युधिष्ठिराचा राज्याभिषेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


दरबारात प्रवेश करताना सर्वात अग्रभागी धृतराष्ट्र, त्याच्या मागोमाग युधिष्ठिर आणि मग इतर सर्वांनी हस्तिनापूरच्या दरबारी प्रवेश केला. नागरिक व मंत्रपठण करणाऱ्या ब्राह्मणांनी नव्या राजाचे स्वागत केले. कृष्णाने युधिष्ठिराच्या हाताला धरून त्याला सिंहासनावरती बसवले.


सर्वांचे क्रियाकर्म करण्यात एक महिना निघून गेला आणि आता पांडव हस्तिनापुराकडे निघाले. युधिष्ठिराच्या मनाने उभारी धरली होती. त्याच्या मनीची उदासीनता, अशांती निघून गेली होती. तो आता राज्यकर्ता म्हणून आपली नेमकी भूमिका कोणती, याचे चिंतन करू लागला. पांडव मिरवणुकीतून हस्तिनापुराकडे निघाले. सर्वात पुढे वृद्ध राजा धृतराष्ट्र होता. युधिष्ठिराच्या रथाला १६ पांढरे शुभ्र बैल जोडलेले होते. रथाचे सारथ्य स्वत: भीम करत होता. युधिष्ठिराच्या डोक्यावरती अर्जुनाने छत्र धरले होते. त्यांच्या डाव्या व उजव्या बाजूला नकुल आणि सहदेव उभे राहून चामरे ढाळत होते. अतिशय मनोहर दृश्य होते ते. युधिष्ठिराच्या रथाच्या मागे एकमेव जीवंत असलेला कौरवपुत्र युयुत्सुचा रथ होता. त्यांच्या पाठोपाठ श्रीकृष्णाचा रथ व सोबत सात्यकीही होता. त्यामागे राजघराण्यातील स्त्रियांच्या पालख्या येत होत्या. हत्ती, घोडे, पालख्या अशी ती अत्यंत शोभायमान मिरवणूक होती.

 

दरबारात प्रवेश करताना सर्वात अग्रभागी धृतराष्ट्र, त्याच्या मागोमाग युधिष्ठिर आणि मग इतर सर्वांनी हस्तिनापूरच्या दरबारी प्रवेश केला. नागरिक व मंत्रपठण करणाऱ्या ब्राह्मणांनी नव्या राजाचे स्वागत केले. कृष्णाने युधिष्ठिराच्या हाताला धरून त्याला सिंहासनावरती बसवले. कृष्णाच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत होते. त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली होती. त्यानंतर श्रीकृष्ण व सात्यकी सुशोभित व रत्नजडित आसनांवर स्थानापन्न झाले. युधिष्ठिराच्या डाव्या बाजूला भीम व उजव्या बाजूस अर्जुन होता. त्यांच्यालगतच नकुल व सहदेव हस्तिदंती आसनावर बसले. कुंती सहदेवाच्या शेजारीच होती, जो तिचा सर्वात लाडका पुत्र होता. त्याच्या शेजारी क्रमाने धृतराष्ट्र, गांधारी, विदूर आणि युयुत्सु यांची आसने होती.

 

यथावकाश युधिष्ठिराचा राज्यभिषेक करून त्याच्या मस्तकावर राजमुकूट ठेवला गेला. ब्राह्मण वेदमंत्र पठण करत होते. सर्वत्र आनंदीआनंद भरला होता. सुमधुर वाद्ये वाजत होती. युधिष्ठिराचे नागरिकांनी स्वागत केले. नंतर युधिष्ठिराने योग्य शब्दांमध्ये आभार प्रदर्शित केले. तो म्हणाला, "हस्तिनापूरच्या नागरिकांनी आज माझा खूप मोठा सन्मान केला आहे. माझी सर्व शक्ती पणाला लावून मी चांगला राजा होण्याचा प्रयत्न करीन. माझे चुलते धृतराष्ट्र हे जसे आजपर्यंत राजा होते, तेही राजा म्हणूनच असतील. ते आम्हाला आमच्या पित्यासमान आहेत. तेच या राज्याचे खरे पालक आहेत. मी त्यांचा केवळ सेवक म्हणून काम पाहीन. त्यांना राज्य करण्यास मदत करीन. माझे सर्व भाऊ मला साहाय्य करतील." राज्याचा वारस म्हणून युधिष्ठिराने भीमाला युवराजपदाचा अभिषेक केला. राज्यमंत्री म्हणून विदुरांची नेमणूक केली. त्यांच्याकडे संरक्षण खाते दिले. राज्याचे अर्थखाते संजयाकडे दिले, तर सैन्यखाते नकुलाकडे दिले. अर्जुन सेनापती झाला, तसेच त्याला परराष्ट्रखाते पण दिले. धौम्य हे राजपुरोहित झाले. सहदेव राजाचा वैयक्तिक संरक्षक बनला. युयुत्सुवरतीसुद्धा अनेक प्रांतांची जबाबदारी सोपवली गेली. अशा तर्‍हेने कारभाराचे उत्कृष्ट वाटप केलेले पाहून श्रीकृष्णाला युधिष्ठिराचे खूप कौतुक वाटले.

 

- सुरेश कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@