाम असावा की, स्थापना करतानाही मनसे राज ठाकरेंची होती अन्‌ आज तेरा वर्षांनंतरही ते चित्र फारसे बदललेले नाही. तेरा सदस्य असतानाही राज्याच्या विधानसभेत मनसेची स्पष्ट अशी भूमिका कधी जाणवली नव्हती. आज एका सदस्यावर येऊन ठेपलेल्या उतरंडीच्या टप्प्यावरही तीच संभ्रमावस्था कायम आहे. राजकारणात दरवेळीच नफ्याचे गणित मांडता येत नसते. छत्रपतींनी तहात एका क्षणी 23 किल्ले देऊन घेतलेल्या माघारीचे उदाहरण तर राजकीय चालीचे उत्तमोत्तम उदाहरण ठरावे. पण, शिवरायांचा बाणा अंगीकारण्याचा दावा करणार्‍या कुणालाच राजकीयदृष्ट्या तोट्याचे हे गणित प्रत्यक्ष स्वीकारता आलेले दिसत नाही. नीती-तत्त्वांसाठीच्या त्याग-बलिदानाची तर गोष्टच दूर. इथे तर दर पावलागणिक फक्त फायद्यासाठीच सोंगाट्या फेकण्याचा निर्धार दिसतो प्रत्येकाचा. दरवेळी मित्रपक्ष किंवा विरोधक बदलत जाण्याचे राजसाहेबांचे धोरण तरी कुठे अपवाद आहे त्याला?
 
 
 
आता एकदा का आजचे अधिवेशन पार पडले की, मनसे अधिक आक्रमक भूमिकेत अवतरणार असल्याचा दावा, त्या पक्षाच्या ठाम विचारसरणीच्या अभावाला पुरून उरेल, असा दावा कसा करता येईल? झेंडा बदलल्याने मतदार वाढतील, ही अपेक्षा आधुनिक युगातील समंजस मतदारांची मूर्खांत गणती करण्याचा अनाठायी अट्टाहास आहे. ज्यांना दशकापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडूनही भगवा स्वीकारावासा वाटला नव्हता, त्यांना आज इतक्या वर्षांनी भगव्याची गरज त्यांच्या झेंड्यात प्रकर्षाने जाणवू लागली असेल, तर यामागील राजकारण न कळण्याइतके दूधखुळे तर लोक नाहीत इथले. पण त्यांना तसे समजण्याची चूक राज ठाकरे वारंवार करीत आले आहेत. जरा दरडावून बोललं, मुजोर भूमिका घेतली, पत्रकारांना शिव्या हासडल्या की बरं वाटतं लोकांना. टाळ्या पिटल्या जातात; पण म्हणून दरवेळी तेच ते करीत राहायचे नसते. हे आता उमगले आहे म्हणावे की यशाचा टप्पा गाठण्याच्या कुठल्याशा निर्धाराने पावलं उचलली जाणार आहेत म्हणावं, हा प्रश्न अलहिदा. परप्रांतीयांना करावयाची मारपीट, कथित मराठी बाणा, टोल नाक्यांविरुद्धचा उच्छाद, निवडणुकीतली धुळवड... राजकारण याही पलीकडचे असते, हे उमगणे अधिक महत्त्वाचे. मनसे मात्र अजूनही आक्रमकतेतच यश धुंडाळीत आहे...
@@AUTHORINFO_V1@@