यहाँ के हम सिकंदर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध करत भारतीय संघाने घरगुती खेळपट्ट्यांवरील राजे आपणच असल्याचे सिद्ध केले. बंगळुरूमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकांमध्ये भारताने अंतिम दोन सामन्यांमध्ये मिळविलेले विजय फार महत्त्वाचे मानले जात आहे. कारण, मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताला पाहुण्यांविरुद्ध मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. घरगुती खेळपट्ट्यांवर खेळताना जवळपास ८० टक्के सामने भारताने जिंकले आहेत. ही सरासरी आकडेवारीच सांगते की, भारताला भारतीय धरतीवर नमवणे किती कठीण आहे ते. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाने गेल्या वर्षी भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत पराभवाची धूळ चारत अशक्यप्राय बाब शक्य करून दाखवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा याच उद्देशाने आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने मुंबईतील पहिल्याच सामन्यात भारतावर दहा गडी राखून विजय मिळवत आपला इरादा पक्का केला. मात्र, राजकोट आणि बंगळुरू येथील सामन्यांत भारतीय संघाने पाहुण्यांवर आपले वर्चस्व गाजवत ही मालिकाच आपल्या नावावर केली. ही मालिका आपल्या पदरात पाडून घेताना भारतीय संघाने गेल्या वर्षीच्या पराभवाची परतफेड केली. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका आदी संघानंतर तगड्या ऑस्ट्रेलियालाही नमवत भारताने घरगुती धरतीवर सलग पाचवी मालिका जिंकण्याची किमया साधली. भारताने हे साध्य करताना या खेळपट्ट्यांवरील राजे आपणच असल्याचे सिद्ध केले. मात्र आता भारताचे लक्ष्य असणार आहे ते ऑस्ट्रेलियाला अधिकाधिक सामन्यांत पराभूत करण्याचे. कारण, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आत्तापर्यंत १४० एकदिवसीय सामने झाले असून यापैकी भारताला अवघ्या ५२ सामन्यांतच विजय मिळवता आला आहे. ७८ वेळा भारताला पराभव स्वीकारावा लागला असून १० सामने अनिर्णित राहिले आहेत. एकूण विजय मिळवण्यात ऑस्ट्रेलियाच्याच संघाचे पारडे आत्तापर्यंत जड असून भारताला येथेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अनेक समीक्षकांनी व्यक्त केले आहे.

 

वचपा काढणार?

 

घरगुती मैदानावर सलग पाच मालिका जिंकण्याची उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ या वर्षातील आपला पहिला परदेश दौरा येत्या शुक्रवारपासून करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचे मुख्य लक्ष असेल ते म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढणे. २०१९च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध केवळ १९ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने भारताला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. हा पराभव अनेक भारतीयांच्या जिव्हारी लागला. भारताला २०११ साली विश्वचषक जिंकवून देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या सामन्यातील पराभवानंतर अद्याप आंतरराष्ट्रीय सामन्यांत पुनरागमन करू शकलेला नाही. कपिल देव, धोनीनंतर विराट कोहली हा भारताला तिसरा विश्वचषक जिंकवून देईल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला या विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले. न्यूझीलंड आणि भारतीय संघाची तुलना केल्यास भारतीय संघाचेच पारडे अधिक जड मानले जाते. तरीही याच संघाने भारताला विश्वचषकात अनपेक्षित झटका दिला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आत्तापर्यंत ५७ कसोटी सामने खेळविण्यात आले असून यांपैकी २१ सामने भारताने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडला केवळ १० सामने जिंकता आले आहेत. कसोटीसोबतच एकदिवसीय सामन्यांमध्येही भारताचेच पारडे जड असून १०७ पैकी भारताने ५५ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ४६ सामने जिंकले असून पाच सामने अनिर्णित राहिले आहेत. कसोटी आणिएकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे पारडे न्यूझीलंडपेक्षा जड मानले जात असले तरी टी-२० मध्ये मात्र प्रतिस्पर्ध्यांचे वर्चस्व असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आत्तापर्यंत ११ टी-२० सामने खेळविण्यात आले असून आठवेळा न्यूझीलंडचा संघ विजयी झाला आहे. भारताला केवळ तीनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांप्रमाणे टी-२० मालिका जिंकण्याकडेही भारताने लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेक क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. भारत या दौऱ्यात पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यात भारताची कामगिरी कशी असेल, हे येणारा काळच ठरवेल.

- रामचंद्र नाईक

 
 
@@AUTHORINFO_V1@@