
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी महाधिवेशन मुंबईतील गोरेगाव येथे सुरु झाले आहे . या अधिवेशनात पक्षामध्ये अनेक महत्वपूर्ण बदल केसात आले आहेत.या अधिवेशनात अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे भावूक झाल्याचे पहायला मिळाले. 'अमित ठाकरे यांनी लोकांच्या भल्यासाठी काम करावे, पदांचा विचार करू नये. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहे. कुणाशीही तुलना करण्यापेक्षा काम महत्त्वाचे' असल्याचेही त्या म्हणाल्या. सर्व मनसैनिकांच्या संमतीने अमित ठाकरे यांच्या नावाचा ठराव पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडला. त्यानंतर त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
'येत्या दोन महिन्यात पक्षाला १४ वर्षे पूर्ण होतील. १४ वर्षातील हे पहिले अधिवेशन असून , मी पहिल्यांदाच व्यासपीठावर बोलत आहे. त्यामुळे आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे, अशा भावना यावेळी अमित ठाकरे यांनी व्यक्त केल्या. यानंतर अमित ठाकरे यांनी शिक्षण ठराव मांडला.२०१८च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अमित ठाकरे यांनी मुंबईतील सर्व शाखांना भेट दिली होती. त्यांनतर नवी मुंबईतील मोर्चाचेही नेतृत्व केले होते . यावरून ते राजकारणात सक्रिय होत असण्याचे संकेत मनसेकडून देण्यात आले होते. याशिवाय अमित ठाकरे राज ठाकरे यांच्या सभांनाही उपस्थित राहत परंतु ते कधीही राजकीय व्यासपीठांवर दिसले नाही. आज तेच मनसेच्या अधिवेशनात व्यासपीठावरून संबोधित करताना दिसले.