समाजसुधारक सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |


savarkar_1  H x



मागील लेखात सशस्त्र क्रांतिकारक म्हणून सावरकरांविषयी महत्त्वाचे क्रांतिकारक आपल्या भावना कोणत्या शब्दांत व्यक्त करत होते, त्याचा थोडक्यात आढावा घेतला. या भागात आपण त्यांच्या इतर काही पैलूंविषयी काही निवडक मान्यवरांच्या भावना जाणून घेऊ.


सावरकरांची समाजक्रांती


सावरकरांनी केलेले जातिभेदनिर्मूलनाचे काम पाहून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
(डिप्रेस्ड क्लास मिशन) यांनी म्हटले, “सावरकर म्हणजे चालतेबोलते पतितपावन असून आम्ही जे ठरावात मागतो ते इथे रत्नागिरीत प्रत्यक्षात आलेले दिसते.” पुढे महर्षी शिंदे म्हणतात, “हे कार्य करण्यासाठी परमेश्वराने माझे उर्वरित आयुष्य सावरकरांना प्रदान करावे.” महर्षी वि. रा. शिंदे हे अस्पृश्योद्धाराचा ध्यास घेतलेले समाजक्रांतिकारक होते. त्यांच्याकडून सावरकरांच्या कार्याला मिळालेली ही एक मोठी पोचपावती होती.


स्वा
. सावरकरांचे रत्नागिरीतील अस्पृश्यता निवारण आणि जातिभेदनिर्मूलनाचे कार्य पाहून 1929 साली मालवणला भरलेल्या पूर्वास्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद त्यांना एकमताने देण्यात आले. यामध्ये सर्व अस्पृश्य जातींचा समावेश होता. ही परिषद सर्वार्थाने महत्त्वाची होती. या परिषदेत सावरकरांच्या हस्ते पूर्वास्पृश्य बांधवांना जानवी म्हणजे यज्ञोपवीतेही विधिपूर्वक प्रदान करण्यात आली. याप्रसंगी सावरकरांनी सर्व जातींच्या हिंदूंना वेदोक्ताचा, वेद वाङ्मयाचा अधिकार आहे, असे स्पष्ट केले. वेदोक्ताचा वाद होऊन फार काळ लोटलेला नव्हता. अशा वेळेला सावरकरांनी केलेली ही घोषणा त्यांच्या समाजक्रांतीने लांबच लांब झेप घेतल्याचे दाखवून देते. हिंदू समाजाने दूर लोटलेले एक महत्त्वाचे अंग आपल्या अन्यायावर संघटित होऊन वाचा फोडत होते. त्याचे अध्यक्षपद त्यांनी एकमताने स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिले होते. सर्व पूर्वास्पृश्य जाती सावरकरांना आपला मित्र-मार्गदर्शक मानत होते, याला विशेष महत्त्व आहे.


सावरकरांच्या कार्याने आणि वर्तनाने प्रभावित झालेले सत्यशोधक समाजाचे पुढारी माधवराव बागल याप्रसंगी म्हणाले
, “सावरकरांचे हे कार्य पाहून असे वाटते की, असा प्रभावशाली पुरुष जर आम्हाला देशावर मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो.” त्याच प्रसंगी शाहूमहाराजांनी निर्माण केलेल्या क्षात्र जगद्गुरुपदाचे शंकराचार्य म्हणाले की, “वीरपुरुष परिस्थिती निर्माण करतो हे ‘कार्लाईल’चे मत मला पटत नसे, पण स्वा. सावरकरांनी गेल्या पाच वर्षांत जे सामाजिक बदल घडवून आणले ते पाहता हे मत खरे असल्याचे मला दिसून आले.”सावरकरांचे व त्यांच्या अनुयायांचे परिषदेतील वर्तन पाहून पुण्याचे चर्मकार पुढारी राजभोज म्हणाले,“सावरकरांचे निष्कपट व प्रेमळ वर्तन पाहून माझ्या मनातील हिंदू संघटनाविषयीच्या सर्व शंका दूर झाल्या आहेत.”



स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही मुद्द्यांवर एकमत होते तर काही मुद्द्यांवर मतभेद
! स्वातंत्र्यवीर रत्नागिरीतून मुक्त झाल्यानंतर वैयक्तिक आयुष्यात दोघे मित्र बनले. त्यांच्या अनेक गाठीभेटी होत असत, विविध विषयांवर दोघे चर्चाही करत असत. इतकेच नव्हे, तर काही निवडणुकांत संयुक्त उमेदवाराचा प्रचारही त्यांनी एकाच व्यासपीठावरून केलेला होता. (संदर्भ : सावरकर चरित्र हिंदुसभा पर्व-भाग १, लेखक बाळाराव सावरकर)



त्या दोघांचे नेमके मतभेद कोणत्या विषयावर होते आणि कोणत्या विषयात त्यांची सहमती होती
, यावर एक स्वतंत्र लेखच होईल. पुढील लेखांमधून ते सर्व तपशील मांडण्याची संधी मिळेलच. सांप्रत लेखाच्या अनुषंगाने एवढे नक्की म्हणता येते की, सावरकरांचे अस्पृश्यता आणि जातिभेदनिर्मूलन या कार्याचे महत्त्व आंबेडकरांना चांगलेच माहीत होते. सावरकरांचे रत्नागिरीतील कार्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी आंबेडकरांना मिळू शकली नाही. रत्नागिरीत आंबेडकर, सावरकरांचे कार्य पाहण्यास येऊ शकले नाहीत, तरी त्यांच्या कार्याची महती आंबेडकरांनी सावरकरांना पाठवलेल्या पुढील पत्रात व्यक्त केली, conveying to you my appreciation of the work you are doing in the field of social reform. If the untouchables are to be part and parcel of the Hindu society, then it is not enough to remove unaccountability; for that matter you must destory chaturvarnya. I am glad that you are one of the very few who have realised this.

(संदर्भ : सावरकरचरित्र, लेखक-धनंजय कीर)



गुण गाईन आवडी


आपल्या
, दक्षिण भारत दौर्‍याच्या वेळी सावरकरांची आणि ‘रामन इफेक्ट्स’ या शोधासाठी प्रख्यात असलेले नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर रामन यांची भेट झाली. याप्रसंगी डॉ. रामन सावरकरांविषयी म्हणाले त्याचा भावार्थ असा, मी आजवर अनेक तेजस्वी पण निर्जीव हिरे पाहिले, पण आज मी सावरकरांच्या रूपात सर्वात तेजस्वी असा जिताजागता हिरा प्रत्यक्ष पाहतो आहे, जो आपल्या हिंदुसमाजाला सत्याचे मार्गदर्शन करत आहे. (Sir C.V. Raman, the celebrated Noble Prize-winner scientist of Bharat met Savarkar, he exclaimed, Till now many have been the variety of brilliant but lifeless precious stones that I have come across. However, today I feel blessed on seeing a most brilliant and full-blooded living diamond that radiates to effulgence of truth to our Hindu Society.)


कवी म्हणून सावरकरांचे मोठेपण तर वादातीत आहे
. त्यात त्यांचे निम्म्याहून जास्त काव्य, मोठ्या कष्टाने साधने मिळवून काळ्या पाण्याच्या जन्मठेपेच्या छायेत लिहिल्याने त्याचे एक वेगळेच महत्त्व आहे. काव्य लिहिण्यासाठी, कारागृहाच्या भिंतींचा कागद आणि घायपाताचा काटा इतक्याच साधनांची उपलब्धता असली, तरी सावरकरांच्या उत्तुंग प्रतिभेला कशाचीच मर्यादा नव्हती. या काव्याबरोबरच ते काव्य गुप्तपणे अंदमानातून बाहेर धाडण्याचा इतिहासही अद्भुत आहे. असो!


साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांनी सावरकरांच्या काव्याची तुलना कालिदासाच्या कवितेच्या सामर्थ्याशी केली आहे
. नामवंत १३० साहित्यिकांनी सावरकरांना १९६०साली मानपत्र दिले. त्यात त्यांनी सावरकरांना ‘क्रांतदर्शी महाकवी’ अशी उपाधी दिली होती. खंडकाव्य किंवा महाकाव्य रचतो तो महाकवी आणि सहजता, उत्कटता, रम्य कल्पना, गेयता अशा सगळ्या अंगांनी नटलेली कविता या दोन्ही अर्थाने सावरकर महाकवी ठरतात. त्यांचे एकेक काव्य वैविध्यपूर्ण असे आहे. ‘ने मजसी ने...’, ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’ हे स्वतंत्रता देवीचे गीत, ‘हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ हे शिवाजी महाराजांचे वंदन अशी देशभक्तिपर गीते; तर ‘सुनील नभ हे, सुंदर नभ हे’ यासारख्या भावपूर्ण कविता, सप्तर्षी किंवा ‘अनादि मी अवध्य मी’ (आत्मबल) यासारख्या आध्यात्मिक स्पर्श असणार्‍या कविता, ते ‘थेट माडीवरूनी सुंदर कन्ये मी पाहियले तुलाकाही शृंगारिक कविताही सावरकरांनी रचलेल्या आहेत. या सर्व दृष्टींनी महाकवी म्हणून त्यांचे श्रेष्ठत्व साहित्यिकांनी मानले. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही एक वर्ष त्यांची निवड झाली होती. नागपूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (D. Lit.)ही उपाधी सन्मानपूर्वक दिली होती. स्वतः महाकवी असलेले डॉ. श्री. भा. वर्णेकर यांनी व्याख्या केली आहे की, जो सावरकरांच्या ‘कमला’सारखी काव्यरचना करू शकेल तो महाकवी! नागपूरचे थोर कविवर्य बोबडे म्हणतात,

कालिदास कविश्रेष्ठ, रवींद्रनाथ तयासम।

सावरकर परी झाले, महाकवी निजोपम॥

साहित्यसम्राट न. चिं. केळकर म्हणतात, “सावरकरांचे ‘कमला’ काव्य वाचून ‘रघुवंशा’तील एखादा स6र्ग वाचल्यासारखे वाटते.” महाकवी कालिदासाला जसे ‘दीपशिखा कालिदास’ असे गौरवले जाते तसे सावरकरांना ‘गजेंद्रकमल विनायक’ असे म्हटले पाहिजे, असे समीक्षक डॉक्टर के. ना. वाटवे म्हणतात. (संदर्भ : शतपैलू सावरकर, लेखक ह. त्र्यं. देसाई)


कवी वा
. गो. मायदेव यांनी सावरकरांच्या काव्याचे विविध पैलूंचे दर्शन घडवणारेसावरकर काव्य समालोचन’ हे पुस्तक संपादित केले आहे. ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्रमाझा’सारखी सुंदर गीते लिहिणारे कविवर्य राजा बढे यांनी सावरकरांवर ‘नवनवोन्मेषशाली कवींचे कवी’ अशा शब्दांत गीतरचना केली आहे.ही सर्व मंडळी सर्वसामान्य नसल्याने या सर्वांच्या साक्षी सर्वार्थाने महत्त्वाच्या ठरतात.


सर्व पक्षीय स्वागत आणि मानपत्र


स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानबद्धतेतून सुटल्यावर अनेक पक्षांच्या आणि विचारसरणीच्या नेत्यांनी त्यांचा मुंबईत भव्य सत्कार केला
. २८ जून, १९३७ या दिवशी सावरकर रेल्वेस्थानकात उतरताच त्यांच्या जयघोषाने आसमंत निनादून गेला. यानंतरच्या सभेत बोलताना पाऊस सुरू झाल्याने त्यांच्यावर छत्री धरण्यात आली. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ती नाकारून म्हटले की, “तुम्ही सर्व जण पावसात भिजत असताना मी एकटाच छत्री घेऊन भाषण करणे योग्य नाही.” त्यानंतर पावसात भिजतच त्यांनी भाषण केले. (संदर्भ :हिंदुसभापर्व) या सभेत सर्व पक्षांच्या काँग्रेस, हिंदुमहासभा, साम्यवादी, समाजवादी, लोकशाही स्वराज्य पक्ष व इतर अनेक) आणि तत्कालीन विविध विचारसरणीच्या नेत्यांच्या वतीने सर्वसहमतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना देण्यासाठी सुमारे पाचशे शब्दांचे एक मानपत्र तयार करण्यात आले. त्यातील महत्त्वाचा भाग पुढीलप्रमाणे,

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर!
महाशय,

तुमच्या अंगातील लोकोत्तर सद्गुणांचा ग्रास करू पाहणार्या दीर्घकालीन बंधनातून पूर्णपणे मुक्त होऊन तुम्ही या आमच्या मुंबापुरीला पूर्ण स्वतंत्र नागरिक या नात्याने आलात. आज आम्ही मुंबईचे नागरिक तुमचे हर्षभराने सप्रेम स्वागत करतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीने गांजलेल्या आपल्या या प्रिय मातृभूमीला मुक्त करण्यासाठी तुम्ही आजपर्यंत जो अलौकिक स्वार्थत्याग केलात त्याच्या जाणिवेमुळे आपलेस्फूर्तिदायक दर्शन आमच्या अंतःकरणाला कृतज्ञतेचे भरते आणीत आहे. हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यावरील आपली निष्ठा आणि प्रेम हे सर्वश्रुत आहेत. आपल्या धर्मप्रेमातील विशेष गोष्ट ही की, ती अंधश्रद्धेने मलिन झालेले नाही. धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम यांची सांगड घालून देण्यातही आपण अपूर्व यश मिळवले आहे. आपण यापुढे जे राष्ट्रकार्य कराल ते आपणास लाभलेल्या स्वातंत्र्यवीर या पदवीस शोभेसे असेच असेल, असा आम्हाला भरवसा वाटतो. आपल्या उज्ज्वल चरित्रामुळे आपल्या देशबांधवांमध्ये नवचैतन्याची ज्योत प्रज्वलित होवो...






-चंद्रशेखर साने
@@AUTHORINFO_V1@@