‘स्मार्ट पोलिसिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020   
Total Views |

vedh_1  H x W:



खाकी वर्दी, राकट नजर, सरकारी भाषा, संशयी संवाद आणि लिखापढीला अधिक महत्त्व म्हणजे पोलीस दल. अशी सर्वसामान्यत: पोलीस दलाची ओळख असे. काळानुरूप आता पोलीस दलदेखील कात टाकताना दिसून येत आहे. त्यातच शहरांचा वाढणारा विस्तार, लोकसंख्येची होणारी दाटी यामुळे पोलीस दलासमोर अनेकविध आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यातच गुन्हा घडल्यावर त्याला जलद प्रतिसाद देण्याचे आव्हान पोलिसांसमोर निश्चितच आहे. यावर उपाय म्हणून नाशिक शहर पोलीस दलाने आता ‘स्मार्ट पोलिसिंग’ची कास धरली आहे. नाशिक शहर पोलीस दलात असणार्‍या जवळपास सर्वच वाहनांत जीपीएस यंत्रणा आता कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाला कुठले वाहन कुठे आहे, याबाबतची माहिती तत्काळ समजणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मदत पोहोचविणेदेखील सुकर होणार आहे. तसेच, आपली कार्यशैली अधिक स्मार्ट व्हावी, याकरिता शहर पोलीस दलाच्या ताफ्यात नुकत्याच अत्याधुनिक स्पीड गन असलेली चारचाकी वाहनेदेखील समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनांनी वेगमर्यादा ओलांडली असता त्यांच्यावर कार्यवाही करणे पोलीस दलास सोयीचे होत आहे. पोलीस दलात कार्यवाही करताना कायमचा हद्दीचा वाद हा समोर येत असतो. मात्र, आता जीपीएस यंत्रणेमुळे हा वाद शमण्यासदेखील मदत होणार आहे. कालानुरूप सरकारी खात्याने कात टाकत आपला कारभार चालविणे, हे निश्चितच लोकाभिमुख प्रशासनाचे लक्षण आहे. त्याप्रमाणे जनतेप्रती आपण उत्तरदायी आहोत, हा भाव मनात ठेवत नाशिक शहर पोलीस सध्या आधुनिकतेची कास धरत आहे. हे पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी होण्याकरिता निश्चितच स्वागतार्ह असे धोरण आहे. मात्र, असे असले तरी आजही पोलीस ठाण्यात मिळणारी सन्मानजनक आणि आपुलकीची वागणूक याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. अर्थात सर्वांशीच आपुलकीने बोलून कारभार करणे हे पोलीस दलास शक्यदेखील नाही. मात्र, संवादाची पहिली सुरुवात तरी स्मितहास्य आणि आपुलकीने व्हावी, हीच सामान्यजनांची पोलीस दलाकडून अपेक्षा...



हा अट्टाहास कशासाठी?

नाशिक शहर आणि जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजीस उधाण येत असते. जिल्ह्यातील येवला तालुक्याची पतंगबाजीतील महती तर संपूर्ण राज्यास परिचित आहे. रंगीबेरंगी पतंग आजच सध्या नाशिकच्या आसमंतात विहार करताना नजरेस पडत आहे. आपला पतंग कोणीही काटू नये आणि आसमंतात आपलीच सत्ता राहावी यासाठी दर्जेदार मांजाची विक्री आणि खरेदी होतानाचे चित्र नाशिकमध्ये पाहावयास मिळते. विशेष म्हणजे ज्या नायलॉन मांजाला जिल्ह्यात बंदी आहे, तोदेखील काही ठिकाणी उपलब्ध असल्याचे दिसून आले. मागील किमान दहा दिवसांत दहा पक्ष्यांना नायलॉन मांजाचा फास लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील काही पक्षी वाचविण्यात पक्षीमित्रांना यश आले. नुकतेच येथील अशोकस्तंभ परिसरात नायलॉन मांजाच्या विळख्यात एक कबुतर अडकून जखमी झाल्याची घटना घडली. या कबुतराला वाचविण्यात पक्षीमित्रांना यश आले असले तरी, नायलॉन मांजाचा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. पतंगबाजी हा एक खेळ असून तो खिलाडू भावनेनेच खेळला जाणे अपेक्षित आहे. असे असतानादेखील पशुपक्षी आणि नागरिक यांच्यासाठी वेदनादायी ठरणार्‍या आणि जाचक ठरणार्‍या नायलॉन मांजास नागरिक पसंती कशी देत आहेत, हाच प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. काही ठिकाणी नायलॉन मांजा उपलब्ध नसला तरी, तो आणून देण्याची तयारी दुकानदार दर्शवितात. हे अतिशय चिंताजनक आणि भयावह वास्तव आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने याबाबत कठोर होत पावले उचलण्याची गरज यामुळे जिल्ह्यात अभिप्रेत होत आहेत. नाशिकचे आल्हाददायक असणारे हवामान, मुबलक पाणी, निसर्गाचे लाभलेले वरदान यामुळे येथे विविध पक्ष्यांचा मुक्त संचार सहज पाहावयास मिळतो. ज्या आसमंतात हे पक्षी स्वच्छंद विहार करतात, त्या आसमंतात संक्रांतीच्या निमित्ताने एक दिवस का होईना, आपला पतंग टिकून राहावा, अशी अपेक्षा बाळगत पक्ष्यांना जखमी करणारे साधन वापरणे किती संयुक्तिक आहे, याचा विचार पतंगबाजांनी करणे निश्चितच आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@