गुन्हेगारांचे पोशिंदे तुम्हीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2020
Total Views |
edit _1  H x W:

ज्यांची आयुष्ये अन्याय-अत्याचाराने अंधारात गेली, त्यांच्या आयुष्यात न्यायाचा सूर्योदय होण्यासाठी इंदिरा जयसिंगसारख्यांची बुद्धी चालत नाही. म्हणूनच न्याय देण्यासाठी घेतलेल्या वकिलीच्या सनदेचा अन्याय करणार्‍यांना मोकाट सोडण्यासाठी वापर करणारेच खरे गुन्हेगारांचे पोशिंदे ठरतात. कारण गुन्हा करणार्‍यांनाही पक्की खबर असते की, पीडितांपेक्षाही आपल्या मानवाधिकारालाच जास्त किंमत आहे.

 

"आशादेवींचे दु:ख आणि वेदना मी समजू शकते. तरीही मी त्यांना सोनिया गांधी यांचे अनुकरण करायला सांगेन. सोनियांनी ज्याप्रमाणे त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी नलिनी हिला माफ केले आणि आपण मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात असल्याचे सांगितले, तोच कित्ता आशादेवींनी गिरवावा," असा फुकटचा सल्ला सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी दिला. २०१२ सालच्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली व राष्ट्रपतींनीही त्यांची दया याचिका फेटाळली. त्यानंतर २२ जानेवारी रोजी चारही बलात्कार्‍यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार होती. परंतु, त्याचवेळी दोषींनी (मुकेश नामक) पुन्हा एकदा दयेची याचना केली, त्यावरही राष्ट्रपती व दिल्लीच्या न्यायालयाने निर्णय दिला तसेच फाशीची नवी तारीख १ फेब्रुवारी मुक्रर केली.

 

आठ वर्षांपूर्वीच्या अत्यंत घृणास्पद गुन्ह्यातील नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी म्हणून मेणबत्ती मोर्चा काढण्यापासून आपल्या मनातल्या उद्रेकाला वेगवेगळ्या मार्गाने वाट करून देणार्‍यांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब होती, तर आपल्या मुलीच्या गुन्हेगारांना जन्माची अद्दल घडावी, या आशेने घटनेवर विश्वास ठेवून वर्षानुवर्षे न्यायाची वाट पाहणार्‍या निर्भयाच्या आई व कुटुंबीयांसाठी ही समाधान वाटण्याजोगी परिस्थिती होती. मात्र, गुन्हेगारांच्या मानवाधिकारासाठी सातत्याने उभ्या ठाकणार्‍या लब्ध प्रतिष्ठितांपैकी एक असलेल्या इंदिरा जयसिंगांना बलात्कार्‍यांना फाशी होणार म्हणताच जाग आली. पीडितांचा, अत्याचारितांचा टाहो ऐकूनही डाराडूर झोपा काढणार्‍या इंदिरा जयसिंग यांना बलात्कार्‍यांविषयी प्रेमाचा उमाळा दाटून आला.

 

"सोनिया गांधींचा आदर्श घेत निर्भयाच्या आईनेही दोषींना मोठ्या मनाने माफ करून टाकावे," असे त्या लिहू-बोलू लागल्या. मात्र, देशातील महिला व मुलींचे सुदैव असे की, आपल्या मुलीवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍यांना माफी मिळावी, असा अवसानघातकी विचार करणार्‍यांपैकी आशादेवी नव्हत्या व नाहीत. त्यांनी लगोलग वकिलीणबाईंना खडे बोल सुनावत, "मला असा सल्ला देणार्‍या इंदिरा जयसिंग कोण?" असा रोकडा सवाल केला. तसेच "इंदिरा जयसिंग यांच्यासारख्या लोकांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही," असेही त्या म्हणाल्या.

 

इंदिरा जयसिंग यांचा निर्भयाच्या आईला दिलेल्या सल्ल्याचा टिवटिवाट पुढे येताच देशातील अनेकांनी त्याविरोधात आपले मत मांडले. तसेच इंदिरा जयसिंग यांच्याबरोबर वा त्यांच्या कुटुंबीयांबरोबर अशी घटना घडली असती तरी त्या अशाच बोलल्या असत्या का?, असेही विचारले गेले. तथापि, इंदिरा जयसिंगच नव्हे तर देशातल्या कोणत्याही मुली-महिलेवर असा अनवस्था प्रसंग ओढवू नये. पण इंदिरा जयसिंग वा तत्सम लोक नेहमी नेहमी असे का करतात? इंदिरा जयसिंग असो वा अन्य कोणी, ही मंडळी गुन्हेगारांचीच बाजू का घेतात? अशांना पीडितांच्या मानवाधिकाराची काळजी का कधी वाटत नाही? असे प्रश्नही उपस्थित होतात. तर त्याचे उत्तर म्हणजे स्वयंसेवी संस्थांचे जाळे!
 

आपल्याकडे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी येण्याच्या आधी इंदिरा जयसिंग, तिस्ता सेटलवाड वा अन्यांच्या स्वयंसेवी संस्थांनी देशभरात उच्छाद मांडला होता. परदेशातून देणग्या स्वीकारून त्याचा वापर देशहिताविरोधात करायचा, असा या लोकांचा धंदा झाला होता. पुढे मात्र मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी अशा स्वयंसेवी संस्थांच्या कायदेशीर नियमनाची व्यवस्था शिथील झाली होती, ती लागू केली. परकीय देणग्यांचे हिशोब, आलेला निधी कसा खर्च केला वगैरे माहिती देण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले. पण आतापर्यंत आम्हाला कोणी विचारले नाही, आता आम्हाला विचारणारे तुम्ही कोण, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांचे म्होरके विचारू लागले. त्यातलीच एक स्वयंसेवी संस्था म्हणजे इंदिरा जयसिंग यांची ‘लॉयर्स कलेक्टिव्ह!’

 

परदेशी निधीच्या वापरात घोटाळा झाल्याच्या आरोपावरून गेल्यावर्षी सीबीआयनेलॉयर्स कलेक्टिव्ह’च्या कार्यालयांवर छापेमारी केली. त्याआधी २०१६ सालीही ‘लॉयर्स कलेक्टिव्ह’विरोधात अशीच कारवाई करण्यात आली होती, या सगळ्याशी अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशनचा धागाही जुळलेला आहेच. अजूनही यासंबंधीची प्रकरणे प्रलंबित आहेतच, त्यावर नंतर कधीतरी निर्णय येईलही. पण ’लॉयर्स कलेक्टिव्ह’सारख्या स्वयंसेवी संस्थांना परकीय निधी मिळतो, तो मानवाधिकाराच्या मुद्द्यावर पोपटपंची केल्यानेच! म्हणूनच आपली स्वयंसेवी संस्था चालावी व त्यातून आपले आर्थिक गणित सांभाळले जावे, यासाठी अशांकडून मानवाधिकाराचा जप होताना दिसतो. तसे न केले तर या लोकांची दुकानदारी बंद पडण्याचा आणि त्या पैशांतून मिळणार्‍या छानछोकी आयुष्यालाही मुकण्याचा धोका संभवतो.

 

मात्र, यातला आक्षेपार्ह मुद्दा असा की, एखाद्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांना, कसाबसारख्यांनी केलेल्या हल्ल्यात जीव गमावलेल्यांना, हुंडाबळी-घरगुती हिंसाचारग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून हे कायदेपंडित कधीच तोंड उघडत नाहीत. त्यांचे कायद्याचे ज्ञान गुन्हेगारांसाठीच धावून येते आणि त्याची कितीतरी उदाहरणे आहेत. आत्मघाती हल्लेखोर, जिहादी-दहशतवादी, माओवादी-नक्षलवादी यांना शिक्षेतून सवलत मिळावी म्हणून हे लोक रात्रंदिवस काबाडकष्ट करतात.
 

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ वा आताच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील देशविरोधी, हिंदूविरोधी घोषणा देणार्‍यांच्या, काश्मीरची आझादी मागणार्‍यांच्या मागे हे लोक उभे राहतात. इशरत जहाँ असो वा अफजल गुरू, याकूब मेमन असो वा आताच्या निर्भयाच्या दोषींच्या न्यायासाठी हे लोक बाह्या सरसावून मैदानात उतरतात. परंतु, ज्यांची आयुष्ये अन्याय-अत्याचाराने अंधारात गेली, त्यांच्या आयुष्यात न्यायाचा सूर्योदय होण्यासाठी इंदिरा जयसिंगसारख्यांची बुद्धी चालत नाही. म्हणूनच न्याय देण्यासाठी घेतलेल्या वकिलीच्या सनदेचा अन्याय करणार्‍यांना मोकाट सोडण्यासाठी वापर करणारेच खरे गुन्हेगारांचे पोशिंदे ठरतात. कारण, गुन्हा करणार्‍यांनाही पक्की खबर असते की, पीडितांपेक्षाही आपल्या मानवाधिकारालाच जास्त किंमत आहे. आपल्याला शिक्षा होऊ नये म्हणून, बिर्याणी वा कबाब खायला मिळावे म्हणून आणि नंतर माफ करावे म्हणून कोणीतरी न्यायविरोधी पुढे येईलच, याची खात्रीही त्यांना असते.

 

इंदिरा जयसिंग यांनीही तेच तर केले आहे. इथे ‘बच्चों से गलती हो जाती है’, असे म्हणणार्‍या मुलायमसिंग यांची व जयसिंग यांची मानसिकताही एकच असल्याचे दिसते. म्हणूनच निर्भयाच्या आईने जे म्हटले, ते इंदिरा जयसिंगसारख्यांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही, हे पटते. मात्र, आपल्या मानवाधिकाराचा धंदा सुरळीत चालावा म्हणून इतरांच्या मानवाधिकाराला देशोधडीला लावणार्‍यांना देशातली न्यायप्रिय जनता कधीही माफ करणार नाही.


@@AUTHORINFO_V1@@