इंडिया की भारत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |
India of India_1 &nb
 
 
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध भाषा, प्रांत, पंथ, धर्म, चालीरीती अशी सगळी वैशिष्ट्ये असलेला जगाच्या पाठीवरील एकमेव देश म्हणजे भारत! हजारो वर्षांपासून भारताची संस्कृती टिकून आहे. तिच्यावर अनेक आघात झाले, पण सगळे आघात सहन करूनही भारतीय संस्कृती दिमाखात वाटचाल करते आहे. वैविध्य असल्याने कोणत्याही मुद्यावर सगळ्यांचे एकमत होणे शक्य नाही. शिवाय, आपल्या संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला विचारस्वातंत्र्य दिले आहे. ते अबाधित आहे. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. विचारभिन्नता हे जगातल्या सगळ्यात मोठ्या भारतीय लोकशाहीचे आगळेवेगळे वैशिष्ट्यही आहे. विचारशून्यतेपेक्षा विचारभिन्नता ही जास्त महत्त्वाची आहे. कारण, त्यामुळे लोकशाहीत जिवंतपणा येतो, तो प्रसंगी जाणवतोही. मतभेद असण्यात गैर नाही. मनभेद व्हायला नको. ते सामाजिक सौहार्दाला तडा देऊन जातात. त्यामुळे विचारभिन्नता, मतभेद याचे नेहमी स्वागतच व्हायला हवे. पण, दुर्दैवाने आपल्या देशात सध्या जे वातावरण निर्माण करण्यात आले आहे, त्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आल्यासारखे दिसते आहे. विचारधारांचा संघर्ष पाहायला मिळतो आहे. तो एका विचारधारेने जाणीवपूर्वक निर्माण केला आहे. विचारधारांमध्ये संघर्ष आपल्यासाठी नवीन नाही. पण, या संघर्षातून जर वैमनस्य आणि उन्माद पसरणार असेल तर तो या विशालकाय देशातील अंतर्गत व्यवस्थेला मोठा धोका मानला पाहिजे.
 
 
 
केंद्रात भाजपेतर सरकार असेपर्यंत सगळे सुरळीत होते. पण, कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआची सत्ता गेली, डाव्यांची बंगालमधील राजवट खालसा झाली आणि कॉंग्रेससह डाव्यांनी मोदी सरकारविरोधात देशातील जनमानस कलुषित करण्याचे आखलेले षडयंत्र आज उत्पात माजवताना दिसत आहे. केंद्रात 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले, या सरकारने पाच वर्षांत अनेक मोठमोठी कामे करून 2019 च्या निवडणुकीत 2014 पेक्षाही मोठा विजय संपादन केला. अर्थात, सरकारने केलेल्या कामांवर जनतेने शिक्कामोर्तब केले. पण, जनतेने उखडून फेकलेल्या डाव्यांना हा बदल अजूनही रुचलेला नाही, पचला तर मुळीच नाही. मोदींचा दुसरा विजय तर त्यांच्या जिव्हारी लागलेला दिसतोय्‌. एकीकडे भाजपा, संघ यांना संविधानाचे धडे देण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे संवैधानिक मार्गाने निवडून आलेले मोदी सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करायचा, हा डाव्यांचा आणि कॉंग्रेसचाही दुटप्पीपणा आता जनतेच्या लक्षात आला आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा आणि नंतर केरळ आणि त्रिपुरा हे डाव्यांचे गड होते. त्यानंतर बंगाल, तामिळनाडू आणि आंध्रातही डाव्यांची उपस्थिती जाणवायला लागली होती. बंगालमध्ये तर तब्बल तीस वर्षे डाव्यांची अनिर्बंध सत्ता राहिली. आज केरळचा अपवाद सोडला, तर अन्य भागांतून डाव्यांचा सफाया झाला आहे.
 
 
 
1990 च्या दशकात सोव्हियत युनियनमध्ये साम्यवादाच्या अंताचा प्रारंभ झाला होता आणि साम्यवादी चीनमध्ये उदारमतवादाच्या अभ्युदयाने साम्यवादाचा पायाच हलायला सुरुवात झाली होती. भारतात तर डाव्यांच्या अस्मितेलाच ग्रहण लागले. ही अस्मिता जपण्यासाठी डाव्यांना शहरी नक्षलवाद आणि हिंसाचाराचा आधार घ्यावा लागतो आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात वारंवार होत असलेल्या हिंसाचाराच्या घटना काय दर्शवितात?
 
 
हिंसाचाराचा आधार घेत आपली अस्मिता टिकविण्याचे केविलवाणे प्रयत्न डाव्यांकडून सुरू आहेत. डाव्यांचे जे शीर्षस्थ नेते आहेत, ते डाव्या चळवळीतील विद्यार्थ्यांच्या हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत. देश पाहतो आहे. डाव्यांची पाळेमुळे केव्हाच ढिली झाली आहेत. ती केव्हा उखडून जमिनीवर येतील, हे येणार्‍या काळात दिसेलच! कारण, डावे हे देशाला ‘इंडिया’ म्हणून बघतात, तर भाजपासारखे सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणारे पक्ष ‘भारत’ म्हणून बघतात. आपल्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासून तो वाढविण्यासाठी गरजेचा असलेला विश्वगुरू भारत हवा आहे, डाव्यांच्या स्वप्नातला हिंसक इंडिया नको आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
 
तसे पाहिले तर भारतातली लोकशाही हे वैचारिक स्पर्धेचे खुले व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर येऊन कुणालाही आपले विचार व्यक्त करता येतात. त्याचा अनुभव देश घेत आहे. मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी पद्धतशीरपणे कारस्थाने केली जात आहेत. देशात असहिष्णुता असल्याचे सांगत पुरस्कार वापसी झाली, अन्य प्रकारही घडवून आणले गेले. सगळे प्रयत्न फसल्यानंतर देशात भीतीचे वातावरण असल्याचा आभास निर्माण करण्याचे वायफळ प्रयत्न सुरूच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याबाबतीत अतिशय अभद्र भाषेचा वापर केला जातो, त्यांना वारंवार खलनायक ठरविले जाते, तरीसुद्धा कुणावरही कोणतीही कायदेशीर कारवाई मोदी सरकारने केलेली नाही. बेलगाम होऊन कुणीही उठतो आणि लायकी नसतानाही मोदी-शाह यांच्यावर टीका करतो, त्यांच्या मनात जे येईल ते बोलतो आणि असे असूनही तो एकदम मोकळा श्वास घेतो. कुठे आहे असहिष्णुता? कुठे आहे दडपशाही? असहिष्णुता आहे असे म्हणणारे लोक ढोंगी आहेत, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. खरेतर जे लोक देशाला इंडियाच्या रूपात परिभाषित करीत आहेत ना ते स्वत:ला प्रगतिशील, डावे मानतात आणि जे लोक देशाला भारताच्या रूपात बघतात त्यांना उजवे, प्रतिगामी, अनुदार, असहिष्णू, हिंदुत्ववादी संबोधून हिणवण्याचे मोठे षडयंत्र आकारास आले आहे, ते हाणून पाडले नाही, तर उद्याचा भारत कसा असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
 
 
 
खरेतर इंडिया आणि भारत ही परस्परविरोधी विचारधारांची प्रतीकं आहेत. इंडिया या शब्दाचा उच्चार हा सर्वप्रथम सतराव्या शतकात झाला. भारत हा शब्द तर हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. भारताच्या संकल्पनेत ‘वयं ब्रह्मास्मि’ अर्थात आम्ही सगळे ब्रह्म आहोत आणि ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ अर्थात संपूर्ण धरा हा एक परिवार आहे, असा उन्नत, व्यापक विचार समाहित आहे. डाव्या-उजव्यात काय अंतर आहे, हे आपल्याला यावरून लक्षात यावे. कोणता विचार श्रेष्ठ आहे, कोणता विचार देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो, याचीही कल्पना आपल्याला वरील फरकातून लक्षात येईल. आता प्रश्न आहे, कुणी कोणत्या विचारधारेची निवड करायची? देशात विचारस्वातंत्र्य आहे, निर्णयस्वातंत्र्य आहे. प्रत्येकाने आपल्या विवेकाला अनुसरून निर्णय करायचा आहे. इंडिया या शब्दाचा वापर करून आम्हाला युरोपीय लोकशाहीमूल्ये, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचे धडे शिकवून शिष्ट बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, अशा प्रयत्नांपूर्वीच म्हणजे हजारो वर्षांपासून समानता, बंधुत्व, विचारस्वातंत्र्य हे आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहे, अविभाज्य घटक आहेत, याचा विसर आमचा आम्हालाच पडला, हे अतिशय दुर्दैवी होय. देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणारी संघटना अतिशय मजबुतीने काम करते आहे, विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण रीतीने काम करते आहे, समाजात समरसता निर्माण करण्यासाठी झटते आहे आणि म्हणूनच भारताची वाटचाल विश्वगुरू होण्याकडे सुरू आहे, आपली हजारो वर्षे जुनी संस्कृती टिकून आहे, हे कुणी मानो अथवा न मानो, शंभर टक्के सत्य आहे!
@@AUTHORINFO_V1@@