हॅप्पीवाली फीलिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


सुरुवात करतोय 'संडे फंडे'पासून. पहिल्यांदा तर तुम्हाला 'संडे का फंडा' नक्की काय, ते मोजक्या शब्दात सांगतो. महिन्यातला एक रविवार कोणत्याही एका वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात जायचं आणि तिथे वयोमानानुसार नियोजित करमणुकीचे निरनिराळे खेळ लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसोबत खेळायचे. सोबत हास्यविनोदाने प्रत्येकाच्या गालावर हसू उमटवायचे. छोटीशी 'खाऊ पार्टी' करायची आणि अशा प्रकारे त्या 'संडे'ला 'फंडे' बनवून टाकायचे. या पद्धतीने टीम 'हॅप्पीवाली फीलिंग'ने आजवर पाच 'संडे फंडे' विविध संस्थांमध्ये साजरे केले. या मागचा उद्देश इतकाच की, प्रत्येकाच्या गालावर खुलणाऱ्या हास्यातून निखळ आनंद घेणे अन देणे इतकाच.


पनवेलमधील 'सेवा सहयोग' संस्थेच्या अभ्यासिका वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्यांसोबत वर्षाचा पहिला 'संडे फंडे' आणि त्याच दिवशी बदलापूरच्या पालेगावात असणाऱ्या वीटभट्टीतील कामगारांमध्ये चादर, ब्लँकेट्स वाटप या सगळ्यात अनुभवलेला बेधुंद आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने जणू संक्रातीने माणुसकीला अर्पण केलेला मायेचा गोडवाच म्हणावा लागेल. 'सेवा सहयोग' संस्था 'शिक्षण' या विषयावर गेली दहा वर्षे समाजातील सर्व स्तरांमध्ये विविध माध्यमातून काम करत आहे आणि जिद्दी होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. विशेष सांगण्यासारखे या संस्थेचे उपक्रम म्हणजे शालेय साधन सामग्री वाटप, खेडोपाड्यात असणाऱ्या शाळेत 'सायन्स लॅब' नसते, तिथे 'व्हॅन लॅब' उपलब्ध करून देणे. अशा सगळ्या उपक्रमातला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे, अभ्यासिका वर्ग. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेत असताना शिकवणीसाठी लागणारा खर्च परवडणारा नसतो, अशा विद्यार्थ्यांसाठी पर्याय म्हणजे विनामूल्य अभ्यासिका वर्ग. या संस्थेच्या एक-दोन नव्हे, तर १०० अभ्यासिका ग्रामीण तसेच शहरी भागातील वस्त्यांलगत कार्यरत आहेत आणि त्यात हजारो चिमुकली उद्याचे उज्ज्वल भविष्य आजच घडवत आहेत.तर निर्धारित 'संडे फंडे' अभ्यासिकेतील चिमुकल्यांसोबत साजरा करण्यात आला. सर्व प्रथम मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, ज्याचा विषय होता देशभक्ती. मुलांची चित्रे विलक्षण बोलकी होती. चित्रे इतकी जास्त छान होती की त्यात नक्की कोणत्या चित्राला क्रमांक द्यावा यात संपूर्ण टीम गोंधळून गेली होती.

 

यानंतर मुलांसोबत आगळावेगळा 'थीम गेम' घेण्यात आला. या गेमनुसार ३० मुलांचे विभाजन प्रत्येकी दहा जणांच्या तुकडीत करण्यात आले आणि तीन ग्रुप बनवण्यात आले. गेमनुसार एका ग्रुपला 'थीम' देऊन त्यापद्धतीचा अबोल देखावा उभा करण्याचे कार्य सोपवण्यात आले आणि तो देखावा पाहून बाकी दोन टीम्सना तो देखावा नक्की काय दर्शवतो आहे, हे ओळखण्याचे कार्य सोपवले गेले. यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला, अभिनय कलेला वाव तर मिळालाच, पण सोबतच खूप हास्यविनोदी मज्जा आली. त्यानंतर अजून दोन मजेशीर खेळ झाले. जिंकलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करून शेवटी 'खाऊ पार्टी'ने कार्यक्रमाची सांगता केली. या चार तासांमध्ये मुलांनी निखळ आनंद लुटला आणि संपूर्ण टीमने मुलांकडून बऱ्याच साऱ्या गोड आठवणी वेचल्या. याच दिवशी पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला. आनंदाच्या वाटेवर अंबरनाथमधील पालेगाव वीटभट्टीकडे. 'प्रोजेक्ट वॉर्म विशेष'अंतर्गत याच टीमचे चादर आणि कांबळी वाटपाचे कार्य चालते, ज्याचे निर्धारित नियोजन होते वीटभट्टी कामगारगेल्या काही आठवड्यांपासून थंडीचा जोर जास्तच वाढला आहे. त्यामुळे यावेळी चादर वाटप कार्य करताना खूप सारे सुखद क्षण डोळे अनुभवणार हे तर नक्कीच होते, पण वीटभट्टीतील कामगारांचे दैनंदिन जीवन पहिल्यांदा इतक्या जवळून पाहून मन अगदीच विचलित झाले. त्यांचे काम अगदीच कष्टाचे, खडतर आणि तितक्याच जोखमीचे आहे. त्याचा मोबदला त्यापुढे फारच कमी असल्याचे मला तरी स्पष्ट जाणवले. आठ महिन्याच्या तान्हुल्या मुलाला जवळ मातीत रांगत खेळत त्याचा आईला विटेचा आकार साकारतानाचे दृश्य मनाला चटका लावत होते. अगदी त्याच वेळी डोक्यापासून पायापर्यंत मातीने माखलेले बाळ मात्र नुसते खुदुखुदू हसत होते आणि संपूर्ण टीमला 'हॅप्पीवाली फीलिंग' देत होते. त्यातल्या बऱ्याच जणांना त्वचेचे संसर्गजन्य आजार झाल्याचेदेखील आढळून आले. पण सगळ्यात महत्त्वाची सकारात्मक गोष्ट म्हणजे तेथील जवळ पास ९० टक्के मुले ही जवळच्या सरकारी शाळेत शिकायला जातात. तसेच अजून दोन संस्था तिथे नि:शुल्क शिकवणीसाठी शनिवारी आणि रविवारी येतात आणि तेथील 'बच्चा पार्टी'सुद्धा आवडीने शिकते. तेथील ३८ कुटुंबांमध्ये घरटी जाऊन चादर वाटप केले गेले. त्यांच्याशी संवाद साधला गेला. संपूर्ण टीमला तिथे 'आरोग्य' या विषयावर कार्य करण्याची गरज आहे, हे प्रखरतेने जाणवले आणि त्यानुसार पुढील महिन्यात तिथे आरोग्य शिबीर घेण्याचा मानस आहे.

 

झावळ्यांच्या झोपड्यात राहताना थंडी खूप जास्त जाणवते आणि तुम्ही दिलेल्या या माणुसकीच्या उबदार भेटीने नक्कीच आमचा त्रास कमी होणार आहे, या पद्धतीचे समाधान वीटभट्टीवरील प्रत्येक कामगाराच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. यानंतर आम्ही तेथील चिमुकल्यांना गोळा केले. त्यांच्यासोबत बरेचसे मैदानी खेळ घेतले. त्यांना ते खेळताना खूप मज्जा आली. शेवटी तेथून निघताना भट्टीच्या मालकांना आम्ही आरोग्य शिबिराबद्दलचा मानस सांगितला आणि त्यांनीदेखील त्या गोष्टीची गरज असल्याचे कबूल केले आणि त्यासाठी काही कार्यक्रम नियोजन करणार असाल तर त्याला हातभार लावण्याची इच्छा व्यक्त केली. अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून बऱ्याच चेहऱ्यांवर 'हॅप्पीवाली फीलिंग' पसरवण्यात टीम यशस्वी झाली. शेवटी इतकेच सांगेन, दैनंदिन जीवनात जगताना तुम्हालादेखील या पद्धतीचे कार्य करण्यासारखे बरेच काही आहे. एकदा कोणत्याही गरजूसमोर नि:स्वार्थ माणुसकीचा हात पुढे करून पाहा. निखळ 'हॅप्पीवाली फीलिंग' त्याच्या अन् तुमच्या गालावर उमटलीच म्हणून समजा.

- विजय माने
@@AUTHORINFO_V1@@