उद्योगवाढीसाठी महाबीज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2020   
Total Views |

1 Mahabeej _1  


दुबई येथील महाबीज हे आगामी काळात व्यापाराचे नवे दालन निर्माण करून उद्योग व्यावसायिकांसाठी वटवृक्षाचे स्वरूप धारण करेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. केवळ पर्यटन म्हणून बघितले जाणारे दुबई हे राज्यासाठी नवे व्यापारी दालन म्हणून उदयास येणे ही, नक्कीच स्वागतार्ह बाब आहे.

देशातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील उद्योगवाढीस चालना मिळावी, यासाठी न केवळ राज्याच्या तर देशाच्या सीमांचे सीमोल्लंघन होणे, ही काळाची गरज आहे. केवळ पश्चिमेकडील राष्ट्र हीच उद्योगवाढीची व्यासपीठे न बनता तुलनेने प्रगत राष्ट्रांकडे आपला कल वाढविणे, हेच खर्‍या अर्थाने उद्योगवाढीचे गणित असते. दुबई येथे पार पडणारे 'महाबीज' हे महाराष्ट्रातील उद्योगांना सुगीचे दिवस आणण्याबरोबरच राष्ट्रातील इतर राज्यातील उद्योगांसाठीदेखील नवमार्ग निर्माण करणारे ठरण्याची दाट शक्यता आहे. दुबई येथे आयोजित 'महाबीज २०२० परिषदे'मध्ये जगाच्या व्यापाराची माहिती मिळणार आहे.


यावर्षी
'महाबीज' मध्ये १५ पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून युरोपियन देशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. २०१८ च्या 'महाबीज'मध्ये ४१ मोठे नवीन उद्योग सुरू झाले. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. 'महाबीज' म्हणजे दुबईमध्ये व्यापारी-उद्योजकांचा कुंभमेळाच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन दुबईमध्ये व्यवसाय वाढविण्यासाठी सुवर्णसंधी असून त्याचा फायदा करून घेण्याचे आवाहन यानिमिताने गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर, महासचिव विवेक कोल्हटकर यांनी केले.

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर व गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रीयन उद्योगांना साह्य करण्यासाठी दुबई येथे 'महाबीज' परिषद २१ व २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर ही व्यापार, उद्योग, शेती, ग्राहक यांचे प्रतिनिधीत्व करणारी राज्यातील शिखर संस्था असून सन १९२७ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर राज्यातील व्यापार व उद्योगाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. राज्याच्या विकासासाठी राज्यामध्ये परदेशी गुंतवणूक व्हावी, राज्यातील उद्योजक व व्यावसायिकांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी चेंबरच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न होत असतात.

 

याचाच भाग म्हणून चेंबरच्या वतीने सातत्याने विदेशी वकिलातींना भेटी देऊन त्या त्या देशांशी व्यापार व उद्योगाच्या वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. तसेच वेळोवेळी परदेशात चेंबरची प्रतिनिधी मंडळे नेऊन तेथील सरकार व चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर सामंजस्य केले आहे. आजपर्यंत चेंबरने अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. नुकत्याच जून २०१९ मध्ये मलेशियात संपन्न झालेल्या 'मलेशिया फूड अ‍ॅण्ड बेव्हरेजेस एक्झिबिशन'ला भेट देण्यासाठी १२० व्यावसायिक व उद्योजकांचे प्रतिनिधी मंडळ नेले होते. अनेक व्यावसायिकांना या ठिकाणी व्यापार उद्योगांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याचाच पुढील भाग म्हणून चेंबरने दुबईत व्यवसाय, उद्योगवाढीसाठी प्रतिनिधी मंडळ घेऊन जाण्याचे ठरविले आहे.

 

ज्या उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे, ज्या व्यवसायिकांना आपला माल परदेशात पाठवायचा आहे, आयात-निर्यातमध्ये उतरून व्यवसायामध्ये मोठी झेप घ्यायची आहे, अशा उद्योजकांसाठी 'महाबीज २०२० परिषद' एक खूप महत्त्वाची संधी असणार आहे. आज दुबई हे निर्यातवाढीसाठी जगातील महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणाहून आजूबाजूच्या १५ हून अधिक देशांत मालाची निर्यात करणे शक्य आहे. तसेच व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करणेदेखील सोयीचे आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रीय उद्योजकांच्या उद्योगविस्तारासाठी दुबईतील मराठी उद्योजक मंडळींनी पुढाकार घेतला असून मदतीचा हात पुढे केला आहे.

 

महाराष्ट्रातील २०० प्रतिनिधींना या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळणार असून जगातील इतर देशांतील १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यांना परस्पर व्यापाराची देवाणघेवाण करण्याची संधीदेखील यामुळे प्राप्त होणार आहे. त्याच बरोबरीने दुबईत संपन्न होणार्‍या गल्फ फूड एक्स्पोलाही भेट देण्याची संधी या उद्योजकांना प्राप्त होणार आहे. व्यापार उदीमासाठी कायमचा नवीन क्षितिजे निर्माण करणे, हे आधुनिक काळात आवश्यक आहे. दुबई येथील महाबीज हे आगामी काळात व्यापाराचे नवे दालन निर्माण करून उद्योग व्यावसायिकांसाठी वटवृक्षाचे स्वरूप धारण करेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. केवळ पर्यटन म्हणून बघितले जाणारे दुबई हे राज्यासाठी नवे व्यापारी दालन म्हणून उदयास येणे ही, नक्कीच स्वागतार्ह बाब आहे.



@@AUTHORINFO_V1@@