ठाणे ते शांघाय - एका उद्यमीची गरुडभरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020   
Total Views |

Dharmu Vanjani 1 _1 


एका कंपनीत कार्यरत असणारा एक इंजिनिअर अपघाताने व्यावसायिक बनला. आपल्या कुशाग्र बुद्धीने आणि सर्जनशीलतेमुळे नवनव्या संधींची दारे त्याच्यासमोर उघडत गेली. ब्रशलेस मोटार बनवण्याचा त्याचा व्यवसाय देशविदेशापर्यंत पोहोचला. 'एस. एस. नातू प्लास्टिक्स अ‍ॅण्ड मेटल्स प्रा.लि.'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मू वंजानी यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

धर्मू आसुदोमल वंजानी यांचा जन्म १ नोव्हेंबर, १९५४ रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील आसुदोमल वंजानी हे रेल्वेत नोकरीला होते. त्यांचे संपूर्ण बालपण हे मध्य प्रदेशातलेच. उज्जैन येथील पॉलिटेक्निकल महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात त्यांना मुंबई गाठावी लागली होती. मुंबईत हक्काचे घर नसल्याने सुरुवातीची पाच वर्षे ते आपल्या मामाच्या घरीच राहिले. दुसरीकडे नोकरीची शोधाशोध सुरू होतीच. १९७७ साली 'लॉकीम' या गोदरेजच्या उपकंपनीत ते 'अभियंता' म्हणून रूजू झाले. कामगार संघटनांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे सदर कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम जाणवू लागला होता. यावर तोडगा काढण्यासाठी कंपनीतील अधिकार्‍यांची त्यावेळी बैठक झाली होती. या बैठकीत वंजानी यांनी कंपनीचे काम हे कंत्राटी तत्त्वावर देण्याचा सल्ला दिला. हा सल्ला व्यवस्थापनाला आवडला. मात्र, कंत्राट देणार कुणाला, हा प्रश्न होता. त्यावर अधिकार्‍यांनी एकमताने धर्मू वंजानी यांचेचे नाव सुचवले होते.


आता सल्ला तर दिला होता
, मात्र अचानक कंपनीचे एवढे मोठे कंत्राट सांभाळणे, हे वंजानी यांच्यासाठी आव्हानात्मकच होते. त्यांच्या कुटुंबीयांनाही याविषयी काहीएक कल्पना नव्हती. अशाप्रकारे अचानक नोकरी सोडून इतर व्यवसायाकडे वळावे लागेल, असा साधा विचारही त्यांनी केला नव्हता. त्यांच्या कुटुंबात व्यवसायात शिरणारे ते पहिलेच होते. त्यामुळे उद्योग आपल्याला जमेल का, याबद्दल त्यांच्या मनात साशंकता होती. मात्र, वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासावर त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. त्यावेळी 'पारस इंडस्ट्रीज' या आपल्या मुलाच्या नावाने त्यांनी कंपनी स्थापन केली. हळूहळू कामाचा पसारा वाढू लागला. कंपनीची तीन युनीट सुरू झाली होती. सारं काही अगदी सुरळीत सुरू होते. मात्र, वंजानी यांचा मूळ स्वभाव त्यांना शांत बसू देत नव्हता. नोकरी करत असताना त्यांनी संगणकीकृत प्रणाली तयार केली होती. अमेरिकेत राहणार्‍या त्यांच्या काकांनी त्यांना सर्वात आधी 'ब्रशलेस बी. एल. डी. सी. मोटार'ची ओळख करून दिली होती.


वंजानी यांनी हे मोटार बनविण्याचे कंत्राट घेतले
. १९९५ मध्ये 'लॉकिम'च्या कंत्राटाची जबाबदारी दुसर्‍याकडे सोपवून त्यांनी 'ब्रशलेस मोटार' बनविण्याच्या व्यवसायाचा शुभारंभ केला. 'एस. एस. नातू प्लास्टिक्स अ‍ॅण्ड मेटल्स प्रा.लि.' ही कंपनी चालवायला घेतली. त्याकाळी अमेरिकेत दहा हजार इलेक्ट्रिकल स्कूटरसाठी लागणार्‍या मोटार बनविण्याचे कंत्राट त्यांना मिळाले, अशी मोटार बनवणारी भारतातील ही पहिलीच कंपनी होती. २००२ साली एका व्हेंचर कॅपिटलकडून त्यांना तीस हजार मोटारींची ऑर्डर मिळाली. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर मोटारींचे उत्पादन करणे त्यावेळी वंजानी यांना शक्य नव्हते. त्यावरही एक तोडगा निघाला.


हे सर्व काम शांघाय येथील एका कंपनीसोबत मिळून करण्याचा सल्ला ऑर्डर देणार्‍या कंपनीने दिला
. ठाण्यातून मराठमोळे कर्मचारी आणि अधिकारी शांघायला, तेथील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी निघाले. 'कटलर मॅक मोटर्स' असे या कंपनीचे नाव होते. याच कंपनीने वंजानी यांना ४९ टक्के समभाग दिले. ३० हजार मोटारींच्या उत्पादनासाठी लागणारा निधी उभारण्यासाठीही मदत केली. जो चीन इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारा प्रमुख देश म्हणून ओळखला जातो, त्या चीनला वंजानी यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची गरज पडली होती. चीनमध्येही वंजानी यांनी चांगलाच जम बसवला होता. मात्र, २००९ साली मोटार आयात करणारी कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि कंपनीचा हा एकच ग्राहक असल्याने सतत नऊ महिने कंपनीकडे कामच नव्हते.


वंजानी यांचा मूळ स्वभाव काही त्यांचा पिच्छा सोडत नव्हताच
. सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड त्यांनी त्यावेळीही कायम ठेवली. काम तर फारसे नव्हते. त्यामुळे नवा शोध घेण्यासाठी आता त्यांच्याकडे पुरेसा वेळ होता. 'ब्रशलेस डी.सी मोटार'मध्येच संशोधन करून त्यांनी या काळात सौरउर्जेवर चालणारा पंखा (सिलिंग फॅन) तयार केला होता. घरगुती किंवा कार्यालयात लागणार्‍या या पंख्यातील विजेवर चालणार्‍या मोटारीऐवजी त्यांनी आपल्या कंपनीतील मोटार बसवली होती. यामुळे विजेच्या बिलात लक्षणीय घट होणार होती. हे पंखे रिमोटवर चालणार असल्याने वेग नियंत्रण, वेळ नियंत्रण, एलईडी आदी अत्याधुनिक सोयी या पंख्यात होत्या.


वीजबचत करण्यासाठी लागणारे हे उत्पादन बाजारात आणण्याचा निर्धार त्यांनी पक्का केला होता
. मात्र, बाजारात उतरण्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी कर्ज घेण्याची गरज होती. परंतु, सुरुवातीपासूनच कर्ज घेऊन व्यवसाय करायचा नाही, या तत्त्वाशी खुणगाठ बांधून काम करणार्‍या वंजानी यांनी हा पर्याय स्वीकारला नाही. देशातील ५० कोटींहून अधिक घरांमध्ये सरासरी दोन पंखे वापरात असतात. दरवर्षी भारतीय बाजारपेठेत ९ कोटींहून अधिक पंख्यांची विक्री केली जाते. वंजानी यांनी आपल्या मोटारीचे तंत्रज्ञान बाजारपेठेत आणण्यासाठी इतर कंपन्यांना केले होते. मात्र, या कंपन्यांनीही हे तंत्रज्ञान स्वीकारण्यास नकार दिला.


अखेर त्यांचे चुलत बंधू उद्योजक गोविंद वंजानी यांनी ही कल्पना सत्यात उतरविण्याचा निर्धार केला आणि त्याच्यावर काम सुरू केले आहे
. कोईम्बतूर येथील एका कंपनीनेही त्यांची कल्पना वापरून उत्पादन सुरू केले आहे. अशाच प्रकारची इतरही नाविन्यपूर्ण उत्पादने त्यांनी विकसित केली आहेत. आपल्या नावावर त्यांनी तीन पेटंट नोंदवली आहेत. आज एकही रुपयाचे कर्ज डोक्यावर नसलेल्या अंजानी यांची कंपनी वर्षाला १५ कोटींच्या वार्षिक उलाढालीसह कामगिरी करत आहे. कंपनीत एकूण ६८ कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना भेडसावणार्‍या अडचणी सोडवणारा मालक, अशी त्यांची कर्मचार्‍यांमध्ये ओळख आहे. समाजकार्यातही वंजानी यांनी आपला ठसा उमटवला आहे.


विविध समाजसेवी संस्था
, शाळा, महाविद्यालयांना मदतकार्यातही त्यांचा विशेष हातभार असतो. वंजानी यांनी वीज पोहोचली नसलेल्या गावांमध्ये प्रकल्प राबवून सौरउर्जेवर चालणारे दिवे बसवण्याचे काम केले आहे. वंजानी यांना त्यांच्या कार्यासाठी 'ज्वेल्स टीसा', महाराष्ट्राचा ठाणे जिल्ह्यातील 'उद्योगरत्न', 'टीएमए'तर्फे, 'कोसिया'तर्फे 'बेस्ट एक्स्पोर्ट परफॉर्मन्स' 'आदर्श उद्योजक पुरस्कार २०१३', 'इमकॉस्ट'तर्फे 'ऑनर ऑफ एक्सलन्स' आदी पुरस्कार आजवर मिळाले आहेत. सतत नवनिर्माणाचा ध्यास घेणार्‍या या उद्योजकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!



@@AUTHORINFO_V1@@