अजून किती काळ वेठीस धरणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2020   
Total Views |


asf_1  H x W: 0


सामाजिक सुधारणा आणि समाज प्रगतीच्या अनुषंगाने शिक्षकी पेशा हा समाजात आदराचा आणि जबाबदारीचा मानला जातो. भारताची भावी पिढी घडविणारे शिक्षक हे अधिक गुणवत्तापूर्ण असावे, त्यांना त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचे परिपूर्ण ज्ञान असावे, यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात सुरू करण्यात आल्या. या परीक्षांच्या माध्यमातून जे शिक्षक उत्तीर्ण होतील, त्यांनाच आगामी काळात नोकरीची द्वारे खुली होणार आहेत. त्यानुसार अतिशय गांभीर्याने शिक्षणशास्त्र पदवी आणि पदविकाप्राप्त शिक्षक या परीक्षेकडे पाहत आहेत. या सर्व बाबींचा ऊहापोह करण्यामागचे कारण इतकेच की, नुकतीच रविवारी राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात 'टीईटी' पार पडली. या परीक्षेच्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल ३७ पेक्षा जास्त चुका आढळून आल्या आहेत. या एकपानी प्रश्नपत्रिकेत जवळपास प्रत्येक प्रश्नात चुका आहेत. त्यामुळे या विषयाचा पेपर देणाऱ्या शिक्षकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. 'शिक्षण सेवक' म्हणून नोकरी मिळण्यातदेखील अनेकविध अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागतो. शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून आशेचा नवीन किरण दिसत असताना या परीक्षेच्या पेपरलाच चुकीचे ग्रहण लावले गेले आहे. त्यामुळे अजून किती काळ शिक्षकांना वेठीस धरणार, हा प्रश्न या उमेदवारांना भेडसावत नसेल तरच नवल! शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात दाखल होणारे उमेदवार हे गुणवत्तापूर्ण असावेत व ते उमेदवार तसे आहेत, याचे निरीक्षण करण्याकरिता परीक्षा घेणे एकवेळ योग्यही असेल. मात्र, अशा परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करणारे मान्यवरदेखील गुणवत्तेची कास धरणारे आणि ज्ञानाचा लवलेश असणारे असावे, अशी माफक अपेक्षा या घटनेमुळे प्रतिपादित होत आहे. व्याकरणाच्या चुका असणारे प्रश्न विचारल्याने ते प्रश्न रद्द होणार काय, झाल्यास त्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार काय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षार्थींना जो मानसिक त्रास झाला, त्याची भरपाई कशी होणार, हे प्रश्न या निमित्ताने उभे ठाकले आहेत, हे नक्की. राज्याला विकासाच्या आघाडीवर नेऊ पाहणाऱ्या सरकारकडून उमेदवारांना या उत्तरांची नक्कीच आस आहे.

 

सत्कार होतील पण .... ?

 

एखाद्या नागरिकाने कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली की, त्याचा सत्कार करणे, त्यावर आधारित लेख लिहिणे अशी परंपरा आपल्याकडे कायमच पाहावयास मिळते. समाजातील इतर नागरिकांना किंवा त्या विशिष्ट क्षेत्रातील उदयोन्मुख तरुणांना प्रेरणा मिळावी, यासाठी असे सत्कार निश्चितच कौतुकास्पद आहेत. मात्र, या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो तो आपण केवळ सत्कार करण्यातच धन्यता मानणार आहोत की, उदयोन्मुखांची वाट सहज करण्यासाठी कार्य करणार आहोत. क्रीडा क्षेत्र असो वा स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र असो वा कला क्षेत्र, सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करण्यासाठी संबंधितांस कष्टाची परिसीमा गाठावी लागतेच. यश प्राप्तीसाठी कष्ट करणे हे नैसर्गिक आहे. मात्र, व्यवस्थेने त्याला संबंधित क्षेत्रात यश प्राप्तीव्यतिरिक्त इतर क्षेत्रांत कष्ट करावे लागू नये, याची काळजी घेणे निश्चितच आवश्यक आहे. नुकताच 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकावणारा हर्षवर्धन सदगीर यास नाशिक मनपाने ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याला आगामी कारकिर्दीसाठी या रकमेचा उपयोग व्हावा, हा देखील या बक्षीसामागे उद्देश आहेच. मात्र, हर्षवर्धन जेव्हा या यशप्राप्तीसाठी प्रयत्न करत होता, तेव्हा त्याचा हा प्रवास सुकर व्हावा यासाठी प्रयत्न झाले काय हा प्रश्न आहे. त्यामुळे विजेत्याचे सत्कार जरी होत असले तरी, अधिक विजेते निर्माण व्हावे यासाठीदेखील व्यवस्थेने रचना उभारण्याची आवश्यकता निर्माण होत आहे. नाशिक जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात अनेक रत्नं लाभली आहेत. क्रीडा खात्याच्या माध्यमातून येथील क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, यासाठी अनेकविध प्रयत्नदेखील होत आहेत. मात्र तरीही अधिक जोमाने आणि थेट प्रभाव पडेल, असे कार्य होणे आवश्यक आहे. नाशिक मनपाच्या वतीने 'महाराष्ट्र केसरी'चा नागरी सत्कार हा निश्चितच प्रेरणादायी आहे. मात्र, त्याचबरोबर किमान महापालिका क्षेत्रात तरी अधिक विजेते जन्मास यावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादित करणारा आहे. त्यामुळे सत्कार करणे जरी स्तुत्य आणि योग्य असले तरी, उदयोन्मुखाची वाटचाल बिकट होणार नाही यासाठी समाजसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर घटक यांनी पावले उचलणे नक्कीच आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@