'अ‍ॅक्ट इस्ट' व्हाया 'ईशान्य वार्ता'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020   
Total Views |


asf_1  H x W: 0


'ईशान्य वार्ता' मासिकाचे संस्थापक-संपादक पुरुषोत्तम रानडे यांना ९ फेब्रुवारी रोजी पत्रकारितेसाठीच्या 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...


इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या काळात पुरुषोत्तम रानडे २२-२३ वर्षांचे असतील. त्यावेळी त्यांनी आणीबाणी विरोधात सत्याग्रह केला. त्यामुळे त्यांना दहा दिवसांचा तुरुंगवास झाला. तुरुंगातून सुटले आणि घरी आले. मनात विचार होता की, आईबाबा काय म्हणतील? दाढी वाढलेली, मळके कपडे अशा अवस्थेत आईबाबांना भेटण्यासाठी घरी आले, तर आईबाबा घरी नव्हते. कळले की, ते कमल काकूकडे गेले होते. पुरुषोत्तम यांच्या मनात धाकधूक होती. आईबाबा काय म्हणतील? आईबाबा काही म्हणण्याआधीच काकू अभिमानाने म्हणाल्या, "हा मुलगा आपल्या घराण्यात वेगळ्या मार्गाने गेला, त्याचा अभिमान बाळगायला हवा." काकू पुरुषोत्तम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे आईबाबाही काही म्हणाले नाहीत. पुढे त्यांनाही पटले की, पुरुषोत्तम काहीतरी चांगलेच करत आहे. पुरुषोत्तम रानडे म्हणजे 'ईशान्य वार्ता' मासिकाचे संस्थापक संपादक. ९ फेब्रुवारीला 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चा पुरस्कार त्यांना बहाल केला जाणार आहे. गेली दहा वर्षे सातत्याने ते 'ईशान्य वार्ता' मासिकाचे काम करत आहेत. या कामासाठी त्यांना जयवंत कोंडविलकर यांची 'ईशान्य वार्ता'चे प्रकाशक म्हणून, तर संजय काथे यांची समन्वयक म्हणून मोलाची साथ लाभली आहे. दहा वर्षांपूर्वी 'ईशान्य भारत' हा विषय भारतातील इतर राज्यांसाठी तसा अस्पर्शित. देशभराचे सोडा, पण आपल्या महाराष्ट्रामध्येही ईशान्य भारताच्या वार्ता, घटनांबाबत फारशी माहिती नव्हतीच.मात्र, त्याचवेळी ईशान्य भारत विविध कारणांनी जळत होता, जाळला जात होता. तिथे नेमके काय घडते आहे? फुटीरतावाद, धर्मांतराचा कसा सैतानी नाच सुरू होता, तिथे आयुष्याची होळी करून समाजकार्य देशकार्य करत होते, ते केवळ रा. स्व. संघाचे स्वयंसेवक!

 

अर्थात, स्वयंसेवक प्रसिद्धीपासून स्वत:हूनच कोसो दूर असतात. पण, तरीही ईशान्य भारत हे भारताचे आणि भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे, हे प्रखरपणे महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणेही गरजेचे होते. नेमके हेच उद्दिष्ट पुरुषोत्तम रानडे यांनी डोळ्यांसमोर ठेवले. त्यानुसार गेली दहा वर्षे 'ईशान्य वार्ता'च्या माध्यमातून ईशान्य भारतातल्या सकारात्मक घडामोडी ते जगासमोर मांडत आहेत. तसे पाहिले तर पुरुषोत्तम यांनी काही पत्रकारितेचे लौकिक अर्थाने शिक्षण घेतलेले नाही. मात्र, त्यांना पत्रकारितेची, साहित्याची आवड. एमटीएनएलमध्ये नोकरी करतानाही त्यांना वाटे की आपण समाजासाठी काहीतरी करायला हवे. समाजात अनेक प्रश्न आहेत, त्यावर जनजागरण करायला हवे. त्यासाठी उत्तम मार्ग होता लिखाण आणि ते वेळेवर प्रकाशित होऊन समाजापर्यंत पोहोचणे. नोकरी करत असतानाही त्यांना आपण पत्रकारिता क्षेत्रात काम करावे असे वाटे. त्यासाठी त्यांनी ठरवले की, घरसंसाराची जबाबदारी आहे. त्यामध्ये स्थिरता मिळवायची आणि आपले ध्येय गाठायचे. त्यानुसार काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. वास्तविक पत्रकारिता शिकण्यासाठी त्यांनी 'सा. विवेक'मध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून नोकरी केली. तिथे त्यांना रमेश पतंगे आणि आबासाहेब पटवारी यांचे मार्गदर्शन लाभले. दोन वर्षांनंतर जयवंतराव कोंडविलकर यांच्याशी परिचय झाला. त्यांनी ईशान्य भारतामधील विद्यार्थ्यांनी भैय्याजी काणे यांना लिहिलेली जुनी पत्रे पुरुषोत्तम यांना दाखवली. ती पत्रे पाहून पुरुषोत्तम यांना वाटले, या दस्तावेजातून ईशान्य भारतामध्ये समाजकार्याचा डोंगर उभे करणारे भैय्याजी काणे आणि जयवंतराव कोंडविलकर यांच्या जीवनाशी संबंधित चांगले पुस्तक तयार होऊ शकते. त्यातूनच मग पुढे 'मिशन मणिपूर' हे पुस्तक त्यांनी लिहिले. याच विषयाला धरून पुढे ईशान्य भारताची माहिती देणारे वार्तापत्र असावे, म्हणून 'ईशान्य वार्ता' मासिकाची सुरुवात झाली.

 

मूळ राजापूर तालुक्यातील आडिवरे गावच्या अनंत रानडे आणि सुशिला रानडे यांचे पुरुषोत्तम सुपुत्र. रानडे कुटुंब पुढे मुंबईत भांडुपमध्ये स्थायिक झाले. घरी मध्यमवर्गीय वातावरण. चौकटीतीलच सारे. पण,पुरुषोत्तम बालपणीच रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. ते म्हणतात, "नाना ढोबळे, वसंत केळकर यांना पाहूनच धन्य झालो होतो. पुढे केशवराव केळकर यांनी वनवासी समाजाबद्दल आणि दामू अण्णा दाते यांनी मागासवर्गीय समाजाबद्दल मांडलेली भूमिका ऐकूनच ठरवले होते की, दुर्लक्षित आणि ऐनकेन प्रकारे प्रवाहाबाहेर असणाऱ्यांशी जोडणारे काम करायचे. कदाचित त्यामुळेच मी ईशान्य भारतातील बांधवांशी 'ईशान्य वार्ता'द्वारे जोडला गेलो." वनवासी बांधवांची हालअपेष्टा सांगत असताना केशवरावांनी त्यांचे प्रश्न, त्या प्रश्नांमुळे निर्माण होणारे पुढे नवीन प्रश्न आणि त्या चक्रात पिळला जाणारा वनवासी याबद्दल सखोल विषय मांडला. मात्र, हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. तीच गोष्ट दामू अण्णांची. त्यांनी तर स्पष्टच विचारले की, " 'सब समाज को साथ लिए' असे असेल तर आपल्या मागासवर्गीय बांधवांसाठी आपण काम करायलाच हवे." पुरुषोत्तम यांच्यावर संघविचारांचा पगडा. त्यामुळेच ईशान्य भारतातील बांधवांची समाजस्थिती, त्यांचे प्रश्न पत्रकारितेद्वारे मांडण्यास सुरुवात केली. ते म्हणतात, "जयवंत कोंडविलकर माझे प्रेरणास्थान आहेत आणि माझ्या कार्यामध्ये मला माझी पत्नी सुरेखा हिची साथ लाभली. तसेच इशान्य वार्ताबद्दल सुनील देवधर यांनी सूचना केली आहे की, 'ईशान्य वार्ता' मासिक इंग्रजीतूनही सुरू झाले पाहिजे. त्यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या काळात आपण इंग्रजीतूनही वार्तापत्र प्रकाशित करणार आहोत. पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीमध्ये 'अ‍ॅक्ट ईस्ट' नावाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू झाला. त्यामुळे ईशान्य भारत, भारतीय समाज आणि राजकीय क्षेत्रात नक्कीच केंद्रस्थानी येईल."

 
@@AUTHORINFO_V1@@