अयोध्येच्या निकालाविरोधात डॉ. मोहंमद अय्युब यांची सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |

SC _1  H x W: 0


नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल गुणवत्तेच्या आधारे न देता आस्थेच्या आधारावर दिला आहे. निकालामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग झाला असून विशिष्ट समाज आणि धर्मातील मोठ्या वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे सांगत पीस पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोहंमद अय्युब यांनी अयोध्येच्या निकालाविरोधीत सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पीस पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहंमद अय्युब यांनी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा केवळ आस्थेवर आधारित असून निकाल देताना गुणवत्तेचा विचार करण्यात आलेला नाही. निकालामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वास हरताळ फासला गेला आहे, त्याचप्रमाणे विशिष्ट समाज आणि धर्मातील एका मोठ्या वर्गाच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या निकालावर विचार व्हावा, असे क्युरेटिव्ह पिटीशनमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी अयोध्येतील मंदिर – मशिद वादप्रकरणी मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. देशातील राजकीय आणि सामाजिक अवकाशावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने मुस्लिम पक्षाचेही समाधान करण्याचा प्रयत्न म्हणून मशिदीसाठी पाच एकर जागा देण्याचेही निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात १८ पुनर्विचार याचिका मुस्लिम पक्षातर्फे दाखल करण्यात आल्या होत्या. सदर याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचुड, न्या. अशोक भुषण, न्या. एस. अब्दुल नझीर आणि न्या, संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या होत्या.

 

हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट : विहिंप

अयोध्येच्या निकालाविरोधात दाखल करण्यात आलेली क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे कोणतेही राजकीय अस्तित्व नसलेल्या पक्षाकडून प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असून सर्वोच्च न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालविण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. देशातील संपूर्ण मुस्लिम समाजाला गेली ७२ वर्षे बाबरसारख्या परदेशी आक्रमकांशी जोडण्याचे प्रयत्न वारंवार करण्यात आले, त्याचप्रमाणे श्रीराम जन्मभूमीस्थली मंदिराची उभारणी रोखण्याचा आणखी एक अखेरचा आणि अपयशी प्रयत्न आज क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून करण्यात आला आहे. देशात असलेली शांतता आणि रामराज्याच्या कल्पनेचे विरोधक असणारेच लोक असे प्रकार करीत असतात, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बंसल यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.






 
@@AUTHORINFO_V1@@