नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरुन भाजपने कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, "महाराष्ट्रात कॉंग्रेस मुसलमानांना विचारून आणि हिंदूंना शिवीगाळ करते. सीएए-एनपीआरवर विरोधी पक्ष देशात गोंधळ निर्माण करीत आहे. विशेषत: कॉंग्रेस पक्ष यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. या निषेधाच्या पाठीमागून हिंदूंना बदनाम करण्याचे काम त्यांनी चालविले आहे."
पुढे पात्रा म्हणाले की,"दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बैठकीत सांगितले होते की, मुस्लिम बांधवांच्या सांगण्यावरून आम्ही महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केले आहे. मुस्लिम आमचे म्हणणे असे की भाजपा हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे, म्हणून आम्ही शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केले आहे असेही अशोक चव्हाण म्हणाले होते. मग कॉंग्रेस केवळ मुस्लिमांना विचारूनच सरकार स्थापन करते, इतर कोणत्याही धर्मियांचा विचार करून नव्हे."
पुढे ते म्हणाले की, "कॉंग्रेस पक्ष केवळ मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी हे राजकारण करतो आहे, परंतु मुस्लिमांच्या कल्याणावर भर देत नाही. आतापासून कॉंग्रेसला 'इंडियन नॅशनल कॉंग्रेस' नव्हे तर 'मुस्लिम लीग कॉंग्रेस' म्हणावे." यांनतर त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली. संबित पात्रा म्हणाले, "जितेंद्र आव्हाड म्हणाले की पूर्वजांच्या अंत्यसंस्कार कोठे झाले आहेत, हे मुस्लिम येथे सांगू शकतात परंतु तेच हिंदू सांगू शकणार नाहीत."
संबित पात्रा यांनी असदुद्दीन ओवैसी यांना लक्ष्य केले आणि ते म्हणाले की,"ओवेसी हे आत्ताचे जिन्ना होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल सांगितले की मुस्लिमांनी या देशात ८०० वर्षे राज्य केले आणि युद्ध केले. माझ्या वडिलांनी आणि जातीने या देशाला कुतुब मीनार, चार मिनार, जामा मशिद दिली आहे. माझ्या वडिलांनी आणि आजोबांनीही लाल किल्ला बांधला, तुमच्या वडिलांनी काय बांधले? हा प्रश्न कोणासाठी होता ?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.