लोकमान्य टिळक आणि शिवजन्मोत्सव (भाग ४)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020
Total Views |


tilak shivjanmostav_1&nbs



मराठे-ब्राह्मण हा वाद तसा फार जुना आहे. जातीय आवेश ही आपल्या देशातील लोकांमध्ये फार खोलवर जाऊन बसलेली विषवल्ली आहे, हे टिळक फार चांगल्या रीतीने जाणत होते. महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरी सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी ब्राह्मण आणि मराठे यांनी एकत्र येणे हे किती गरजेचे आहे, हे टिळकांसारख्या द्रष्ट्या नेत्याला ठाऊक नसेल तर नवलच. इतिहासही तेच सांगत होता. ब्राह्मण आणि मराठे एकत्र येऊन लढले तेव्हाच मोठमोठ्या संकटातून महाराष्ट्र सावरू शकला याचे दाखले टिळकांच्या नजरेसमोरून हलत नव्हते, म्हणूनच ब्राह्मण-मराठ्यांची युती टिळकांना फार महत्त्वाची वाटत होती, त्यासाठी टिळक प्रयत्न करत होते. आज भोवतालच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण-मराठे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी एखादा तरी लोकमान्य पुढारी पाय रोवून उभा आहे का?



लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंतीच्या उत्सवाबद्दल बरेच लिहून झाले
, याबद्दल हेतुपूर्वक पसरवलेल्या गैरसमजुतींचा समाचार घेतला. आता जवळपास सव्वाशे वर्ष उलटून गेली तरीही शिवजन्मोत्सव हा निरनिराळ्या गोष्टी सामावून घेत आजही सुरू आहे, त्यात कालानुरूप अनेक हवे नको ते (नको तेच जास्त) बदल झाले आहेत. परंतु, सुरुवातीच्या काळात टिळक हयात असताना ते या उत्सवाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघत होते ते आता जाणून घेऊया.



दि
.१५ एप्रिल, १८९६ रोजी शिवजयंतीचा पहिलावहिला उत्सव साजरा झाला आणि त्यानंतर टिळकांनी लोकांमधील जोम टिकून राहावा म्हणून ‘केसरी’तून आपले लेखन सुरूच ठेवले, ते गरजेचे होतेच. एखादा विषय संपला की त्याच्याबद्दल पुन्हा नव्या जोमाने विचार करण्याची, त्यातील ताजेपणा टिकवून ठेवण्याची वृत्ती आपल्यात फार क्वचित दिसते, पटकन शांत होण्याची सवय ही तेव्हापासून आहे बरं का? टिळक लोकांची ही मानसिकता अचूक जाणून होते, त्यांना आपल्या देशबांधवांच्यातील हा दुर्गुण ठाऊक होता, म्हणूनच तापलेला तवा तसाच गरम ठेवणे त्यांना गरजेचे वाटत होते.



आपल्याकडे कुणी महापुरुष म्हणून गणला जाऊ लागला की लगेचच त्याला देवत्व बहाल करण्याची सवय लोकांना झालेली आहे
. एखाद्याला देवत्व बहाल केले की मग त्याच्याकडून आपण चमत्कारांची अपेक्षा करतो आणि त्या व्यक्तीने घालून दिलेल्या आचरणशीलतेचा मार्ग आपण विसरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत टिळकांना हे नको होते, म्हणूनच शिवाजी महाराज अवतारी पुरुष होते का? आजच्या काळात शिवाजी महाराजांकडून समाजाने कसे आदर्श घ्यावेत, याचे बाळकडू टिळकांनी समाजाला दिले. टिळक लिहितात, “श्री शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष नव्हते असे आम्ही म्हणत नाही. ज्या थोर पुरुषांनी इतिहासात आपली नावे अजरामर करून ठेवली आहेत त्यांस ईश्वराचे साहाय्य नव्हते असे कोण म्हणेल? कोणत्याही कर्त्या पुरुषास ईश्वराचे अशा प्रकारचे साहाय्य असल्याखेरीज त्याच्या हातून देशहिताची मोठमोठी कार्ये होऊ शकत नाहीत. जरी अशा रीतीने ईश्वराची कृपा पुरुषावर असली तरी त्यांचा जो आम्ही उत्सव करतो तो ते मार्गदर्शक थोर पुरुष होते म्हणून करतो; केवळ अवतारी पुरुष होते, अशा दृष्टीने नव्हे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे.” (समग्र टिळक खंड ४ - पान ३५)



खरंतर गणेशोत्सवाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हा उत्सव समाजातील ब्राह्मण मंडळींचा आहे
, पूजाअर्चा, कर्मकांड यात लोकांना गुंतवून ठेवणारा आहे, अशा प्रकारची चर्चा सुधारक मंडळी करू लागले होते, हे आधी सांगितले आहेच. त्यावेळच्या चर्चेला टिळकांनी उत्तर देऊन हा उत्सव कसा राष्ट्रीय आहे, त्याचे ध्येय कसे मोठे आहे हे सांगितले होते. इथे शिवजयंतीच्या संदर्भात तर शिवाजी महाराजांना देवत्व बहाल होण्याचा धोका अधिक होता, म्हणून सुरुवातीपासून टिळकांना मुख्य हेतू काय, कसा आणि कुठल्या मार्गाने साध्य करून घेता येईल हे सांगणे अधिक हिताचे वाटले असावे. असे अनेक संभाव्य धोके टिळकांनी ओळखले असावेत. या धोक्यांबद्दलही टिळकांनी लिहिले आहे, टिळक म्हणतात, “श्रीशिवछत्रपतींचा उत्सव करण्याचे काय हेतू आहेत हे रायगडावर जी भाषणे झाली त्यात स्पष्ट करून दाखविले होते; तथापि अद्याप कित्येक लोक त्याबद्दल आपला गैरसमज करून घेतात ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट होय. कित्येकांस या उत्सवापासून ब्राह्मणांखेरीज इतरांचे काही कल्याण व्हावयाचे नाही असे वाटत आहे व कित्येकांस अशी धास्ती आहे की, हा उत्सव लवकरच रामनवमीच्या थाटावर जाऊन त्यापासून होण्यासारखे जे हित आहे ते सर्व नाहीसे होईल. परंतु, या व असल्याच प्रकारच्या दुसर्‍या कित्येक शंका अगदी निराधार आहेत हे आम्ही खात्रीने सांगू शकतो.” (समग्र टिळक खंड ४ - पान ३४)



टिळकांचा रोख नेमक्या कोणत्या गैरसमजांबद्दल आहे याची आपण पुढे चर्चा करूच
, पण तत्पूर्वी शिवजयंतीपासून समाजाने नेमके काय घ्यायला हवे, त्याची सुरुवात कोणत्या हेतूने झाली आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे, हे टिळक सांगतात. एखाद्या कुळाचाराप्रमाणे थोर पुरुषांचे उत्सव व्हायलाच हवेत, माझे कर्तव्य म्हणून मी हे देशकार्य हाती घ्यायला हवे आणि याच हेतूने शिवाजी राजांचा उत्सव सुरू केला जात आहे. टिळकांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ज्याप्रमाणे आम्ही आपल्या वाडवडिलांचे स्मरण कायम ठेवून त्याच्या योगे आपल्या घराण्याचा पूर्वापार चालत आलेला लौकिक राखण्याचे एक साधन करून ठेवतो तद्वतच राष्ट्रातील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगले साधन आहे, असे टिळक म्हणतात.



ज्या लोकांना शिवाजी महाराजांच्या नावाने एकत्र यायला टिळक सांगत होते
, ते लोक मात्र जातीपातीच्या भांडणात फार पूर्वीपासून व्यग्र होते. एक राष्ट्रीयत्व हे या जातींच्या भांडणात पार विरून गेले की काय, अशी अवस्था होती. ब्राह्मण-मराठे वाद हे त्याही काळात होतेच. टिळकांना मात्र यानिमित्ताने ब्राह्मण वाद मिटवण्याची, समेट घडवून आणण्याची आयती संधीच चालून आल्यासारखे झाले. जातीय आवेश ही आपल्या देशातील लोकांमध्ये फार खोलवर जाऊन बसलेली विषवल्ली आहे हे टिळक फार चांगल्या रीतीने जाणत होते, शिवाजीचा उत्सव हा मूठभर ब्राह्मणांनी सुरू केला असे जर लोकांना वाटू लागले तर पुन्हा एकदा समेट घडून येण्याऐवजी त्यांच्यातील दरी वाढेल, भांडणे ताणली जातील हे टिळकांनी ओळखले होते. महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरी सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी ब्राह्मण आणि मराठे यांनी एकत्र येणे हे किती गरजेचे आहे, हे टिळकांसारख्या द्रष्ट्या नेत्याला ठाऊक नसेल तर नवलच.



इतिहासही तेच सांगत होता
. ब्राह्मण आणि मराठे एकत्र येऊन लढले तेव्हाच मोठमोठ्या संकटातून महाराष्ट्र सावरू शकला याचे दाखले टिळकांच्या नजरेसमोरून हलत नव्हते, म्हणूनच ब्राह्मण-मराठ्यांची युती टिळकांना फार महत्त्वाची वाटत होती. जातीय मुद्द्यांवर टिळकांनी खडसावून लिहिले आहे. टिळक म्हणतात, “महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातींचे प्रेम एकाच ठिकाणी बसण्यासारखे जर कोणतेही स्थळ असेल तर ते शिवछत्रपतींचे चरित्र हेच होय. हे छत्रपतींचा उत्सव करणार्‍या सर्व लोकांनी नेहमी ध्यानात बाळगावयास पाहिजे. या उत्सवात मराठे आणि ब्राह्मण, अगर ब्राह्मण अगर प्रभू अशा प्रकारचा कोणताही भेद ठेवणे अगदी गैरशिस्त आहे.



यंदाच्या उत्सवात एक
-दोन ठिकाणी असा प्रकार झाल्याचे ऐकिवात आहे व ही गोष्ट जरी खरी असेल तर वेळीच तिचा बिमोड केला पाहिजे. रायगडावर ज्या तीन हजार लोकांस महाराजांचा प्रसाद म्हणून अन्न वाटण्यात आले, ते सर्व मराठे होते व पांढरपेशा लोकांस प्रसाद न देता आधी तो सदर मराठे मंडळींस देण्यात आला ही एक मुद्द्याची गोष्ट आहे. रायगडावरील उत्सवात ब्राह्मण भोजनाची रेलचेल होईल, असे खोटेच प्रतिपादन करणार्‍या लोकांनी इकडे विशेष लक्ष पोहोचवले पाहिजे.” या वादावर कायमचा पडदा पडावा आणि लोकांची मती जागृत व्हावी म्हणून पुढे तर टिळकांनी ‘शिवाजी आणि ब्राह्मण’ अशा शीर्षकाचा एक लेखही लिहिला होता. मंडाले इथे गेल्यानंतर टिळकांनी आपल्याला कुठली कुठली पुस्तके भविष्यात लिहायची आहेत याची एक यादी केली होती त्यात संकल्पित होते ते शिवचरित्र! सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राला दिशा देणारे शिवचरित्र दुर्दैवाने टिळकांच्या हातून लिहून झाले नाही. ते लिहून झाले असते तर किती बरे झाले असते ना!

(क्रमशः)

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@