जगतप्रकाश नड्‌डा यांचे अभिनंदन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |

BJP will scale newer heig
 
अपेक्षेप्रमाणे, भाजपाचे अकरावे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगतप्रकाश नड्‌डा यांची आज अविरोध निवड झाली. नड्‌डा आतापर्यंत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. आता त्यांनी भाजपाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची जागा घेतली आहे. यामुळे भाजपात आता नड्‌डायुगाचा प्रारंभ झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर अमित शाह यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ या धोरणानुसार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळी नड्‌डा यांची भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नड्‌डा भाजपाचे पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते तेव्हाच स्पष्ट झाले होते.
 
भाजपा हा ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून ओळखला जाणारा पक्ष आहे. देशात अनेक राजकीय पक्ष आहेत, मात्र राजकीय पक्षांच्या या भाऊगर्दीत भाजपाने आपली वेगळी ओळख जपली आहे. म्हणूनच आज भाजपा हा भारतातीलच नाही, तर जगातील सर्वाधिक सदस्यसंख्येचा पक्ष झाला आहे. अशा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणे हा, रा. स्व. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेले नड्‌डा यांच्यासाठी मोठा बहुमान आहे. नड्‌डा, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. भाजपा सांसदीय मंडळाचे सचिव म्हणूनही ते आतापर्यंत जबाबदारी सांभाळत होते. मोदी सरकार एकमध्ये नड्‌डा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून जबाबदारी होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आता भाजपाचे आरोग्य सांभाळण्याची तसेच आपल्या सरकारच्या माध्यमातून देशातील जनतेचे कल्याण करण्याची जबाबदारी नड्‌डा यांना पार पाडावी लागणार आहे.
 
 
 
नड्‌डा यांचा जन्म बिहारमधील पाटण्याचा. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही त्यांनी पाटण्यातून पूर्ण केले. राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत नड्‌डा यांनी बिहारचे प्रतिनिधित्वही केले होते. मात्र, नंतर ते हिमाचल प्रदेशात आले. सिमला येथून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. विद्यार्थी-नेता म्हणून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवातही त्यांनी हिमाचल प्रदेशातूनच केली. 1993 मध्ये ते सर्वप्रथम हिमाचल प्रदेश विधानसभेवर निवडून गेले. भाजपाचे विधिमंडळ पक्षनेते म्हणूनही त्यांनी आमदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात जबाबदारी पार पाडली.
 
आमदार म्हणून दुसर्‍यांदा निवडून आल्यानंतर नड्‌डा यांचा मंत्रिमंडळात, आरोग्य आणि कुटुंबकल्याण तसेच सांसदीय कामकाज मंत्री म्हणून समावेश झाला. हाही योगायोग म्हटला पाहिजे. कारण, नंतर केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी याच खात्याची जबाबदारी सांभाळली. 2007 मध्ये प्रेमकुमार धुमल यांच्या मंत्रिमंडळातही नड्‌डा यांचा पुन्हा समावेश झाला. 2012 ची विधानसभेची निवडणूक नड्‌डा यांनी लढवली नाही. कारण, नियती त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणणार होती. नड्‌डा यांची राज्यसभेवर निवड झाली. 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आतापर्यंत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जन कृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथ िंसह, नितीन गडकरी आणि अमित शाह यांनी सांभाळले आहे. या दिग्गज नेत्यांच्या नक्षत्रमालेत आता नड्‌डा यांचा समावेश झाला आहे. कुशल वक्ता आणि उत्कृष्ट संघटक असलेल्या नड्‌डा यांना आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली आपली निवड सार्थ ठरवावी लागणार आहे. अमित शाह यांचा उल्लेख भाजपाचे सर्वाधिक यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केला जातो. त्यामुळे नड्‌डा यांच्यासमोर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अनेक आव्हाने आहेत. अमित शाह यांच्याप्रमाणे भाजपाच्या विजयीरथाची घोडदौड नड्‌डा यांना कायम ठेवावी लागणार आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेच नड्‌डा यांच्या नेतृत्वाची कसोटी दिल्ली विधानसभा निवडणुकीत लागणार आहे. त्यानंतर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत नड्‌डा यांना भाजपाला विजय मिळवून द्यावा लागणार आहे.
 
सत्ताधारी पक्ष म्हणून अनेक फायदे असले, तरी काही तोटेही असतात. आपले सरकार आल्यामुळे आता आपल्यावरची जबाबदारी संपली, आता जे काही करायचे ते सरकारने करावे, अशी मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत असते. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढत असतात. काही वेळा कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात निराशा येते. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची जबाबदारी नड्‌डा यांना पार पाडावी लागणार आहे. कारण सत्ता असो वा नसो, कार्यकर्ते हाच नेहमी पक्षाचा खरा आधार असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी कोणत्याच पक्षाला- त्यातही सत्ताधारी पक्षाला- नेहमीच महागात पडत असते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा तसेच राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरवरून देशातील एका वर्गात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. या गैरसमजातूनच हा वर्ग रस्त्यावर उतरला आहे. या वर्गाचा गैरसमज दूर करण्याचे शिवधनुष्य भाजपा कार्यकर्त्यांनाच पेलावे लागणार आहे. यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना आपल्या घरातून बाहेर काढण्याचे आणि कामाला लावण्याचे मोठे आव्हान नड्‌डा यांच्यासमोर आहे. अमित शाह आणि केंद्रीय मंत्री तसेच भाजपा नेते यासाठी घरोघरी जात संपर्क करत आहेत. मात्र, लोकांचा स्थानिक कार्यकर्त्यांवर जास्त विश्वास असतो. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते हे काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात.
 
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून देणे. भाजपात बाहेरच्या पक्षातील नेत्यांना मुक्तहस्ताने प्रवेश दिला जात आहे. बाहेरून आलेल्यांना सत्तेची आणि अधिकाराची पदेही दिली जात आहेत. महाराष्ट्रात याचा अनुभव नुकताच सगळ्यांनी घेतला आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी नेहमी सतरंज्याच उचलाव्या का, हा प्रश्न निष्ठावंतांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे आपली उपेक्षा होत असल्याची भावना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे. पक्षाच्या विस्तारासाठी बाहेरच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देणे आवश्यक असले, तरी यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी नड्‌डा यांना घ्यावी लागणार आहे. कारण, पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी भाजपाला सत्तेवर असल्यामुळे परवडणारी नाही. भाजपाच्या आतापर्यंतच्या यशात या कार्यकर्त्यांची मेहनत आणि योगदान कुणालाच नाकारता येणार नाही. 1984 मध्ये भाजपाला लोकसभेच्या दोन जागा मिळाल्या तरी या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नाही, भाजपाचा दोन ते 302 पर्यंतचा प्रवास निष्ठावंत कार्यकर्त्यांशिवाय शक्य झाला नसता.
 
पक्षसंघटना आणि सरकारमध्ये समन्वय ठेवण्याचे आव्हानही नड्‌डा यांना पेलावे लागणार आहे. अमित शाह यांनी पक्षसंघटना तसेच सरकार यात अतिशय चांगला समन्वय ठेवला होता. त्यांनी घालून दिलेल्या मार्गानेच नड्‌डा यांना आपली वाटचाल करावी लागणार आहे. नड्‌डा यात यशस्वी होतील, याबद्दल शंका नाही. कारण, नड्‌डा यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणूनच केली आहे. कोणतीही घराणेशाहीची पार्श्वभूमी त्यांच्यामागे नाही. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या व्यथा आणि वेदना ते समजून घेऊ शकतात. त्यावर हळुवार फुंकर घालू शकतात. यातूनच कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वासाचे स्फुल्लिंग चेतणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीबद्दल नड्‌डा यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
@@AUTHORINFO_V1@@