मातीविना शेती करणारी महाराष्ट्राची पहिली महिला शेतकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020   
Total Views |

Aruna More _1  

 
 
 
 

आपल्या लाडक्या भावाला कर्करोगाचं निदान झालं, हे त्या शिक्षिकेला कळलं. पायाखालची जमीनच जणू सरकली की काय, असं एका क्षणाला वाटून गेलं. आपल्याच भावाला कर्करोग का झाला, हे त्या बहिणीच्या वेड्या मायेला उमजत नव्हते. त्या शिक्षिकेने कर्करोगाविषयी जाणून घेण्यास सुरुवात केली. निव्वळ आपला भाऊच नव्हे, तर आताच्या काळात कैकपटीने हा कर्करोग वाढलेला त्यांना जाणवले. कारणं शोधली असता महत्त्वाचं कारण सापडलं ते म्हणजे रासायनिक खतांचा वापर करून तयार होणारं अन्न. म्हणजे आपल्या पोटात जाणारं अन्न हे एकप्रकारे विषच आहे, हे स्पष्ट होते. यावर उपाय म्हणजे विषमुक्त शेती. ‘हायड्रोपोनिक्स’ म्हणजे पाण्यावरची शेती, मातीविना शेती. त्यांनी पूर्णपणे या शेतीला वाहून घेतले. ‘विषमुक्त स्वस्थ भारतहे मिशन घेऊन चालणार्‍या या शिक्षिका म्हणजे मातीविना शेती साकारणारी पहिली महिला शेतकरी म्हणजे ‘एन्टवर्फ इनोव्हेशन्स’ संस्थेच्या संस्थापिका अरुणा मोरे होय.

 
 

सोलापूरमधल्या सांगोला तालुक्यातील एकतपूर हे अरुणाचे माहेर. बाबा, तुळशीराम उबाळे सैन्यात होते. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्रात अर्थात ‘बीएआरसी’मध्ये ते सुरक्षारक्षक म्हणून रुजू झाले. अरुणाची आई विमल चांगल्या शिवणकाम करायच्या. अरुणाला एक बहीण आणि दोन भाऊ. आपल्या पतीवर कुटुंबाचा पडत असलेला भार त्यांची आई पाहत होती. त्यांच्यावरचा कौटुंबिक जबाबदारीचा भार हलका व्हावा म्हणून विमल उबाळे शिवणकाम करू लागल्या. शिवणकाम करत इतरांनासुद्धा त्या रोजगार देऊ लागल्या. दरम्यान, अरुणाचे चौथीपर्यंत शिक्षण जवळच्याच कुमुद शाळेत झाले. त्यानंतर त्याच जागी उभ्या राहिलेल्या नूतन विद्यामंदिरात प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी गिरवले. दहावीत उत्तम गुण मिळविल्यानंतर त्यांनी बीएआरसी कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेतला खरा, पण अरुणाच्या आईवडिलांनी तिचं लग्न अनिल मोरे यांच्याशी करून दिले.

 

अनिल मोरे एका खाजगी संस्थेत कार्यरत होते. मात्र, आपल्या पत्नीला पुढे शिकायचं आहे, हे त्यांनी जाणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणार्‍या अनिलरावांनी आपल्या पत्नीला लग्नानंतरसुद्धा पुढे शिकण्याची परवानगी दिली. मुळातच शिक्षणाचं प्रमाण कमी असणार्‍या ऐंशीच्या दशकात अनिलरावांचा हा निर्णय क्रांतिकारी म्हणावा लागेल. अरुणाने डीएड् पूर्ण केले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कला शाखेतून पदवी संपादन केली. पुढे ३० वर्षे त्यांनी अनेक गुणवान विद्यार्थी घडवले. ‘एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका’ म्हणून त्यांचा लौकिक होता.

 

‘बीएआरसी’चा परिसर हा मुळातच निसर्गरम्य असल्याने अरुणाला निसर्गाची आवड लहानपणापासून होती. विशेषत: बागकामाची आवड त्यांनी जपली. चिकित्सक अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी रेकी, लोलकशास्त्र, वास्तूशास्त्र शिकून घेतलं. एकीकडे ‘हायड्रोपोनिक्स’विषयी संशोधन चालूच होतं. त्यांनी घरात तयार केलेल्या ‘हायड्रोपोनिक’ बागेला नवी मुंबई महानगरपालिकेचा अनेकदा पुरस्कारदेखील मिळाला. दरम्यान, अरुणाच्या मुली मोनिका आणि ऋजुता मोठ्या झाल्या. मोनिकाने अभियांत्रिकीची पदवी मिळवली. काही वर्षे तिने एका नामवंत संस्थेत ‘व्याख्याता’ म्हणून नोकरी केली, तर ऋजुताने सर जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथून आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

 

काही वर्षांपूर्वी भावाला कर्करोगाचं निदान झालं. या निदानाने अरुणा यांना धक्का बसला. मात्र, त्या सावरल्या. कर्करोगाची अनेक कारणे आहेत. गेल्या काही वर्षांत कर्करोग झपाट्याने वाढलेला आहे, त्याचं कारण आपण घेत असलेला आहार. जे अन्न आपण घेतो, त्यावर रासायनिक फवारणी केल्याने पोटात ही रसायने जातात आणि तेच कर्करोगास कुठेतरी निमंत्रण असतं, हे त्यांना उमगलं आणि मग सुरू झालं एक मिशन. मिशन आहे ‘विषमुक्त स्वस्थ भारत.’ गेली १५ वर्षे केलेला ‘हायड्रोपोनिक्स’चा अभ्यास त्यांना कामी आला. त्यांनी काही तंत्रे विकसित केली. हे मिशन सर्वदूर पोहोचविण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे लोकांना जागृत करणे. यासाठी त्यांनी मोफत कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. लोकांना ही ‘मातीविना शेती’ आवडू लागली. नाममात्र दरांत अरुणा मोरे हे तंत्रज्ञान लोकांना शिकवू लागल्या.

 

पुढेएन्टवर्फ इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची संस्था उदयास आली. आता या दोघीही अरुणा मोरेंना त्यांच्या व्यवसायात मदत करतात. सोबतच आर्किटेक्ट आणि इंटिरिअर डिझाईनदेखील ‘एन्टवर्फ’च्या माध्यमातून केले जाते. अरुणा मोरे यांनी आतापर्यंत २० ते २२ मातीविना शेतीसंबंधी कार्यशाळा घेतल्या असून पाचशेहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला आहे. सध्या त्या बचतगटातील महिलांना ‘मातीविना शेती’चे धडे देत आहेत. या महिलांना या तंत्राद्वारे घरबसल्या भाज्या घेता येतात आणि त्यातून उत्पन्नसुद्धा मिळते. अरुणा मोरे यांच्या उद्योग क्षेत्रातील या योगदानामुळे ‘लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अ‍ॅण्ड एक्सलन्स’ या संस्थेने महिला उद्योजिका पुरस्कार देऊन त्यांचा नुकताच गौरव केला.

 

सध्या मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी महिलावर्गाचे हळदीकुंकू समारंभ साजरे होतात. या समारंभात वाण म्हणून निरनिराळ्या गृहोपयोगी भेटवस्तू महिलांना दिल्या जातात. अरुणा मोरेंनी वाण म्हणून ‘हायड्रोपोनिक’ तंत्रावर आधारित तुळशीची रोपे विकसित केलेली आहेत. हळदीकुंकू समारंभात ही रोपे दिल्यास खर्‍या अर्थाने निसर्गपूजन केले जाईल, असे त्या म्हणतात. सोबतच ‘मातीविना शेतीची तंत्रे समजावणारी पुस्तिका आणि साधनसामुग्री समाविष्ट असलेले किटसुद्धा त्यांनी तयार केली आहे. वाण म्हणून देण्यास हे किट उपयुक्त ठरत आहे. अशा समारंभात अरुणा मोरे स्वत: वक्त्या म्हणून उपस्थित राहतात व त्या समारंभात ‘मातीविना शेती’ या विषयावर व्याख्यान देतात. एकीकडे दुष्काळाचं संकट नेहमीच घोंघावत असताना अरुणा मोरे यांचा ‘मातीविना शेती’चा उपक्रम कौतुकास्पद आहे. खरंतर शासनदरबारी याची नोंद घेऊन हे तंत्र महाराष्ट्रातील गरजू शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून त्या शेतकर्‍यांसाठी मोफत ‘हायड्रोपोनिक्स’ कार्यशाळाही आयोजित करतात. अरुणा त्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचे सांगतात. खर्‍या अर्थाने त्या ‘मातीविना शेती’ करणार्‍या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शेतकरी ठरल्या आहेत.



@@AUTHORINFO_V1@@