आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन, सत्य हवे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020   
Total Views |


asf_1  H x W: 0


पाकिस्तानमधील मदरशांमध्ये तर देशातले २६ टक्के विद्यार्थी शिक्षण घेतात. या मदरशांमध्ये 'जिहाद' संकल्पनेवर सविस्तर शिक्षण दिले जाते. या पार्श्वभूमीवर बांगलादेशामध्ये काय इतिहास शिकवतात? तर तेथेही मुघलांपासून इतिहास शिकवला जातो.


आज २४ जानेवारी. हा दिवस संयुक्त राष्ट्राने 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून जाहीर केला आहे. तसे शिक्षण हा मानवी हक्कातील एक महत्त्वाचा मुद्दा. भारतात तर प्राचीन काळीही गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी नालंदा-तक्षशिला वगैरे सारखी विद्यापीठे होती, गुरुकुल होते. मात्र, पुढे मुस्लीम आक्रमणकारांनी याच विद्यापीठांची जाळून राख केली. शिक्षणाचे भय, शिक्षणाबद्दल गैरसमज त्याकाळीही दहशतवादी प्रवृत्तीमध्ये असावा, याचे हे धडधडीत उदाहरण. असो, तर हे सगळे आठवले ते केवळ आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनामुळे. शिक्षण हे शांतता आणि विकासाची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रूजवेल यासाठी या दिनाची घोषणा. अर्थात, संयुक्त राष्ट्राला शिक्षणासंबंधी असा काही दिवस असावा, असे वाटले याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र समितीने 'धार्मिक स्वातंत्र्य' या विषयाला अनुसरून पाकिस्तानमध्ये सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाचा निष्कर्ष पाहून आपल्याला दुःख आणि आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. वाटते, जगभरात शिक्षणामध्ये शांती आणि प्रगतीबरोबरच सत्यही शिकवले जावे.

 

कारण, पाकिस्तानमध्ये इतिहास काय शिकवत असतील? १३व्या शतकात मोहम्मद बीन कासिमच्या नेतृत्वाखाली अरबांनी सिंध आणि मुलतान काबीज केले. तेव्हाच पाकिस्तानची निर्मिती झाली. पुढे खिलजीने दिल्लीच्या पुढे मजल मारली आणि औरंगजेबामुळे पाकिस्तानची पाळेमुळे मध्य भारत ते दक्षिण भारतापर्यंत पसरली. अशाप्रकारे तेराव्या शतकापासूनच पाकिस्तान अस्तित्वात होता. मग पाकिस्तानातून भारत कसा वेगळा झाला, हे सांगणारा धडा पण इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो. तो असा की, तेराव्या शतकापासूनच पाकिस्तान अस्तित्वात होता. त्यामुळे देशातल्या उरलेल्या हिंदूंनी ब्रिटिशांना देशात आणले. त्यांना समर्थन दिले. ब्रिटिशांनी पण हिंदूंना समर्थन दिले आणि त्यामुळे भारत निर्माण झाला. हे सत्य नाहीच, पण तिथे हे असेच शिकवले जाते. इथे विद्यार्थ्यांसाठी उर्दू भाषा अनिवार्य आहे. उर्दू विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक चुतुर्थांश भाग हा मुस्लीम धर्माचे शिक्षण देणारा आहे. ते शिक्षण तेथील सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे आहे. इथल्या समाजशास्त्राच्या पुस्तकात सांगितले जाते की, पाकिस्तान हे इस्लामच्या सुरक्षिततेचे कवच आहे आणि जगभरामध्ये इस्लामविरोधी शक्ती इस्लामला संपवू इच्छितात. या पाठ्यपुस्तकामध्ये पाकिस्तानची सुरक्षा म्हणजे इस्लामची सुरक्षा असेच शिक्षणाचे पाठ पढवले जातात. तशी बारावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हिंदू-मुस्लीम संस्कृती शिकवली जाते. पण, त्यामध्ये भारतीय संस्कृती ही इस्लाम आणि पाकिस्तानची मारेकरी आहे, असे येनकेनप्रकारे शिकवले जाते.

 

पाकिस्तानमधील मदरशांमध्ये तर देशातले २६ टक्के विद्यार्थी शिक्षण घेतात. या मदरशांमध्ये 'जिहाद' संकल्पनेवर सविस्तर शिक्षण दिले जाते. या पार्श्वभूमीवर बांगलादेशामध्ये काय इतिहास शिकवतात? तर तेथेही मुघलांपासून इतिहास शिकवला जातो. मुस्लीम शासकांमुळे बांगलादेश भरभराटीला आला, हे तिथल्या इतिहासात शिकवले जाते. बांगलादेश निर्मितीचा इतिहास सांगताना बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांना सांगितले जाते की, बांगलादेशाच्या शूर नागरिकांनी पाकिस्तानच्या सैन्याला नमवले. भारताने त्यावेळी समर्थन दिले. जर भारताने समर्थन दिले नसते, तर दुसऱ्या कोणत्या तरी शेजारील देशाने तसे समर्थन दिलेच असते. थोडक्यात, भारताच्या सहकार्याला बांगलादेशच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान नाही. हे सत्य आहे का? 'द अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का' मध्ये अफगाण शरणार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रश्न असतात की, एका माणसाच्या बंदुकीमध्ये पाच गोळ्या आहेत, त्यापैकी त्याने दोन गोळ्या रशियन सैनिकाच्या डोक्यात झाडल्या तर त्याच्याकडे किती गोळ्य उरल्या? तर तिकडे उत्तर कोरियामध्ये विद्यार्थ्यांना एक प्रकल्प भेट अनिवार्य असते. ती भेट असते एका म्युझियमला. त्या म्युझियममध्ये अमेरिका किती दुष्ट आहे, यासंबंधीची सविस्तर माहिती आहे. थोडक्यात जगभरात शिक्षणाच्या नावाखाली त्या त्या देशातले सत्ताधारी आपआपल्या विरोधकांविरुद्ध कटकारस्थानच करत आहेत. त्या अनुषंगाने आजच्या २४ जानेवारी, या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाचा विचार व्हायला हवा.

@@AUTHORINFO_V1@@