लाभो मज विश्वाची शांतता!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


द्यौ शान्तिरन्तरिक्षँ शान्ति: पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति:

वनस्पतय: शान्तिर्विश्वे देवा:

शान्तिर्ब्रह्म शान्ति:

सर्वंशान्ति: शान्तिरेव शान्ति:

सा मा शान्तिरेधि।

3म् शान्ति: शान्ति: शान्ति:॥ (यजुर्वेद-३६.१७)


अन्वयार्थ

(द्यौ:) समस्त द्युलोक (शान्ति:) शांततापूर्ण आहे. (अन्तरिक्षम्) अंतरिक्षलोक (शान्ति:) शांततेने युक्त आहे.(पृथिवी) पृथ्वीदेखील (शान्ति:) शांततायुक्त आहे.(आप:) पाणी (शान्ति:) शांत आहे. (ओषधय:) औषधी (शान्ति:) शांत आहेत. (वनस्पतय:) वनस्पती (शान्ति:) शांततामय आहेत. (विश्वे देवा:) जगातील सर्व दिव्य पदार्थ, दिव्य महात्मे (शान्ति:) शांततेने परिपूर्ण आहेत. (ब्रह्म:) ब्रह्मज्ञान, वेदविद्या (शान्ति:) शांततायुक्त आहे. (सर्वं) या जगातील सर्व जड-चेतन समूहसुद्धा (शान्ति:) शांततेने परिपूर्ण आहेत. (शान्ति: एव) शांततेची भावनादेखील (शान्ति:) शांततायुक्त आहे. अशा तर्‍हेने या संपूर्ण ब्रह्मांडातही सर्व (दहा) तत्त्वे सुव्यवस्थित, शांत व सु-अवस्थेत आहेत. (सा) तीच वरील सर्वांची (शान्ति:) शांतता(मा) मला (एधि) प्राप्त होवो, लाभो.

 

अन्वयार्थ

 

प्रत्येकाला सुख-समाधानाने व शांततेने जगायला आवडते. दु:ख आणि अशांती कोणासही नकोशी आहे. अगदी लहानात लहान मुंगी किंवा मोठ्यात मोठा हत्तीदेखील! कोणी आजारी असो की मरणासन्न जर्जर अवस्थेत... कोणालाही मरणे नको, तर जगणे हवे असते! अशांती नव्हे, शांती हवी! म्हणूनच सर्व प्राणी शांततेच्या शोधात रानोमाळ भटकत आहे. माणूसदेखील मन व इंद्रियांना शांत करण्याच्या प्रयत्नात देशोदेशी भ्रमण करतो आहे. याकरिता त्याने आपले सारे धन-वैभव खर्ची घातले, पण तरीही त्याला कुठेच शांतता मिळत नाही. प्रयत्न करूनही बाह्य जगातून त्याला सुख-शांतता लाभत नाही, मग तो विश्वातील समग्र जड-चेतन समूहालाच दूषणे देऊ लागतो. पण, त्याच्या चर्मचक्षूंना हे दिसले नाही की, हे समग्र जग व जगातील सारी तत्त्वे ही शांततेने ओतप्रोत आहेत. अशांतता आहे ती फक्त माणसाच्या अंतरंगामध्ये! म्हणून जगाच्या प्रत्येक तत्त्वात सामावलेली शांतता मानवाला प्रस्थापित करावयाची आहे ती आपल्या अंतर्मनात!

 

सदरील मंत्र जवळपास सर्वांनाच सुपरिचित आहे. धार्मिक विधी, सत्संग, वेदपाठ, मांगलिक कार्ये किंवा कीर्तन-प्रवचनांच्या शेवटी म्हटला जाणारा हा मंत्र म्हणजे 'वैदिक शान्तिपाठ'! या मंत्रात अकरा वेळा 'शान्ति:' शब्द वर्णिला आहे. एक प्रकारे ही अकरा वाक्ये बनतात. पहिल्या दहा वाक्यांशी 'अस्ति' या क्रियापदाची अपेक्षा दर्शविली की, त्या-त्या तत्त्वांमध्ये शांततेचे अस्तित्व आहे, असा अर्थ सांगणारी वर्तमान कालवाचक दहा वाक्ये तयार होतात. मग सर्वांमधील शांतता मलाही (एधि) लाभो किंवा मिळो, असे शेवटी सांगितले आहे. 'शमु' (शम्) या संस्कृत धातूपासून 'उपशमन' अथवा 'समन्वयन' या अर्थाचा बोध होतो. साधारणपणे शांती म्हणजे स्थिरता, हालचालींचा अभाव किंवा मृत्यू होणे असे परंपरागत अर्थ रुढ झाला आहे किंवा 'क्रांती'च्या उलट 'शांती' असेही मानले जाते. राजस्थानच्या संस्कृतीत एखाद्याचा मृत्यू झाला की 'अमुक माणूस शांत झाला' असे म्हटले जाते. तसेच शांतियज्ञ, शांतिप्रार्थना, शांतिकर्म, गृहशांती, उदकशांती अशाही शब्दांचा काही ठिकाणी प्रयोग होतो. पण, हे मूलार्थ नाहीत. कारण, जर काय मृत्यू झाला की, त्याला 'शांती' मिळाली असे जर कोणी म्हणत असेल, तर मग हजारो कत्तलखान्यांमध्ये कसायांकडून असंख्य कोंबडी, बकरी, गाई-म्हशी व इतर जनावरांच्या कत्तली होतात किंवा दररोज अनेक लोक वेगवेगळ्या कारणांनी मृत्युमुखी पडतात. मग हे सर्वजण काय खरोखरच 'शांती'ला प्राप्त होतात? म्हणून मृत्यूचा अर्थ फक्त 'शांतता' असा न घेता पंचतत्त्वात विलीन होणे असा घेणे योग्य होय. 'शान्ति' म्हणजे 'समन्वित अवस्था!' वरील 'शान्तिपाठा'त दहाही तत्त्वांचा मृत्यू किंवा अभाव नव्हे, तर पूर्णपणे समन्वय भाव असा घेणे इष्ट होय. मंत्रांतर्गत प्रत्येक तत्त्वांचा विचार केला तर यातील क्रमश: द्युलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, पाणी, औषधी, वनस्पती दिव्य तत्त्वे, ब्रह्म (वेद) ज्ञान, सर्व जग आणि शेवटी स्वयमेव शांतभावना या सर्व दहा बाबींमध्ये 'समन्वयशीलता' दृष्टीस पडते.

 

'द्यु' लोक म्हणजे अवकाशात चमकणाऱ्या गृह-ताऱ्यांचे जग! दुर्बीण लावून आकाशाचे निरीक्षण केल्यास चमकणारे नक्षत्र व ग्रह-ताऱ्यांचे समूह अगदी सुव्यस्थितपणे कार्यरत असल्याचे दिसतात. ते इतके जवळून जातात, पण कधीही कोणावर आदळणार नाहीत... त्या सर्वांमध्ये किती छान समन्वय, संयम व व्यवस्थापनाचा भाव दिसून येतो. सर्वजण कसे आपापल्या सीमारेषेत व मर्यादेत राहतात. कधीही कोणालाही त्रास नाही की अडथळा! अशा या 'शांत' व 'सम्यक्' व्यवहारावरच तर संपूर्ण ब्रह्मांडातील चेतन प्राणिविश्वाचे आरोग्य व जीवन-मरण अवलंबून आहे. म्हणूनच तर 'द्यौ: शान्ति: अस्ति।' द्युलोक शांत आहे. तसेच आहे अंतरिक्षाचे! अंतरिक्षामध्ये सर्व कार्य अगदी सुव्यवस्थितरित्या संपन्न होते. म्हणून तेही शांत आहे! पृथ्वीकडे पाहा. तिचे स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीचे प्रदक्षिणेचे कर्म! किती सुनियेाजित, निर्विघ्न व व्यवस्थित! त्याचबरोबर तिचे सृजनशीलतेचे कार्यदेखील किती उत्तम आहे पाहा. विविध झाडांची रचना वेगळी, रंग वेगळे, पानांचे-फुलांचे सुगंध वेगळे, फळांचे गोड-आंबट रस वेगळे! मोसंबी वा नारंगीमध्ये आंबट-गोड यांचे संमिश्रण! पालेभाज्यांचा आस्वाद हा वेगळा तर फळभाज्यांचा वेगळा, तो इतरांमध्ये मिळणार नाही. प्रत्येकांनी आपापले गुणधर्म सांभाळले. जवळ राहूनही ते एक-दुसऱ्यात मिसळले नाही. शेतामध्ये गोड उसात तिखट मिरच्यांचे आंतरपीक घेतले जाते, पण गोडाने तिखट ग्रहण केले नाही की तिखटाने गोड अंगीकारले नाही. एकाच वनात, एकाच बागेत, वेगवेगळी फुले-फळे! तरी पण त्यांच्या समन्वय किंवा सामंजस्य दिसून येतो. आपापला गुणधर्म सांभाळून ते कसे आनंदाने राहतात! काहीच भांडणतंटा नाही. म्हणूनच 'पृथिवी शान्ति: अस्ति।'

 

तसेच आहे जलाचे! हायड्रोजन(क २) व ऑक्सिजन(ज) ही दोन तत्त्वे मिळून तयार होणारे पाणी. विशिष्ट प्रमाणात राहूनच त्याचे बाष्पीभवन पण होते. तसेच शीतलता हा त्याचा गुणधर्म! पाण्याचे सर्व काही समन्वयानेच घडते. म्हणूनच त्यात शांतता आहे. वनस्पतीदेखील समन्वित भावनेनेच कार्य करतात. जमिनीवर बीज अंकुरते. ऊन-पाऊस, थंडी-वारा या सर्वांना योग्य प्रमाणात ग्रहण करीत रोपट्यांचे छोट्या किंवा मोठ्या वनस्पतीत रुपांतरण होते. म्हणून वनस्पतीदेखील शांतच. जगातील सर्व औषधी तत्त्वांमध्येदेखील समन्वयशीलता नांदते. वात, पित्त व कफ या वेगवेगळ्या प्रकृतींप्रमाणे त्या अनुकूल व प्रतिकूल बनतात. म्हणून वनस्पतीदेखील शांतियुक्त आहेत. त्याचबरोबर जगातील सर्व दिव्य तत्त्वे किंवा महापुरुषदेखील समन्वयपूर्ण मार्गानेच वाटचाल करतात. त्याचबरोबर ब्रह्मतत्त्व आणि त्याचे वेदज्ञान हेदेखील परिपूर्ण, उत्कृष्ट व सर्वांप्रति उपकारक आहे. अशाच प्रकारे सारे जग आणि स्वत: 'शांती' हा शब्ददेखील अतिशय सुव्यवस्थितरित्या कार्यरत आहे. सर्व काही शांत, सुव्यस्थित, स्थिर व संयमशील चालते! फक्त अशांत व अस्थिर आहे तो माणूस! कारण, त्याच्या कार्यात कुठेच समन्वय आढळत नाही की तारतम्य दिसत नाही. मनसा, वाचा, कर्मणा तो अस्थिर राहून अनिष्ठ कार्यात व्यग्र आहे. त्यामुळेच त्याच्या जीवनात दु:ख व अशांततेचे वातावरण निर्माण होते. याकरिता वेदमंत्रात म्हटले आहे वरील दहा तत्त्वांतील ती शांतता व समन्वयशीलता मला लाभू दे! जेणेकरून मी आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक या त्रिविध दु:खांपासून दूर होऊन शांतमय जीवन जगण्यास समर्थ ठरेल. याचकरिता शेवटी 'शान्ति: शान्ति: शान्ति:' असे तीन वेळा म्हटले आहे.

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@