थोडा हैं थोडे की जरुरत हैं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


जीवन जितके गुंतागुंतीचे त्याहून कदाचित अधिक गुंतागुंतीचे आपले विचारचक्र. त्यातही खासकरुन नकारात्मक विचार सहज मनाच्या पडद्याला चिकटतात, तर सकारात्मक विचार अंगी बाणण्यासाठी मनोमन बदलांची पराकाष्ठा करावी लागते. अशा सकारात्मक आणि नकारात्मकतेच्या द्वंद्वात आयुष्याला दिशादर्शक ठरतील असे मौलिक विचार...


आपल्या सुखद आयुष्याच्या खिडक्यांच्या बाहेर थोडे डोकावून पाहिले तर आपल्याला काय दिसते? भंगलेली मने, भरकटलेले तरुण, तुटलेली घरे, भुकेलेली मुले, मंदावलेली अर्थव्यवस्था आणि भ्रष्टाचाराने माखलेली राजनीती आणि 'ग्लोबल वॉर्मिंग'... अरे देवा, सगळे कसे अस्ताव्यस्त झालेले!! आपण चहुबाजूंनी अवघड समस्यांनी वेढलेलो आहोत. प्रदूषणही आहे व भ्रष्टाचार पिच्छा सोडत नाही. मग आता करायचे तरी काय? अशा नकारात्मक परिस्थितीत या जगात आपण सकारात्मक राहणार तरी कसे? म्हणजे कसं आहे, सकारात्मकता स्मरताच सगळ्या समस्यांचा पाढाच आपल्याला आठवतो. अशावेळी आपण सुंदर भावनांना मनात घेऊन मिरवणार तरी कसे? हे सगळं कसं हास्यास्पदच आहे सारं. आपण काय अंथरूणातून उठून 'शुभ प्रभात' म्हणून जग बदलणार आहोत की काय? याला जर 'सकारात्मक दृष्टिकोन' म्हणायचा असेल, तर ते बुवा अशक्यच आहे. आपण कोणाला कितीही सकारात्मकतेत जगतो आहोत, किती आनंदात आकंठ डुंबत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी प्रदूषणाला चुटकीसरशी आळा घालू शकत नाही की भ्रष्टाचाराला संपवू शकत नाही. खरंच हे सर्व आपल्याला करणं शक्य आहे का?

 

आपण एखादे छान प्रेरणादायी व्याख्यान ऐकतो व आपल्याला ते संपूच नये असे वाटते. चित्त प्रफुल्लित होते व आपण तेथून हलूच नये, असे वाटते. असे का? कारण, तेथून हलले की वास्तव डोळ्यासमोर लख्ख उभे ठाकते. आपल्याला आयुष्यात काय काय बदलायचे व किती किती बदलायचे आहे, याची एक मोठी 'लिस्ट' समोर दिसली की आपसुक घाम फुटतो. आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे बदल घडवायचा. त्याशिवाय मग आपल्याला पर्याय उरत नाही. जग बदलणे सोपे नाही, पण मग काहीतरी बदलले पाहिजे. आयुष्य बदलण्यासाठी बदलून बदलून बदलणार तरी काय? तर 'स्वतःला बदलणे' हाच पर्याय आपल्याला आयुष्य आनंदी करण्यासाठी उपलब्ध आहे खरा! पण, तोही भयावह आहे. बदल घडवायचा वा परिवर्तन घडवायचे, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींची अगदी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींचीसुद्धा जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागते. परिवर्तन म्हटले की, पुढच्या क्षणाला काय होईल, याची ग्वाही आपल्याला देता येत नाही. हा खरे तर खूप मोठा भार असतो. आपल्या मनावर अनिश्चित भविष्याचा भार न पेलणाराच असतो! पण, सकारात्मकता आयुष्यात आणायची तर आपल्याला बदल घडवले पाहिजे ते सर्वप्रथम आपल्यातच! त्यासाठी आपल्याच चित्तात वास करून राहणाऱ्या पिशाच्चांना हाकलून द्यावयास हवे नाही! आळसाची पिशाच्चे, हाव असणारी पिशाच्चे, आक्रमक पिशाच्चे, अनैतिकतेची पिशाच्चे....त्यांना नुसते आपल्या डोळ्यांसमोर पाहावयाचे म्हटले तरी जीवाला घोर लागतो. पण, या पिशाच्चांना ओळखावे लागते. त्यांना समजून घेऊनच मग भिडावे लागते.

 

हे सगळे द्रविडी प्राणायम करायचे व तेही सकारात्मक विचार, कृती व फिलॉसॉफी असावी म्हणून!! पण, या गोष्टी खरेतर किती कठीण आहेत. यामुळे जग थोडेच बदलणार आहे? हे सगळे इतक दमछाक करणारे आहे! कशाला पडायचे त्यात... भ्रष्टाचार मिटणार नाही, अनैतिकता हद्दपार होणार नाही, युद्धही होतील आणि जातीयवादही तसाच राहील... मग हे सगळं अगदी न बदलणारं असलं तर मग आपण या सगळ्यात कशाला पडायचं? आपल्या जगात सकारात्मक बदल घडवायचे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या! सोडून देऊया! कशाला उगाचच डोकेफोड! शिवाय सगळ्या समस्या या इतक्या गुंतागुंतीच्या आहेत, तेव्हा त्यांचे पर्यायही तितकेच गुंतागुंतीचे आहेत. नुसते कुणाला क्षमा करून किंवा कृतज्ञ राहून काही बदलत नाही. 'छोड दो यारों, तुमको जो भी करना हैं करो।' या विचारानेच कसे अगदी 'रिलॅक्स' वाटतं नाही? शेवटी काय, जगाला आणि आपल्याला बदलणे ही साधीसुधी बोलायची भाषा आहे, पण नक्कीच प्रभावी नाही, अशा विचारांनी आपण 'होकारात्मकता'(सकारात्मकता) सोडून देतो. पण, एक लक्षात घ्यायला पाहिजे की, आपले आयुष्यही आपली स्वत:ची कथा आहे. आपण जगलेली कथा. मग आपण आपली कथा नकारार्थी लिहिणार का? शेवटी ती आपली निवड आहे. तात्पर्य काय- वरील सर्व विचारांचा ऊहापोह केल्यावर लक्षात येते की, आपला दृष्टिकोन आपली जगण्याची कथा किती विधायक असावी, हे ठरवणार! या जगात सगळंच काही भव्यदिव्य, अतिआरामदायी नाही आहे. किंबहुना खाचाखळगेच अधिक आहेत. आपण आपल्या वृत्तीतील आणि बाह्यजगातील अनेक पिशाच्च्यांबरोबर जगत आहोत. आयुष्यात काळोख आतही आहे आणि बाहेरही आहे. पण, आत एक सकारात्मकतेचा दिवा मात्र सदैव तेवत असतो. काही ना काही कारणांनी आपल्याला त्याचा प्रकाश पाहता येत नाही, तेव्हा आपल्या या प्रकाशाला आपणच शोधूया. थोडे कष्ट करू आणि थोडा निर्धार करू. आयुष्यात सकारात्मकता नक्कीच येईल!

 

थोडा हैं थोडे की जरुरत हैं...

जिंदगी फीर भी यहाँ खुबसुरत हैं ।

 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@