नॅशनल पार्क ते तुंगारेश्वर दरम्यान वन्यजीवांच्या भ्रमणासाठी ‘ओव्हरपास’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |

tiger_1  H x W:

 

प्रकल्पांमधून वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी भारतातील पहिलाच प्रयोग

 
 

मुंबई (अक्षय मांडवकर) - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) आणि तुंगारेश्वर अभयारण्यादरम्यान वन्यजीवांच्या हालचालीकरिता भारतातील पहिला ’ओव्हरपास पूल’ बांधण्यात येणार आहे. वन्यजीवांच्या दृष्टीने संरक्षित असलेल्या या दोन्ही क्षेत्रांच्या मधल्या परिसरात चार महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहेे. त्यामुळे या दरम्यान असलेला वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित (वाईल्डलाईफ कॉरिडोर) करण्यासाठी ‘ओव्हरपास पूल’ बांधण्याची सूचना राज्य वन्यजीव मंडळाच्या उप समितीने केली आहे. सध्या या संदर्भातील निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

 
 

राज्य सरकारने ‘राष्ट्रीय उद्याना’च्या उत्तरेकडील सीमेलगत चार विकास प्रकल्पांचे नियोजन केले आहे. यामध्ये दिवा-पनवेल रेल्वे आणि मालवाहतूक मार्गिका, आठपदरी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, या प्रकल्पांमुळे राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्यादरम्यान असलेला वन्यजीवांचा भ्रमणमार्ग बाधित होत आहे. त्यामुळे हा भ्रमणमार्ग संरक्षित करण्यासंदर्भात उपाययोजना राबविण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळांतर्गत एक उपसमिती गठित करण्यात आली होती. वर्षभरापासून या समितीकडून उपाययोजना आखणीचे काम सुरू होते. सद्यस्थितीत हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याअंतर्गत राष्ट्रीय उद्यान ते तुंगारेश्वर अभयारण्यादरम्यान वन्यजीवांसाठी ओव्हरपास पूल’ बांधण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

 
 

राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तरेकडील सीमेवरील दिवा-पनवेल रेल्वे मार्गिकेचा विस्तार आणि मालवाहतुकीसाठी नवीन मार्गिका बांधण्यात येणार आहे. नव्याने बांधण्यात येणार्‍या या मार्गिकांदरम्यान राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वरची सीमा निमुळत्या स्वरुपात जोडली जाते. याच भागातून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची हालचाल होत असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अभ्यासामधून उघड झाले आहे. त्यामुळे दोन्ही संरक्षित क्षेत्रांना जोडून वन्यजीवांची हालचाल सुकर करण्यासाठी 30 मीटर लांब ’ओव्हरपास पूल’ बांधण्यात येणार आहे. हा पूल दोन्ही रेल्वे प्रकल्प आणि त्यापरिसरातून जाणार्‍या चिंचोटी-भिवंडी रस्तावरून जाईल. असे असले, तरी पुढच्या परिसरात विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे वन्यजीवांच्या भ्रमणमार्गाच्या दृष्टीने संरक्षित असलेल्या परिसरातून या दोन्ही प्रकल्पांच्या मार्गिका उन्नत स्वरुपात बांधण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. त्यांतर्गत बहुउद्देशीय मार्ग जमिनीपासून 8 मीटर आणि बुलेट ट्रेनचा मार्ग 15 मीटरवर बांधला जाईल. रेल्वेमार्गिकांवरुन येणारा ’ओव्हरपास पूल’ हा बहुउद्देशीय प्रकल्पांच्या उन्नत मार्गाखालून जाणार असल्याचे रिठेंनी सांगितले. या संपूर्ण उपाययोजनेमुळे वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

हा भारतातील पहिलाच प्रयोग

चार प्रकल्पांमुळे बाधित होणारा राष्ट्रीय उद्यान आणि तु्ंगारेश्वर अभयारण्यादरम्यानचा वन्यजीव भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी ’ओव्हरपास पूल’ बांधण्यात येणार आहे. एखाद्या विकास प्रकल्पांमध्ये वन्यजीवांच्या हालचालींकरिता ’ओव्हरपास पूल’ बांधण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. - किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

@@AUTHORINFO_V1@@