स्वप्नांना पंख देणारी 'सहगामी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


काही वर्षांपूर्वी आमिर खान अभिनित 'तारे जमीं पर' हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटातील 'ईशान' या व्यक्तिरेखेला त्याच्या स्वप्नांना पंख देऊन ते फुलवण्याचे काम त्याचे शिक्षक करतात, अशी काहिशी ती कथा होती... या चित्रपटाची आठवण यासाठीच की अशीच काहिशी कथा आहे प्राजक्ता रुद्रावार व त्यांची 'सहगामी संस्था' यांची. रस्त्यावरच्या बेघर व बेवारस लोकांच्या पुनर्वसनासाठी संस्था प्रयत्नशील आहे. अशा लोकांना सुरक्षित जागी पोहोचवून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कायम यशस्वी प्रयत्न 'सहगामी'च्यावतीने केले जातात.


उद्योजिका, शिक्षिका, लेखिका, कवयित्रीअसलेल्या प्राजक्ता राहुल रुद्रावार यांच्या संकल्पनेतून या संस्थेचा जन्म झाला. 'सहगामी' संस्थेच्यावतीने मजुरांच्या मुलांसाठी त्यांच्याच वस्तीत पाठशाळा चालविली जाते. हे मजूर दिवसभर बांधकामावर असतात व त्यांना मुलांच्या शिक्षणाविषयीचे काहीही महत्त्व नसते. घर व लहान भावंडांना सांभाळण्यासाठी ही मुले घरी असतात. या मुलांना व त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व जवळच्या सरकारी शाळेत प्रवेश घेऊन देणे. सरकारी शाळेसाठी लागणारे प्राथमिक शिक्षण देऊन तयार करणे व त्यांचा आत्मविश्वास वाढवणे. पाठशाळेत येणार्‍या मुलांना दररोज एकवेळचे अन्न देऊन शिक्षणाची गोडी लावणे.त्यांच्या आरोग्य व इतर मूलभूत गरजा समजून घेऊन आवश्यक ती मदत करणे. तसेच झोपडपट्टीतील महिलांना लिहायला, वाचायला शिकवणे व त्यांना विविध कौशल्ये शिकवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यास तयार करणे या उपक्रमांसोबतच महिला व बालकल्याण यांसाठी संस्था जास्त प्रयत्नशील आहे. महिला व आरोग्य या विषयावरदेखील संस्थेच्यावतीने काम केले जाते. रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत जमा करणे, त्यांच्यासाठी शालेय साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच या मुलांसाठी उपलब्ध असलेल्या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. तसेच लग्नकार्य, वाढदिवस किंवा कार्यक्रमात वाया जाणारे किंवा उरलेले ताजे अन्न जमा करून गरजूंना वाटप करण्यात ही संस्था आग्रही आहे. यासोबतच चांगल्या स्थितीतील कपडे, वह्या, पुस्तक, खेळणी, फुटवेअर जमा करून त्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या जातात. या सर्वांसोबतच पाणी बचत, झाडे जगवा, खिळेमुक्त झाडे, प्लास्टिक संकलन, रेड डॉट कॅम्पेन, रावेत येथील वाहतूककोंडीचा प्रश्न, बीआरटी रस्त्यावरून खाजगी वाहने जात असल्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न अशा अनेक मुद्द्यांसाठी संस्था प्रयत्नशील आहे.

 

'रावेत सिटीझन फोरम', 'रॉबिनहूड आर्मी', 'अंघोळीची गोळी', 'खिऴेमुक्त झाडे', 'संस्कार प्रतिष्ठान' या संस्थांसोबतही कार्य सुरू आहे. 'सहगामी'ची संस्थापिका प्राजक्ता हिला भेटल्यावर तिने संस्थेच्या स्थापनेमागची गोष्ट सांगितली. ती म्हणाली, साधारण दोन वर्षांपूर्वी नेहमीप्रमाणे आमचा ग्रुप मुलांसोबत बालदिन साजरा करावा म्हणून नवीन जागा, नव्या वस्तीच्या शोधात होता. असेच एके दिवशी अन्नदान करायला गेल्यावर बघितले तर रावेतमध्ये बांधकाम मजुरांची वस्ती दिसत होती. जवळपास शंभरच्यावर झोपड्या दिसत होत्या. खायला देताना बघितले तर ६०-७० च्यावर मुले दिसत होती या वस्तीत. मुलांना विचारले की, "कुठल्या शाळेत जाता, तर कळलं की एवढ्या वस्तीतून फक्त चार मुलेच शाळेत जातात. कोण शाळेत जाणार चला सांगा बरं," असे विचारले असता कोणीच बोलेना. पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या गावात ही स्थिती पाहून खूप आश्चर्य वाटले. मग त्यांच्याशी थोडा बोलण्याचा प्रयत्न केला तर कळले की, भारतातील विविध प्रांतांतून इथे येऊन हे कामगार कष्टाने पोट भरत आहेत. पण एका ठिकाणी जास्त दिवस वास्तव्य नसल्यामुळे येथील मुलांना कुठल्याही प्रकारचे शिक्षण देत नाहीत. कारण, त्यांना शिक्षणाचे महत्त्व वाटत नाही व थोडे फार वाटले तरी त्यांच्याकडे येथील सरकारी दस्तावेज नसतात. त्यामुळे आई-वडील कामावर गेले की ही मुले वस्तीमध्ये किंवा रस्त्यावर खेळत राहतात.आई-वडील कामावर गेल्यावर घर सांभाळून स्वयंपाक, भांडी, धुणी करणे, पाणी भरणे, लहान भावंडांना सांभाळणे ही कामे कोण करणार म्हणून मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची अजिबात इच्छा नसते. मग ही मुले घरची सगळी कामे करून, आई-वडिलांसाठी स्वयंपाक करून राहिलेल्या वेळात फक्त उनाडक्या करत फिरत राहतात.

 

मग ठरले की, आपण यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊया. जवळपास एखादी जागा घेऊन शाळा काढावी, तर घर, भावंडे सोडून ही मुले तिथे येणार नाहीत. मग त्यांच्याच वस्तीत जाऊन शिकवण्याशिवाय पर्याय नव्हता.पद्मा, रवी, अर्पिता यांनी सुरुवात म्हणून रस्त्यावरच मुलांना बोलवून शिकवण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी फक्त आठ मुले आली. ऑक्टोबरचं चांगलंच ऊन होतं.पण तिथे एकही झाड नसल्यामुळे चारचाकीच्या मिळेल तितक्या सावलीत शिकवण्याशिवाय पर्याय नव्हता. मग दुसर्‍या दिवशी सकाळी मी, केतकी, रोशनी गेलो तेव्हा तेथील एका पडिक झोपडीचा शोध लागला. जागा स्वच्छ केली व आम्ही उन्हातून सावलीत आलो.साधारण महिनाभर त्या पडिक जागेत शाळा चालवली. त्याच दरम्यान आमचा पत्रकार मित्र ज्ञानेश्वरने अशी पाठशाळा इथे चालते अशी एका वृत्तपत्रात बातमी दिली. स्टोअरी दिली व त्याचा फायदा झाला. एका दानशूर व्यक्तीशी माझे बोलणे झाले व त्यांनी आम्हाला पत्र्यांचीच पण मस्त अशी शेड बांधून दिली. मग काय विचारू नका... आमची स्वत:ची नवीन कोरी दारे व लॉक लावता येईल, अशी पाठशाळा पाहून आमचा आनंद गगनात मावत नव्हता. नवीन शेडमध्ये शिफ्ट झालो. तोपर्यंत महिन्यातच मुलांची संख्या पंचवीसच्यावर गेली. पण खूप मुले असूनसुद्धा येत नव्हती. आली तरी काही खालेले नसायचे. मग मुलांना इथे येण्यास गोडी लागावी म्हणून आम्ही घरून काहीना काही बनवून नेऊ लागलो. हळूहळू आमची सोसायटी, बाहेरच्या सोसायटीतील मैत्रिणी विचारून देऊ लागल्या. चक्क वार लागायला लागले व या खाऊमुळे मुलांची संख्यापण वाढत चालली होती. मिशन फत्ते झाल्याचा आनंद होऊ लागला. दानशूर व्यक्तींमुळे शालेय साहित्य आणि कपाटही मिळाले. पाठशाळा सुरू तर होती, मुलांची संख्या ५० च्या आसपास पोहोचली, पण अजूनही चारच मुले सरकारी शाळेत जात होती. आमचा मुख्य उद्देश होता की, या मुलांना शिक्षणाची गोडी लावून सरकारी शाळेत भरती करणे.त्यासाठी पालकांना पण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होतो. जे मुले शाळेत जातात त्यांना वेगळा खाऊ, गिफ्ट द्यायला लागलो. त्यांनाच सर्कस दाखवायची. अनेक उपाय करून पाहिले. मग कुठेतरी मुलांची इच्छा होऊ लागली. पहिल्या सहा मुलांना माझ्या गाडीमध्ये घालून रावेतच्या सरकारी शाळेत भरती केले. शाळेचे मुख्याधापक व सगळ्याच शिक्षक वर्गाने आनंदाने आमचे व मुलांचे स्वागत केले. 'डोअरस्टेप' या संस्थेने आमच्या मुलांना विनामूल्य बससेवा सुरू केली. मात्र, रोज रोज खाऊसाठी 'डोनर्स' शोधणे कठीण काम होते. तेवढ्यात गादिया सरांनी जवळच त्यांच्या कँटिनमधून दररोज ५० मुलांचा नाश्ता घेऊन जात जा म्हणून निरोप दिला. अन्नदाते भेटल्यामुळे नाश्त्याचा कायमचा प्रश्न सुटला.

 

हळूहळू मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून अनेक उपक्रम राबवले गेले. 'गुडटच', 'बॅडटच' या आवश्यक गोष्टी शिकवल्या. योग, डान्स सर्वांचे रितसर प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. ज्या मुलांना अंघोळ कशी करायची माहिती नव्हती त्यांचा 'लुक'च बदलला होता. पाठशाळेत पार्लरवाल्यांकडून. सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या व मोफत औषध देऊ लागलो. 'रुबेला' व 'गोवर' सारख्या लसीकरणाचे शिबीर पाठशाळेत भरवण्यात येऊ लागले. मुलांना 'आर्ट क्राफ्ट'पासून ते शाडूच्या मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सर्व सण, विविध दिवस मनविले जाऊ लागले. देशासाठी लढणार्‍या जवानांची माहिती देण्यापासून योगचे महत्त्व व कसे करायचे हे पण शिकविले जाऊ लागले. संगणकाची गरज असलेल्या जमान्यात मुलांना संगणक हाताळायला दिला जाऊ लागला. कराटेसारखे आत्मसुरक्षेचे धडे दिले जाऊ लागले. मुलांना शाळेची खूप गोडी लागू लागली. त्यामुळे आत्तापर्यंत 85च्या वर मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश करून देण्यात आला. मुलांबरोबर महिलांचा सहभाग वाढल्यामुळे महिलांनादेखील शिकवण्यास सुरुवात केली. त्यांना स्वावलंबनाचे धडे देऊ लागलो. या वस्तीतील बारावी उत्तीर्ण महिलेला शिक्षिका म्हणून घेऊन बाकीच्या महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. पहिल्यांदा १०-११ महिला येत होत्या. त्यांना लिहिण्यास-शिकविण्यास सुरुवात केली. हळूहळू चार-पाच महिला स्वत:चे नाव तरी लिहू लागल्या. कधीही पाटी-पेन्सिल हातात न घेतलेल्या महिलांसाठी ते एखाद्या चित्रकलेसारखेच होते. पण त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. मग त्यांना कागदी बॅग, कापडी बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हळूहळू रोजगारासाठी नवीन कोणत्या संधी आहेत, हे सांगतानाच स्वत:च्या आरोग्याची कशी निगा राखावी ते संतती नियमनापर्यंत सांगण्यात आले. 'रेड डॉट कॅम्पेन'सारखे विषय त्यांना सांगण्यात आले. यातील काही महिलांना नेऊन दाखवले व प्रौढांची निगा राखणे या अडीच महिन्याच्या विनामूल्य सर्टिफाईड कोर्ससाठी त्यांना प्रवेश घेऊन दिला. दीड वर्षे याच परिस्थितीमध्ये पाठशाळा चालवल्यानंतर अशाच एका सरकारी अधिकार्‍याच्या प्रयत्नातून खूपच छान मोठे कंटेनर शाळेला दिले. एकदम मस्त आलिशान चार खिडक्या असलेली ही नवीन 'कंटेनरवाली पाठशाळा' म्हणजे आमच्यासाठी स्वप्नवत होती. कितीतरी मुले आली गेली! मुलांची संख्या ५० ते ६० झाली होती. आता फक्त लाईट नसल्यामुळे फॅन लाईट चालू नव्हते. त्यातच रवी भैय्यांनी पुढाकार घेऊन फॉक्सवॅगन कंपनीतील समविचारी लोकांसोबत सीएसआरमधून सौरऊर्जेचे युनिट बसवून सोलरवर चालणारी यंत्रणा बसवून दिली. त्यामुळे आता विजेवर चालणारी सगळी उपकरणे सुरू झाली.संध्याकाळी मुलांसाठी अधिक वेळ क्लास घेता येऊ लागले. या दोन वर्षांमध्ये या पाठशाळेची व मुलांची वरचेवर प्रगती होत गेली. प्राजक्ता म्हणतात की, "माझ्यासोबत या संस्थेसाठी केतकी नायडू, रोशनी राय, अर्चना राऊत, लीना वानखडे, गार्गी नाटेकर, ज्ञानेश्वर भंडारे, अन्वर मुलाणी हे कार्यरत आहेत. आज समाधान वाटते 'कुठले तरी समाजकार्य करुया' हा विचारही मनात न आणता सुरू केलेली ही पाठशाळा कितीतरी मुलांचे आयुष्य घडवणारी ठरत आहे. 'सहगामी फाऊंडेशन'च्या सोबत शनिवार, रविवार 'रॉबिनहूड'चे कार्यकर्ते पाठशाळेत मुलांना शिकवतात. तसेच यासाठी भरपूर जणांची साथ व मदतीचे हात पुढे आले म्हणून हे शक्य झाले."

 

- मानसी चिटणीस

९८८११५२४०७

संपर्क : प्राजक्ता रूद्रवार

९७६५४९६८५८

@@AUTHORINFO_V1@@