जागतिक पेंग्विन जनजागृती दिवस; राणीबागेतील पेंग्विन्सची संख्या वाढविण्याचे ध्येय !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020   
Total Views |

tiger_1  H x W:

जगात २० जानेवारी हा दिवस ‘पेंग्विन जनजागृती दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतामध्ये केवळ मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात पेंग्विन्स आहेत. परंतु, या पेंग्विन्सप्रति सामान्य लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. मुंबईतील आपल्या पेंग्विन्सप्रति जनजागृती करण्याच्या उद्देशाने या पक्ष्यांच्या पशुवैद्यक डॉ. मधुमिता काळे-वझे यांची घेतलेली ही मुलाखत...

 

थंड वातावरणातील पेंग्विन मुंबईसारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात कसे राहत आहेत ?

मुंबईतील ’वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’त (राणी बाग) नांदत असलेले सात पेंग्विन पक्षी हे ’हम्बोल्ट’ प्रजातीमधील आहेत. त्यांना दक्षिण कोरियातील प्राणिसंग्रहालयातून आपण आणले आहे. या पेंग्विन्सना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामधून पकडून आणल्याचा गैरसमज आजही अनेकांना आहे. परंतु, तसे नाही. राणीबागेत आणलेल्या पेंग्विन्सचा जन्म दक्षिण कोरियातील प्राणिसंग्रहालयातील पिंजराबंद अधिवासातच झाला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार एखाद्या प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामधून पकडून पिंजराबंद करता येत नाही. केवळ तो प्राणी नैसर्गिक अधिवासात तग धरण्यायोग्य नसल्यास त्याला रेस्क्यू सेंटर अथवा प्राणिसंग्रहालयात ठेवले जाते. दोन प्राणिसंग्रहालयांमध्येही पिंजराबंद अधिवासात राहिलेल्याच प्राण्यांची देवाण-घेवाण केली जाते. प्राणिसंग्रहालयातील पिंजराबंद अधिवासातही प्राण्याच्या नैसर्गिक अधिवासाप्रमाणेच पिंजर्‍यातील वातावरण तयार केले जाते. आपणही राणीबागेतील पेंग्विन कक्षामध्ये त्या पद्धतीचे वातावरण तयार केले आहे. पेंग्विन्सच्या अधिवासातील वातावरणाचे ’अंटार्क्टिक’, ’सब-अंटार्क्टिक’ आणि ’टेम्परेट’ असे प्रकार आहेत. मुंबईतील आपले हम्बोल्ट पेंग्विन्स हे ’टेम्परेट’ या प्रकारामध्ये मोडतात. म्हणजेच त्यांच्या अधिवास हा बर्फातला नसून थंड पाण्यामधला आहे. त्यामुळे राणी बागेतील पेंग्विन कक्षामध्ये त्याप्रकारचे वातावरण तयार करण्यात आले आहे.

 

tiger_1  H x W: 
 
 

पेंग्विन कक्षातील वातावरण निर्मितीचे नियोजन कशा प्रकारे केले जाते ?

सर्वप्रथम पेंग्विन कक्षातील तापमान हे त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील तापमानाप्रमाणे नियंत्रित केले गेले आहे. सर्वसाधारणपणे नैसर्गिक अधिवासात हम्बोल्ट पेंग्विन हे ४ ते २५ अंश सेल्सिअस तापमानात राहतात. त्यामुळे कक्षामधील तापमान हे 1४ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान नियंत्रित केले जाते. मुंबईत बदलणार्‍या ऋतूंप्रमाणे तापमानात काही अंशाने घट किंवा वाढ केली जाते. पाण्याचे तापमानही १७-१८ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवले जाते. त्याच्या गुणवत्तेची विशेष काळजी घेण्यात येते. त्यासाठी ‘सॅण्ड’, ‘कार्बन’, ‘मायक्रॉन’, ‘यूव्ही’ आणि ‘बायो फिल्टर’मधून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. हे सर्व काम तज्ज्ञ अभियंत्यांकडून करण्यात येते. केवळ तापमान आणि गुणवत्तेबाबत त्यांना सूचना देण्याचे काम आम्ही करतो.

कक्षामधील टँकमध्ये पाणी सोडल्यावर आम्ही अमोनिया, नायट्रेट आणि पीएच पातळीच्या अनुषंगाने त्याची तपासणी करतो. हे काम दररोज केले जाते. आठवड्यातून एकदा पाण्याची मायक्रोबायोलॉजी चाचणी करण्यात येते. याशिवाय हम्बोल्ट पेंग्विन हे नैसर्गिक अधिवासामध्ये खडकाळ किनार्‍यावर अधिवास करतात. त्यामुळे कक्षामध्ये खडकाळ स्वरुपाचे वातावरण तयार करण्यात आले आहे. त्यांना घरटी बांधण्यासाठीही छोट्या गुफां किंवा खड्यांसारख्या जागांची निर्मिती करण्यात आली आहे.

 

tiger_1  H x W: 
 
 

पेंग्विन्सची आरोग्याच्या अनुषंगाने काळजी कशी घेण्यात येते ?

हा पक्षी त्याला झालेल्या एखाद्या आजाराची लक्षणे शेवटच्या टप्प्यात दाखवतो. त्यामुळे त्यांना एखाद्या आजाराचा संसर्ग होण्याआधीच किंवा ते आजारी पडू नयेच या अनुषंगाने त्यांची काळजी घेतली जाते. सर्वप्रथम त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून कक्षाची दिवसातून दोन वेळा स्वच्छता केली जाते. त्यामध्ये पाण्याच्या टँकचाही समावेश असतो. पेंग्विन्सना बुरशीजन्य आजाराचा धोका असतो. त्यातही पावसाळ्यात आर्द्रता वाढत असल्याने त्यांना बुरशीजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे वर्षातून दोन ते तीन वेळा त्यांना ’अ‍ॅण्टि फंगल’ औषधे देण्यात येतात. पावसाळ्यात खास करुन त्यांना ही औषधे दिली जातात. याशिवाय दर तीन महिन्यांनी त्यांच्या संपूर्ण शरीराची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. हे पक्षी तेलयुक्त मासे म्हणजेच बांगडा, तारली, इल, बोंबील, रावस या प्रकारचे मासे खातात. या माध्यमातून त्यांना पुरेसे जीवनसत्व मिळतातच असे नाही. त्यामुळे त्यांना काही ’सप्लिमेन्टस’ देण्यात येतात.

 
 

एक सारख्याच दिसणार्या या पेंग्विन्सना तुम्ही कसे ओळखता आणि त्यांचे प्रजनन कधी होणार ?

राणीबागेतील पेंग्विन कक्षात सात पेंग्विन नांदत आहेत. त्यामध्ये ’मोल्ट-फ्लिपर’, ’डॉन्लड-डेझी’, ’पोपॉय-ऑलिव्ह’ या तीन जोड्या आणि ’बबल’ ही मादी आहे. प्रजनन करण्याच्या दृष्टीने तीनही जोड्या आता सक्षम झाल्या आहेत. आमच्यासमोर त्यांचे यशस्वी प्रजनन करण्याचे आव्हान आहे. तसेच पुढील काही वर्षांमध्ये त्यांची संख्या वाढवण्याचे ध्येयही आमच्यासमोर आहे. राहिल्यास प्रश्न त्यांना ओळखण्याचा, तर ज्याप्रमाणे वाघांमध्ये त्यांच्या शरीरावरील पट्टे वेगवेगळे असतात. तसेच प्रत्येक पेंग्विन्सच्या छातीवर असलेले काळ्या रंगाचे ठिपके निरनिराळ्या आकाराचे असतात. त्यावरून आम्ही या पेंग्विन्सना ओळखतो. त्याशिवाय त्यांच्या पंखांजवळ वेगवेगळ्या रंगसंगतीचे टॅग लावण्यात आले आहे. उदाहरणार्थ ’मोल्ट’च्या पंखांवर लाल-पांढरा-निळा रंगाचा टॅग, तर ‘बबल’च्या पंखांवर पिवळ्या-निळ्या रंगाचा टॅग आहे.

 
 

tiger_1  H x W: 
 
 
 

पेंग्विन्स दर्शनासाठी येणार्या पर्यटकांमध्ये जनजागृती कशी करता येईल ?

सध्या पेंग्विन कक्षामध्ये येणारे पर्यटक हे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पेंग्विन्सना पाहून निघून जातात. बर्‍याचवेळा पर्यटकांना हे पेंग्विन्स त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांप्रमाणे आराम करतानाच पाहावयास मिळतात. त्यामुळे राणीबागेतील पेंग्विन्स केवळ ढिम्म बसून राहतात, त्यांना हे वातावरण आवडत नसावे, असे ग्रह पर्यटकांच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे जनजागृतीच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने काही उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. ’आययुसीएन’च्या असंरक्षित प्राण्यांच्या यादीत हम्बोल्ट पेंग्विनचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रजातीच्या संवर्धनासाठी उत्तर-अमेरिका, आफ्रिका देशांमधील प्राणिसंग्रहालयांमध्ये प्रकल्प राबवून पर्यटकांना त्यांची माहिती देण्यात येते. त्यामुळे आपल्याकडेही पर्यटकांना पेंग्विन्सप्रति असलेले पूर्वग्रह दूर करण्यासाठी जनजागृती उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. शिवाय भारतात केवळ आपल्याकडेच पेंग्विन्स आहेत. सामान्य माणासाला किंवा एखादा वन्यजीवांसंबधी शिक्षण घेणारा विद्यार्थी वा संशोधकाला या पेंग्विन्सना पाहण्यासाठी परदेशी जाणे आर्थिक दृष्ट्या परवडलेच असे नाही. त्यामुळे आपल्याकडील पेंग्विन्स पाहणे किंवा त्यावर अभ्यास करणे, अधिक सोयीचे आहे.

 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@