शिक्षणाचे 'महामेरू'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |


asaf_1  H x W:


तळागाळातल्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, असे स्वप्न मनाशी बाळगून त्यासाठी झोकून देणाऱ्या भांडुपच्या 'अमरकोर' शाळेचे संचालक मारुती म्हात्रे यांच्याविषयी जाणून घेऊया.


आपल्याकडे काहीही नसतानाही आपल्याकडे जे आहे, त्यातलाच एक घास दुसऱ्याला भरविण्याचे काम खूप कमी लोक करू शकतात. यातूनच अनेक माणसे मोठी झाली आहेत. भांडुपमधील 'अमरकोर' शाळेचे मारुती म्हात्रे यांचे कामही असेच वाखाणण्यासारखे आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक लोकांसाठी काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे काम खूपच मोठे आहे. मारुती म्हात्रे यांनी कष्टाने उभी केलेल्या 'अमरकोर' शाळेचे नाव आज सन्मानाने घेतले जाते. तळागाळातल्या प्रत्येकाला शिक्षण मिळावे, यासाठी त्यांची धडपड आजही सुरू आहे. म्हात्रे यांचे बालपण मुंबईतलेच. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या म्हात्रे यांना गरीब-गरजू पण होतकरू मुलांसाठी काहीतरी करायचे होते. यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला. अनेकांनी त्यांना यात न पडण्याचा सल्लासुद्धा दिला. मात्र, आजूबाजूला शिक्षणाला मुकणारे गोरगरीब बघून त्यांचा हा निर्णय अजूनच ठाम होत गेला. भांडुपमध्ये १९८१ मध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील. इतक्या मुलांना घेऊन 'अमरकोर' ही मराठी शाळा म्हात्रे सुरू केली. मात्र, शाळा सुरू करणे इतके सोपे नव्हते. यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते आणि पुढेही येणाऱ्या संकटांना सामोरे जायचे होते. शाळेसाठी अत्यंत छोटी जागा, शिक्षणाची कमी, शाळा चालविण्यास लागणारे आर्थिक गणित असे असंख्य प्रश्न त्यांच्यासमोर होते.

 

अमरकोर शाळा ज्या भागात आहे, त्या भागात राहणारे अत्यंत सामान्य वर्गातील लोक असल्याने शिक्षणासाठी पैसे देणे त्यांना अशक्य. शिवाय शिक्षणाविषयी अनेकांना अनिच्छासुद्धा होती. त्यामुळे या वस्तीत घरोघरी जाऊन पालकांशी स्वतः बोलून मुलांना शाळेत पाठविण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. अनेकदा त्यांना अपयश आले, पण त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. चांगले शिक्षक मिळू लागले. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी अत्यंत माफक शुल्क घेतले जाते. त्यातही ज्यांना शुल्क भरणे शक्य नाही, त्या विद्यार्थ्यांना मोफतही शिकवले जाते. हे सर्व करताना म्हात्रे नेहमीच मुलांना शाळेत घेण्यासाठी आग्रही राहिले आहेत. आज या शाळेचा विस्तार खूप वाढला आहे. आज जवळजवळ दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिकत आहेत. मराठी माध्यमातून शिक्षण घेताना मराठी संस्कृती जपण्याचे काम शाळेत केले जाते. मारुती म्हात्रे यांनी शाळेत अनेक उपक्रम सुरू केले आहेत. यात मराठी संस्कृतीतील सर्व सण-सोहळे साजरे केले जातात. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीचे रक्षण आणि सन्मान जपले जातात. या सगळ्यात मारुती म्हात्रे स्वतः उत्साहाने भाग घेऊन शिक्षकांनाही यात सामील करतात. या शाळेतले सर्व शिक्षक मुलांसाठी खूप मेहनत घेतात. या शाळेतील अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. हे सर्व विद्यर्थी अत्यंत गरीब परिस्तिथीतून जिद्दीने शिकलेले आहेत.

 

या शाळेच्या परिसरातील घरे अत्यंत छोटी असल्याने त्यांना अभ्यास करण्यास करण्यास जागा नाही. या मुलांची अडचण मारुती म्हात्रे यांनी लक्षात घेऊन त्यांना शाळेनंतरही अभ्यासासाठी वर्ग दिले आहेत. याशिवाय अनेक मुले शिकवणीला जात नसल्याने त्यांची उजळणीही शाळेतच करण्याचे त्यांनी सुरू केले आहेत. यामुळे अनेक मुलांना याचा खूप फायदा होतो. म्हात्रे यांच्या या कल्पनेतूनच आज या शाळेचा १०० टक्के निकाल लागत आहे. शिक्षणासाठी इतका आटापिटा करणारे खूपच कमी असतील. मुलांनी खूप शिकावे, पैशाअभावी त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. आज प्रत्येक पालक, विद्यार्थी म्हात्रे यांचे आभार मानतात. काही वर्षांपूर्वी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. यासाठी मारुती म्हात्रे यांनी आपली निष्ठा पणाला लावली आहे. आज या शाळेला सर्वत्र खूप मान आहे. प्रत्येकाला म्हात्रे यांनी मुलांसाठी घेतलेले कष्ट लक्षात आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी सगळ्यांनाच खूप आदर आहे. आजही विद्यार्थ्यांमध्ये मिसळतात. प्रत्येक मुलांना नावाने ओळखतात, हेच विशेष. मारुती यांना आपली शाळा अजून मोठी करायची आहे. तिचा विस्तार वाढवायचा आहे. शाळेची इमारत आजही मुलांसाठी पुरेशी नसल्याने तिचा विस्तार करायचा आहे. समाजातून आलेल्या काही मदतीच्या हातांनीच आज शाळा उभी राहिली आहे. तिला अजून विस्तृत करण्यासाठी म्हात्रे कार्यरत आहेत. मारुती म्हात्रे यांच्या शैक्षणिक कामासाठी दै. 'मुंबई तरुण भारत'कडून अनेक शुभेच्छा...!!!

 

- कविता भोसले

 
@@AUTHORINFO_V1@@