सुप्रजा भाग २५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


saf_1  H x W: 0

 

'सुप्रजा' या लेखमालेतील हा २५ वा भाग. गर्भधारणेपूर्वी दाम्पत्यांची शरीरशुद्धी ते मानसिक आचरण कसे असावे, येथून ही शृंखला सुरू झाली. पुढे टप्प्या-टप्प्याने गर्भधारणा झाल्यावर गर्भाची होणारी स्वाभाविक वाढ आणि मातेच्या शरीरातील बदल हेदेखील जाणून घेतले. मातेच्या आहार-आचरण इत्यादींवर गर्भाचा विकास कसा अवलंबून असतो, तेही बघितले. जन्मानंतरचे स्तन्याचे महत्त्व व बाल्यावस्थेतील तीन अवस्थांबद्दलही जाणले. यापुढे बाळाच्या वाढत्या वयातील आहार आणि दिनचर्या याबद्दल बघूया.


बाळ वर्षभराचे झाले की, हळूहळू घन आहार सुरू झालेला असतो. पण, त्यात विविधता अधिक सुरू होते. चॉकलेट्स, बिस्किट्स, वेफर्स यांचा आस्वाद ही मुले हळूहळू घेण्यास सुरुवात करतात. मोठ्या शहरांमध्ये आई-वडील दोघेही नोकरी करतात. तेव्हा ते मूल काही घरांमध्येच आजी-आजोबांबरोबर राहते. पण, बहुतांशी घरांमध्ये सांभाळणारी मावशी किंवा पाळणाघर हे पर्याय निवडले जातात. पाळणाघरात पोहोचवताना त्या मुलाला दिवसभर जे काही खाण्यापिण्यास द्यायचे आहे, ते सगळे डब्यांमधून सकाळीच दिले जाते. त्यातील ३ पैकी २ डब्यांमध्ये 'सटर-फटर' नक्कीच दिले जाते. बिस्किट्स, गोळ्या- चॉकलेट्स, पाकिटातून डब्यात देता येतील अशी विविध जिन्नसे असतात. शिशुवर्गातील मुलांचा डबा बघितला तर तोही अशाच पद्धतीच्या 'टँक फूड'ने भरलेला दिसतो. हल्ली दोन-अडीच वयवर्षे असताना शाळेत नाव नोंदविले जाते. या वयापर्यंत शौच संवेदनांवर संपूर्ण नियंत्रण सर्वांमध्ये आलेले नसते. म्हणजे अशा मुलांना शाळेत पाठवताना डायपर बांधूनच पाठविले जाते आणि पाळणाघरातून मग शाळा/प्ले स्कूल किंवा नर्सरीतून थेट पाळणाघर अशी जर ही मुले जात असतील, तर तो डायपर बराच वेळ ठेवला जातो. काही मुलांना डायपरमध्ये शौच करायला आवडत नाही, हे जाणवते. अशी मुले शौच संवेदना धरून ठेवतात किंवा नर्सरी/पाळणाघरात जास्त मुले असली तरी ती संवेदना अडवून ठेवतात. अशा सवयींमुळे बद्धकोष्ठता, शौच करताना कुंथावे लागणे, पोटात दुखणे, शौचास कडक होणे, शौचाचे गोळे होणे इ. त्रास या वयातही मुलांना होऊ शकतात.

 

तसेच, साखर घातलेले पदार्थ (बिस्किट्स, चॉकलेट्स, केक व विविध पेस्ट्रिज) हे वारंवार मुलांना देऊ नयेत. अतिसाखरेमुळे पोटात जंत होण्याचे प्रमाण वाढते, तसेच तोंड नीट न धुतल्यास, चूळ न भरल्यास हे अन्नकण दातात अडकून राहतात आणि दात किडू लागतात. हल्ली लहानपणीच दात किडणे, हिरड्या सुजणे, रक्त येणे इ. तक्रारी वाढलेल्या आढळून येतात. ओव्हर अतिरिक्त प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ अधिक प्रमाणात खाणे हेदेखील एक कारण आहे. साखरेचे पदार्थ, मिठाई व वर दिलेल्या अन्य पदार्थांमुळे ऊर्जाही खूप वाढते. मुलांमध्ये अतिचंचलत्व, हायपर अ‍ॅक्टिव्हीटी इ. समस्या आढळतात. पोटात जंत झाले की पुन्हा शौचाच्या तक्रारी सुरू होतात. मुले अधिक खा-खा करू लागतात. मग पोटदु:खी, सर्दी-पडसे, कान दुखणे, वाहणे, ताप, अंगावर चट्टे उठणे इ. आजार उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी वय वर्षे १ ते ६ या गटातील मुलांचा आहार, आचरण कसे असावे याबद्दल आपण जाणून घेऊया. मुलांना सवयी याच कालावधीमध्ये आपण लावू शकतो. या वयातील मुले अनुकरणप्रिय असतात. म्हणजेच आपले आई-वडील, शेजारपाजारातील रितीरुढी या वयात लवकर आत्मसात करतात. याच वयात वाक्पांडित्य येते. बोलायला शिकतात. अर्थ हळूहळू समजू लागतो. सांगितलेल्या नियमांचे पालन या वयात अधिक होते. एक वर्षाच्या आतील मुलांपेक्षा यांची झोप थोडी कमी होते. या वयात सर्वात अधिक कुतूहल असते ते प्राणी-पक्षी व सभोवताली असलेल्या वस्तूंचे...

 

घरात जे केले जाते, मोठे जसे वागतात, त्यांच्या सवयी बोलण्याची ढब हे सर्व ते न्याहाळत असतात आणि हळूहळू आत्मसात करत असतात. म्हणूनच या वयातील मुलांची कुंभाराकडील मातीशी तुलना केली जाते. घरात मोठे जसे वागतात, ते 'ब्रह्मवाक्य' असते. या वयातील मुलांसाठी आई जर मोबाईलवर कार्टून दाखवत भरवत असेल, तर त्यात त्यांना काहीच चुकीचे वाटत नाही. मोठ्यांमध्ये व्यसने, घरात वारंवार भांडणे, नटणे-मुरडणे, अति बाहेर फिरणे-खाणे, खाण्याच्या पद्धती हे सगळे या वयातील मुले बघतात आणि तसेच वागू लागतात. घरातील मोठ्या व्यक्तींनी चालताना-बोलताना आपल्या समोर आरसा आहे, असे समजून वागावे. आपल्या सवयींचे प्रतिबिंबच आपल्या अपत्यात उतरत आहे, हे ध्यानी ठेवावे. म्हणून, गर्भधारणेपासून ते केवळ प्रसुतीपर्यंतच गर्भसंस्कार अपेक्षित नाहीत. जे जे संस्कार, सवयी आपल्याला अपत्यामध्ये असाव्यात असे वाटते ते सर्व घरातील वडीलधार्‍यांनी आचरावे, जोपर्यंत ते अंगवळणी पडत नाहीं, तोपर्यंत. मग वैयक्तिक स्वच्छता, जसे दोन वेळा दात घासणे. जेवणापूर्वी आणि नंतर हात व तोंड धुणे. जेवताना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप व तत्सम गॅझेटचा उपयोग न करणे, चालता चालता न जेवणे, शौचाची सवय लावणे, तसेच घरातील रुढी-परंपरा, पूजाअर्चा, स्त्रोत्रपठण इ.ची शिस्त लावणे हे सर्व 'संस्कार'अंतर्गतच येते. मुलांना मोठ्यांपेक्षा जास्त वेळा भूक लागते. पण, आहाराची मात्रा कमी लागते. मोठ्यांसारखे पोटभर या छोट्यांना खाता येत नाही आणि तसे केल्यास ते पचत नाही.

 

पोट दुखणे, तडस लागणे, उलटी होणे इ. होऊ शकते. मोठ्यांसारखा मसालेदार, चमचमीत आहार लहानग्यांना देऊ नये. हल्ली लहान वयातच १२-१३ वर्षांपासूनच्या वयात केस पिकणे, चष्मा लागणे, जाडी वाढणे व अन्य तक्रारी अधिक प्रमाणात दिसतात. हे टाळण्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आहार सात्त्विक, पौष्टिक व ताजा असावा. केवळ पोळी, भाजी, भात, आमटी रोजच्या आहारात दिल्यास ती मुले शाळेत जाऊ लागल्यावर हे खाण्यास कंटाळतात. थोडी कल्पकता आणि सवय लावल्यास मुले सर्व पौष्टिक गोष्टी आवडीने खातात. १ ते ६ वयोगटातील मुलांमध्ये 'Fine motor movements' विकसित होत असतात, म्हणून त्यांना जेवताना थोडी मदत लागते. पण, सतत भरविल्याने हे स्नायू-पेशी विकसित होण्यास अधिक अवलंब लागतो. तेव्हा स्वतःच्या हाताने उचलता येतील, असे पदार्थ त्यांना त्यांच्या हाताने खायला द्यावे. याने मुलांना स्वतः खाल्ल्याचा आनंद तर मिळतोच, पण त्यांचा वेळ ' Productive' गोष्टीत गुंतविल्याने त्याचे 'added advantage' ही मिळतात. एका जागी वाटीत थोडा खाऊ देऊन त्यांना खाण्यासाठी बसवावे. एखादी मोठी व्यक्ती समोर असल्यास त्यांच्या देखरेखीखाली काळ्या मनुका, बेदाणे, साळीच्या लाह्या, चणे, गूळ इ. गोष्टी थोड्या थोड्या द्याव्यात. शाळेच्या डब्याविषयी पुढील भागापासून बघूया. (क्रमश:)

@@AUTHORINFO_V1@@