ब्रह्मनिरूपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


ब्रह्म समजणे हे फार कठीण आहे. तरी समर्थांनी शास्त्राधारे सूक्ष्म कालगणना, विष्णू, महादेव, आदिशक्तीचे कालखंड सांगून त्याच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माची माहिती दिली आहे. वस्तुतः या परब्रह्माचे वर्णन वेदही करू शकले नाहीत, आमच्या देहबुद्धीमुळे देहाचे मोठेपण वाटून आत्म्याचे मोठेपण आम्हाला समजत नाही, देहबुद्धी नाहीशी करुन, कोणत्याही कारणाने न बदलणाऱ्या परब्रह्माचा विचार करु तेव्हाच ब्रह्मनिरुपण समजले.


समर्थांनी दासबोधात 'ब्रह्मनिरूपण' नावाचा एक 'सूक्ष्मदर्शी' समास लिहिला आहे. दासबोध हा गुरु-शिष्यांचा संवाद आहे. त्यातील समर्थांची भाषा जोरकस व प्रसादयुक्त असली तरी त्यांचा निवेदनाचा ओघ जलदगतीने असल्याने वाचकांना त्यातील आशय मुळातून समजण्यास कठीण जातो. शिवाय काही आध्यात्मिक शब्द समजण्यास कठीण असतात. त्यामुळे 'ब्रह्मनिरूपण' या नावावरून वाचक या समासाच्या वाट्याला जात नाहीत. पण, तो समास वाचताना समर्थांचा शास्त्रांचा अभ्यास व त्यांची आकलनशक्ती यांचा प्रत्यय येतो. ब्रह्मनिरूपण करायचे, तर विश्वाच्या कालगणनेत ब्रह्माचे स्थान कोठे आहे हे पाहिले पाहिजे. विश्वाची कालगणना पद्धत शास्त्रातून सांगितली आहे, असे समर्थ म्हणतात. ती कालगणना या समासात त्यांनी सविस्तरपणे सांगितली आहे. विश्वाची कालगणना समजून घेण्याअगोदर सामान्य माणसाला माहीत असलेल्या कालगणनेचा विचार करू. पृथ्वी साधारणपणे ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. त्याला आपण 'वर्ष' म्हणतो, हे सर्वांना माहीत आहे. कालगतिचक्र सतत फिरत असल्याने सुरुवात कोठून व वर्षाचा शेवट कोठे हे सांगणे कठीण असते. तथापि व्यावहारिक सुलभतेसाठी ख्रिस्ताब्ध वर्ष १ जानेवारीला सुरू होते, असे आपण मानतो. जगभर ही पद्धत वापरली जाते.

 

हिंदू कालगणना पद्धतीनुसार 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' म्हणजे पाडव्यापासून वर्ष सुरू होते. आपण सूर्याच्या गतीवर आधारित 'सौरवर्ष' व 'चांद्रमास' यांचा ऋतुचक्राशी मेळ साधण्यासाठी आपण सुमारे ३० महिन्यांनी एक अधिक महिना मानतो. त्यामुळे आपले सण त्या त्या ऋतूत येतात. मुस्लीम पंचांगात 'चांद्रमास' व 'चांद्रवर्ष' असल्याने त्यांचे सण दरवर्षी सुमारे १५ दिवस अगोदर येतात. परिणामतः त्यांचा रमजान सण एखाद्या वर्षी हिवाळ्यात आला, तर काही वर्षांनी तो उन्हाळ्यात येतो. ख्रिस्ताब्धापूर्वी ग्रीक व रोमन पद्धतीत मार्च महिन्यापासून नवीन वर्ष सुरू व्हायचे. 'मार्च' या शब्दाचा अर्थच 'पुढे जाणे' असा आहे. त्याकाळी वर्षाच्या ३६५ दिवसांचा मेळ घालण्यासाठी 'ज्युलियस', 'ऑगस्टस्' या सम्राटांनी आपल्या नावाच्या महिन्यांचे एकेक दिवस वाढवून घेतले. त्यामुळे वर्षाचा शेवटचा महिना 'फेब्रुवारी' याच्या वाटेला कमी दिवस आले. हे काहीही असले तरी संपूर्ण काळाचा विचार करता तो अनंत आहे हे लक्षात येते. आतापर्यंत किती वर्षे उलटून गेली आणि यापुढे किती वर्षे येणार आहेत, हे कोणी सांगू शकत नाही. या अनंत काळाचा विचार करता मानवी जीवन किती अत्यल्प आहे, हे लक्षात येते. 'परब्रह्म' हे या काळाच्याही पलीकडे आहे. फक्त आत्मज्ञानी पुरुषच ते जाणू शकतो. आता विश्वाचा कालखंड शास्त्राधारे समर्थांनी दासबोधात 'ब्रह्मनिरूपण' या समासाच्या सुरुवातीस जो सांगितला आहे, त्याचा परिचय करून घेऊ. त्यात सर्वसामान्यपणे सृष्टीरचना समजण्यासाठी चार युगांची कल्पना केली आहे, ती युगे व कालखंड असा आहे-

 

कृतयुग १७ लाख, २८ हजार वर्षे, त्रेतायुग १२ लाख, ९६ हजार वर्षे, द्वापारयुग ८ लाख, ६४ हजार वर्षे आणि कलियुग ४ लाख, ३२ हजार वर्षे हे नीट पाहिल्यावर लक्षात येते की, कलियुगाच्या दुप्पट द्वापारयुगाची वर्षे, तिप्पट त्रेतायुगाची, तर चारपट कृतयुगाची वर्षे आहेत. चारही युगांची बेरीज ४३ लाख, २० हजार वर्षे इतकी आहे. शास्त्रात पुढे असे सांगितले आहे की, चारही युगांची वर्षे हा ब्रह्माचा एक 'दिवस.' ब्रह्माचे एक हजार दिवस म्हणजे विष्णूची एक 'घटिका.' विष्णूच्या एक हजार घटिका म्हणजे महादेवाचे एक 'पळ.' महादेवाची एक हजार पळे झाली म्हणजे आदिशक्तीचे अर्थात मूळमायेचे 'अर्धपळ' होते. (गणितप्रेमींनी आदिशक्तीचे पळ म्हणजे किती वर्षे ते आकड्यात मांडून बघावे!) या आदिशक्तीसारख्या अनंत शक्ती ब्रह्मांडात आहेत. त्यामुळे अनंत ब्रह्मांडाच्या रचना होतात आणि जातात. तरीपण 'परब्रह्म' हे जसेच्या तसे राहते. त्याच्यात यत्किंचित स्थित्यंतर घडत नाही. परब्रह्म हे स्थितीरहीत आहे. जे बदलते त्याची मोजणी काळात करता येते. परब्रह्मात बदल संभवत नाही. ते काळाच्याही पलीकडे आहे. विश्वाला उत्पत्ती, स्थिती, लय आहे. म्हणून त्याच्या काळाची गणना करता येते. परंतु, परब्रह्माची स्थिती अखंड राहते. परब्रह्म व त्याची स्थिती ही एक बोलण्याची पद्धत झाली. वस्तुतः परब्रह्माच्या ठिकाणी स्थिती संभवत नाही. त्यामुळे वेदांनाही परब्रह्माचे वर्णन करता आले नाही.

 

परब्रह्मासी कैची स्थिती ।

परी हे बोलायची रीती ।

वेदश्रुति नेति नेति । परब्रह्मीं ॥ (६.४.६)

 

या दृश्य विश्वाच्या रचनेच्या पाहिले की, येथे एकाहून एक थोर असल्याचे प्रत्ययाला येते. या विश्वरचनेचा विचार केला, तर त्याचा अंत लागत नाही. आपण मात्र आपापल्या उपासनेचा अभिमान धरून बसतो. कोणी म्हणतात, विष्णू थोर आहे. कोणी म्हणतात, शंकर त्याहून मोठा आहे, तर कोणी म्हणतात, सर्वांहून आदिशक्ती मोठी आहे. लोक आपापल्या परीने असे बोलत असतात. पण, कल्पांतीच्या वेळी या सर्वांचा शेवट होणार आहे. 'जे दिसते ते नाश पावते' असे श्रुतीत सांगितले आहे. जो तो आपापल्या उपासनेचा अभिमान बाळगतो, पण खरा देव कोणता हे फक्त साधुपुरुषच निश्चयाने ठरवतो.

 

आपापली उपासना। अभिमान लागला जना।

याचा निश्चयो निवडेना। साधुविण॥

 

या सिद्ध पुरुषाला ठाऊक असते की, एक आत्मा हा सर्वत्र व्यापून उरला आहे आणि तोच खरा देव आहे. त्या देवाव्यतिरिक्त सर्व दृश्य चराचर विश्व हे मायेच्या पसाऱ्यात मोडते. हे आत्मज्ञान ज्याला झाले तो खरोखर 'ब्रह्मज्ञ' होय. एक परमेश्वर तेवढा थोर आहे. त्याच्यामध्ये 'हरि' आणि 'हर' येतात आणि जातात.

 

एवं सकळामध्ये थोर । तो येकचि परमेश्वर।

तयामध्ये हरिहर । होति जाती॥ (६.४.२०)

 

अर्थात, तो परमेश्वर निर्गुण आणि निराकार आहे. तेथे काही उत्पन्न होत नाही किंवा विस्तार पावत नाही. स्थल, काल, उत्पत्ती, आकार यासंबंधी विचार करणे, हे अलीकडचे आहे. परब्रह्माला त्याची बाधा होत नाही. तसे पाहायला गेले तर नाम, रूप, स्थल, काल, आकार या साऱ्या आपल्या कल्पना आहेत. प्रलयाच्या वेळी या साऱ्यांचा निकाल लागणार आहे. मात्र, प्रलय परब्रह्माला बाधा आणू शकत नाही. कारण, ते नाम, रूप, आकाराच्या पलीकडे आहे. कोणत्याही परिस्थितीत हे ब्रह्म जसेच्या तसे राहते. त्यात काहीही बदल संभवत नाही. ब्रह्म समजणे हे फार कठीण आहे. तरी समर्थांनी शास्त्राधारे सूक्ष्म कालगणना, विष्णू, महादेव, आदिशक्तीचे कालखंड सांगून त्याच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माची माहिती दिली आहे. वस्तुतः या परब्रह्माचे वर्णन वेदही करू शकले नाहीत, आमच्या देहबुद्धीमुळे देहाचे मोठेपण वाटून आत्म्याचे मोठेपण आम्हाला समजत नाही, देहबुद्धी नाहीशी करुन, कोणत्याही कारणाने न बदलणाऱ्या परब्रह्माचा विचार करु तेव्हाच ब्रह्मनिरुपण समजले. म्हणून नेहमी ब्रह्मस्वरुपाबद्दल जे बोलतात, ब्रह्माला संपूर्णपणे जाणतात असे 'ब्रह्मज्ञ' पुरुषच खऱ्या अर्थाने 'ब्राह्मण' आहेत.

 

करिती ब्रह्मनिरूपण । जाणती ब्रह्म संपूर्ण ।

तोचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्माविद ॥ (६.४.२४)

 

ब्रह्मनिरूपण करताना शेवटी कोणाला 'ब्राह्मण' म्हणावे, हे समर्थांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले आहे. त्या अर्थाने समर्थ खरे 'ब्राह्मण' म्हणवून घेण्यास पात्र आहेत.

 

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@