क्रांतीतले संतत्व : माता सावित्रीबाई फुले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020   
Total Views |

vv1_1  H x W: 0




क्रांती ही दुसर्‍यांसाठी असते की स्वत:साठी? जगात अनेक क्रांतिकारक झाले, पण हा मूलभूत प्रश्न त्यांच्या जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही पडलाच. या सार्‍याला अपवाद आहेत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या क्रांतीतील संतत्व जाणून घ्यायलाच हवे.



 अठराव्या शतकात स्त्रीचे अस्तित्व ते काय असेल? त्यातही बहुजन समाजातल्या स्त्रीचे जीवन कसे असेल? शिक्षण नाही, वैयक्तिक मत जोपासण्याचा तर प्रश्नच नाही. अर्थात आपलं आयुष्य हे असं आहे, असा विचार करण्याचा विचारसुद्धा त्याकाळच्या स्त्रियांच्या मनात येऊ शकत नव्हता, असा तो काळ. त्या काळी घरातील कर्त्या पुरुषाच्या प्रत्येक कृतीला केवळ ते म्हणतात म्हणून ‘मम’ म्हणत सहकार्य करायचं, हेच त्या स्त्रीचं अस्तित्व. पण, त्या काळातही सावित्रीबाई फुले ही स्त्री शाश्वत मानवी मूल्यांची प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करू लागली. अर्थात, इथे असेच म्हटले जाते की, ‘जोतिबांनी सावित्रीला घडवले.’ जोतिबांची सावली सावित्रीबाई. होय, हे सत्य आहेच. जोतिबा आदर्श व्यक्ती होतेच. पण, पारंपरिक जाणिवेच्या रूढीग्रस्त घरात जन्मूनही सावित्रीने जोतिबांच्या क्रांतिकारी विचारांना नुसतेच समर्थन दिले नाही, किंवा स्वीकारले नाही, तर जोतिबांच्या क्रांतिकारी संकल्पना सावित्री स्वतः जगल्या.


फुले कुटुंबातल्या जोतिबांचं आणि सावित्रीबाईंचंही अलौकिकत्व हेच की
, ते नुसत्या सामाजिक, धार्मिक रितीनीच नव्हे, तर भावनिक, वैचारिक आणि कर्तृत्वानेही एकमेकांचे बांधिल होते. जोतिबांनी १ जानेवारी, १८४८ साली पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली, १५ मे, १८४८ रोजी शूद्रांसाठी शाळा सुरू केली. तसेच २८ जानेवारी, १८५३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. या सर्व क्रांतिकारी सुधारणांमध्ये जोतिबांबरोबर सावित्रीबाईंनीही त्यासाठी पाठपुरावा केला. सावित्रीबाईंचीही महानता हीच की, ‘मम’ म्हणत पत्नी म्हणून त्यांनी जोतिबा सांगतील ते ऐकलेच. पण, नुसते न ऐकता ते मनापासून स्वीकारले. एक पत्नी म्हणून या अर्धांगिनीने क्रांतिकारी समाजसुधारक ज्योतिबांची काया-वाचा-मनाने समर्थपणे साथ दिली.


सावित्रीबाईंच्या या गुणांचा विचार करताना मात्र सध्या त्यांचे नाव घेऊन
‘मुक्ती’बिक्तीच्या रडगाथा गाणार्‍यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सावित्रीबाई भारतातील पहिल्या स्त्रीमुक्तीवादी होत्या, असेही काही लोक महिला दिन वगैरे असला की सांगत सुटतात. पण, सावित्रीबाईंनी तर कधीही समाज किंवा कुटुंबापासून मुक्तीबिक्तीची गोष्ट केली नव्हती. उलट त्यांचे म्हणणे होते की, आत्मशक्ती असेल तर सर्वच शक्य आहे. असो, समता, बंधुता आणि करुणा या मूल्यांना केवळ ‘शिकवणी’ म्हणून सावित्रीने उजळणी केली नाही, तर आपल्या आयुष्यातही सावित्रीबाई आजन्म समता, बंधुता आणि करुणा या मूल्यांच्या प्रेरणास्रोत म्हणून जगल्या. सूर्याच्या सावलीत शक्तीमान तारेही लुप्त होतात. सावित्रीचे मोठेपण हे की तो काळच समाजसुधारणेचा होता. कितीतरी समाजसुधारकांचा उदय त्याकाळी झाला आणि त्यानंतरही झाला. पण, या महान समाजसुधारक सूर्यांसमोर ‘सावित्रीबाई’ नावाचा तारा समाजाला आजही प्रचंड ऊर्जा देत आहे. भारतातल्या शिकून-सवरून संघर्ष करून यश मिळवणार्‍या लेकीबाळी स्वतःला म्हणूनचसावित्रीच्या लेकी’ म्हणतात.


सावित्रीबाईंचे विचार समजून घेताना एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे की
, ते विचार प्रत्येक काळाशी सुसंगत आहेत. त्यांच्या विचारांना काळाची मर्यादा नाही. समाजाच्या प्रत्येक कालखंडात सावित्रीबाईंचे विचार कसोटीवर खरे उतरतात. त्या म्हणतात,“ज्या समाजातून व ज्या परिस्थितीतून मुली, अगर मुले येतात, त्याचा बरा-वाईट परिणाम संबंधित मुला-मुलींच्या शिक्षणावर होत असतो.” आजही बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या गुणांकांचा धांडोळा घेतला, तर या सिद्धातांची सार्थकता पटल्याशिवाय राहत नाही. आरक्षण हवे की नको किंवा आम्हाला आरक्षण द्या, या विषयावर सध्या रणकंदन माजले आहे. पण, ज्या काळात ‘आरक्षण’ हा शब्दही कदाचित काळाच्या पुढचा होता, त्यावेळी सावित्रीबाईंनी समाजाच्या अंत्यज स्तराचा विचार करून त्यावर भाष्य केले होते.


कालपरवाचीच गोष्ट
. मुलीने परजातीच्या मुलाशी लग्न केले म्हणून मुलीच्या पित्याने आपल्या मुलीच्या पतीचीच हत्या घडवून आणली. ‘ऑनर किलिंग’ आजही समाजात घडते. जातीपातीची उतरंड तर कायद्याने समाजबाह्य असली तरी मनात कित्येकांच्या मनात मात्र रूखरूखत असते. कित्येकवेळा तर असेही दृश्य दिसते की एखाद्यावर अन्याय-अत्याचार होत असतो आणि स्वतःला रथी-महारथी समजणारे लोकसुद्धा मयसभेतल्या धृतराष्ट्रासारखे मुकाटपणे सगळे पाहतात, बंद मनाने. ‘मला काय त्याचे? मी का प्रस्थापितांविरोधात आवाज उठवू?’ या कातडीबचाव भूमिकेत राहतात. पण, अठराव्या शतकामध्ये सावित्रीबाईंनी दाखवलेली संवेदनशीलता, धाडस मनाला प्रेरणा देते. त्याचे झाले असे, काळ होता अठराव्या शतकातला. गणेश नावाचा एक ब्राह्मण गावोगावी पंचांग सांगून उदरनिर्वाह करत होता. तसा पंचांग सांगत सांगत तो या गावात आला. त्याचे गावातल्या सारजा नावाच्या त्याकाळच्या तथाकथित अस्पृश्य जातीच्या मुलीवर प्रेम जडले, सारजाला त्याच्यापासून दिवस गेले. ती सहा महिन्यांची गरोदर राहिली. त्याचा बोभाटा झाला. गावातील काही दुष्टांनी दोघांना भरपूर मारपीट केली आणि मारत-मारत गणेश आणि सारजाची भयंकर मिरवणूक काढली. मिरवणुकीनंतर त्या दोघांना ठार मारण्याची तयारी होती. त्या दोघांना ठार मारणार, इतक्यात... इतक्यात सावित्रीबाई पुढे आल्या. त्यांनी सरकारी कायद्याचे भय दाखविले. “हे दोन खून तुम्ही करणार आहात आणि त्याचे भयंकर परिणाम तुम्हाला कायद्याने भोगावे लागतील,” असे धमकावले. त्यावेळी गणेशला आणि सारजाला ठार मारणार्‍या लोकांनी असा निर्णय दिला की, “आम्ही यांना ठार मारणार नाही, पण या भटुकड्याने (गणेशने) आणि या महारणीने (सारजाने) हे गाव सोडून जावे.” अर्थात, त्या दोन प्रेम करणार्‍या जीवांनी हे मान्य केले. या गणेश आणि सारजेला मृत्युदंड होणार होता, तो झालाही असता. पण त्यांचा जीव वाचला, तो त्या साहसी, धैर्यशील आणि माणसाला केंद्रबिंदू मानून रूढी-परंपरांचा विचार करणार्‍या सावित्रीबाई फुलेंमुळे.


सावित्रीबाईंच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात त्यांची कृती ही महानच होती
. आता आपण दुसर्‍या एका समाजप्रघाताचा विचार करू. आजही प्रत्येक स्त्रीला मातृत्व श्रेष्ठ वाटते. जर स्वतःला मूल नसेल तर दाम्पत्य आपल्याच नात्यातल्या किंवा कुलाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीचे अपत्य दत्तक घेतात. आजकाल तर काय ‘सरोगसी’चं पेव फुटलं आहे. या परिप्रेक्ष्यात सावित्रीबाई यांना एक पत्नी, एक स्त्री म्हणून अभ्यासताना प्रकर्षाने जाणवते की, त्या केवळ आणि केवळ एक माणूसच होत्या. आता हेच बघा, दुसर्‍या जातीच्या विधवेच्या मुलाला, तेही त्या विधवेवर झालेल्या अधम अत्याचारातून ते मूल जन्माला आले असताना, दत्तक घ्यायचा विचार आजही कोणी करेल का? मला खात्री आहे, आजही तसा विचार कोणीही समजून-समजून स्वार्थाशिवाय करणार नाही. (अपवाद क्षमस्व). कारण कुणाला दत्तक पुत्र किंवा कन्या हवी असेल, तर त्याच्या पूर्वजांचे कुळशिळ पाहिले जाते. शक्यतो जाती-धर्मात तेही नात्यातले मूल दत्तक घ्यायचा विचार होतो, पण सावित्रीबाईंनी स्वत: वाचविलेल्या दुर्दैवी काशीबाईच्या मुलास दत्तक घेतले. समाजसुधारक सावित्रीबाईंच्या मनातली वात्सल्यमूर्ती आई शेवटपर्यंत यशवंताला जीवनात समर्थ आणि यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहताना दिसते. या थोर समाजसुधारक, क्रांतिकारी मातेची थोरवी व्यक्त करताना म्हणूनच मामा परमानंद, सयाजीराव यांना पत्रात लिहितात, “तिने (सावित्रीबाईने) आपल्या नवर्‍यास त्यांच्या कार्यात सहकार्य दिले नि त्यांच्याबरोबर हालअपेष्टा भोगल्या. तशा प्रकारचे कार्य नि धैर्य उच्च शिक्षण घेतलेल्या, उच्च जातीमध्येसुद्धा आजपर्यंत कोणी दाखविले नाही.” असो, आयुष्यात पदोपदी संघर्ष होता. काया-वाचा-मनाने जोतिबांची अर्धांगी म्हणून समाजकार्य करत असताना सावित्रीने आत्मभान नेहमी जपले. पतीसोबत समाजकार्य करताना सासर-माहेर दोन्ही परके झाले. सावित्रीबाईंनी आयुष्यात जो संघर्ष जगला हे समजायला ‘जावे त्यांच्या वंशा...’ हेच वाक्य समर्पक आहे. रणरणत्या वास्तवातही सावित्रीबाईंच्या संवेदनशील मनात साहित्याचे अंकुर उमलत होते. ही सर्जनशीलता सावित्रीबाईंच्या साहित्यनिर्मितीत जाणवते. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ १८५४ साली प्रकाशित झाला, तर दुसरा ‘बावनकशी सबोध रत्नाकर’ १८९२ साली प्रकाशित झाला. ‘विचारप्रवर्तक निबंध’ हा निबंधसंग्रह त्यांच्या अतुलनीय बुद्धिप्रामाण्याची साक्ष देतो. प्राप्त परिस्थितीत संघर्ष होता, दु:ख होते. ते सारे सावित्रीबाईंच्या साहित्यात उमटले का, तर उमटेलच. पण त्याचबरोबर कृतज्ञता, प्रेम, वात्सल्य, रसिकता हे भावही तितक्याच उत्कटपणे सावित्रीबाईंच्या कवितेत उमटतात. आयुष्याच्या एका टप्प्यावर जोतिबांची साथ सुटली. त्यावेळी सावित्रीबाईंना काय वाटले असेल? छे.. शब्दातीत. पण, त्या प्रसंगातही सावित्रीबाई समाजभान जपतात. जोतिबांच्या अंत्ययात्रेतही यशवंतासोबत सावित्रीबाई मडके घेऊन पुढे चालत होत्या. स्वत:च्या पतीच्या मृत्यूविधित पुढाकार घेणारी ही पहिलीच स्त्री. इतिहासात कितीतरी उदाहरणे आहेत की, एखादी व्यक्ती आयुष्यभर ध्येयाच्या परिपूर्तीसाठी जगली. पण समाजसेवेचा वसा घेत ध्येयपूर्ती करतानाच ती व्यक्ती मृत्युमुखी पडली, असे हे उदाहरण सावित्रीबाईंचेच देता येईल. १८९७ साली महाराष्ट्रात मरणकळा घेऊन आलेल्या प्लेगच्या साथीत दुसर्‍यांना वाचवता-वाचवता सावित्रीबाईंना प्लेग झाला. सारे आयुष्य आणि मृत्यूही समाजासाठीच स्वीकारणार्‍या सावित्रीबाईंची थोरवी, धैर्य आणि कार्य अतुलनीय आहे. संतत्वाच्या कक्षेत सावित्रीबाई या सामाजिक क्रांतिकारी संत होत्या.

होय, त्याच आपल्या एका कवितेत म्हणतात,

सुख दुःख काही स्वार्थपणा नाही

परहित पाही तोच थोर।

मानवाचे नाते ओळखती जे ते

सावित्री वदते तेच संत।

असा हा क्रांतिकारी संतपणा प्रत्यक्षात सावित्रीबाईंकडे होता.

@@AUTHORINFO_V1@@