काँग्रेसचे वकीलपत्र शिवसेनेकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |
e_1  H x W: 0 x



आपला मेहनताना मिळवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वकीलपत्र घेणे, त्यांना हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी म्हणून जनतेपुढे पेश करणे, हे त्या पक्षाच्या प्रवक्त्याचे काम. त्यामुळे आता मिळेल त्या मंचावर पोपटपंची करताना संजय राऊत दिसतात.

 

"काँग्रेस व गांधी घराणे हिंदुत्ववादीच," असे उद्गार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात काढले. अर्थात अतिशयोक्त विधाने करणार्‍या खुशमस्कर्‍याचे पात्र वठविण्याचा मक्ता सध्या राऊतांनी घेतलेला असल्याने ते या कार्यक्रमात इतरही अनेक विषयांवर बरळले. “मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला आहे, उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत,” ही त्यातली काही वानगीदाखल उदाहरणे. परंतु, मुद्दा काँग्रेस, गांधी घराणे आणि हिंदुत्वाचा असल्याने त्याचाच विचार करणे उचित ठरेल. कारण गेली कित्येक वर्षे 'ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आम्हीच एकमेव' अशी भावनिक मांडणी करतच शिवसेनेचे राजकारण उभे राहिले. त्या प्रत्येकवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेची भूमिका काँग्रेस व गांधी घराणे हिंदूविरोधी असल्याचीच होती.

 

बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक जाहीर सभा व मुलाखतींतून काँग्रेससह गांधी घराण्याच्या हिंदूद्रोही धोरणांवर कडाडून हल्ला केला होता. बाळासाहेबांच्या अशा शब्दरूपी तोफांच्या भडिमारातूनच शिवसेनेची वाढ होत गेली व सत्तेची ताटेही तिला मिळत गेली. आता मात्र, संजय राऊत, उद्धव ठाकरे व शिवसेनेनेही बाळासाहेब ठाकरेंनाच खोटे पाडण्याची सुपारी घेतल्याचे दिसते. म्हणूनच बाळासाहेबांनी जे जे केले, त्या त्या प्रत्येक गोष्टीवर बोळा फिरवण्याचे काम शिवसेनेकडून सुरू झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेसाठी पाट लावण्याचा उद्योग हे त्यातलेच पहिले काम. काहीच दिवसांपूर्वी, धर्म व राजकारण यांची गल्लत करून आमची चूक झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता त्याचीच री ओढत संजय राऊत यांनी काँग्रेस व गांधी घराण्याला हिंदुत्ववादाचे प्रमाणपत्र दिले. 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी'चाच हा प्रकार. उद्धव ठाकरेंची राज्यातली सत्ता काँग्रेसच्या टेकूवर तरलेली असून त्या टेकूचे गुणगान करणे संजय राऊत वा शिवसेनेला क्रमप्राप्तच व त्यानुसारच सारेकाही सुरू आहे.

 

वस्तुतः काँग्रेस व गांधी घराणे आणि त्यांनी पाळलेल्या डाव्या विचारवंत-अभ्यासकांनी कायमच हिंदूंना सावत्रपणाची वागणूक दिली. त्याचा सर्वात संतापजनक दाखला म्हणजे हिंदू दहशतवादाचे रचलेले थोतांड आणि सांप्रदायिक तथा लक्षित हिंसा निवारण विधेयक! समस्त हिंदू धर्मीयांना भगवे दहशतवादी ठरवण्यासाठी २०१४ पर्यंत काँग्रेस व गांधी घराण्याने खोटीनाटी, बनावट माहिती प्रसारित केली. खाल्ल्या मिठाला जागत एका इशार्‍यावर नाचणार्‍या माध्यम प्रतिनिधींनीही 'हिंदू दहशतवादा'च्या बागुलबुवाला मोठे केले. बुद्धीजीवी-बुद्धीवंतही एका सुरात 'दहशतवादी म्हणजे हिंदूच' असे म्हणू लागले. हिंदू म्हणजे अतिभयानक, अतिधोकादायक प्राणी अशी प्रतिमा ठसवण्यासाठीच ही सर्व मंडळी राबली.

 

सांप्रदायिक तथा लक्षित हिंसा निवारण विधेयकाचे कायद्यात रूपांतर करून हिंदूंच्या सामूहिक तुरुंगवारीचे नियोजन काँग्रेसने केले होते. ते विधेयक मंजूर झाले असते तर हिंदूंवरील अन्यायाला आणि अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाला सीमाच राहिली नसती. मात्र, हिंदूंना खलनायक ठरवण्याचे प्रयत्न केल्याने काँग्रेसची अवस्था निष्पर्ण वृक्षासारखी झाली नि देशातल्या मतदाराने पेकाटात लाथ घातली, काँग्रेसची हिंदूविरोधी धोरणे हाणून पाडली. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला तीन आकडी खासदारही निवडून आणता आले नाही. दरम्यानच्या काळात राहुल गांधी यांनी गळ्यात रुद्राक्षांच्या माळा नि कपाळी गंध-टिळा लावून हिंदूंच्या मतांच्या जोगव्यासाठी मठा-मंदिरांत हजेरीही लावली. परंतु, गांधी घराण्याची नियत साफ ओळखून असलेल्या जनतेने काँग्रेसला झिडकारण्याचेच काम केले. आता त्याचीच भूक संजय राऊत व शिवसेनेला लागली असावी.

 

देशवासीयांनी ज्याप्रमाणे काँग्रेस व गांधी घराण्याला आपल्या मतदारसंघातूनही पळता भुई केले, तशीच स्थिती शिवसेनेचीही व्हावी, असे संजय राऊतांच्या मनात असावे. तसेही इथला हिंदुत्ववादी मतदार हिंदूविरोधकांच्या इच्छा नेहमीच पूर्ण करतो. म्हणूनच सरकार जोपर्यंत टिकेल, तोपर्यंत संजय राऊतांनी यथेच्छ बडबडून घ्यावे, त्यानंतर मात्र राजकीय पक्ष म्हणून टिकाव धरण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांची बेगमी करतानाही शिवसेनेची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटणार नाही. कारण संजय राऊत आज जो सत्तेचा गांजा मारून काँग्रेस व गांधी घराण्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करत आहेत, ती हिंदुत्ववादी जनादेशाशी प्रतारणा करूनच! त्याची परतफेड, भरपाई त्यांना करावीच लागेल व त्याची सुरुवातही लवकरच होईल.

 

शिवसेनेच्या अस्तित्वाला आधार ठरलेला मुद्दा म्हणजे हिंदुत्व! एरवी शिवसेनेची संभावना खंडणीखोरांची, गुंडा-पुंडाची टोळी अशीच केली जाते. परंतु, आपले तसले धंदे झाकून ठेवण्यासाठी शिवसेनेला हिंदुत्वाचा समोरून पुढे केलेला मुखवटा उपयुक्त ठरत असे. त्याला सावरकरप्रेमाची रंगरंगोटीही शिवसेनेने चांगल्याप्रकारे करून घेतली. आता मात्र, तत्त्व व विचारांना वार्‍यावर सोडून शिवसेनेने सत्तेला सर्वोच्च मानले. म्हणूनच सुधारित नागरिकत्व कायद्यापासून ते राहुल गांधी व काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली तरी शिवसेनेने आशाळभूतपणे '१०, जनपथ'च्या नव्या मालकिणीचे पाय धरणे पसंत केले. एखादा अधिक-उणा शब्द गेला आणि सोनिया मॅडमनी डोळे वटारले तर काय करणार, म्हणून तोंडात मिठाची गुळणी धरूनच संजय राऊत व उद्धव ठाकरेंनी गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या.

 

उद्धव ठाकरे वा शिवसेना नेतृत्वाला आपले पाठीराखे बांधून ठेवण्यासाठी सत्तेचा गोंद आवश्यक असल्याची पुरती जाणीव आहे. सत्ता नसेल तर 'शिवसेना' नावाचा पक्ष फुटायला वेळ लागणार नाही. बाळासाहेबांच्या काळात त्यांच्या करिष्म्यावर किती नेते आले आणि गेले, तरी शिवसेना टिकून राहिली. मात्र, उद्धव ठाकरेंचा वकूब बाळासाहेबांच्या एक दशांशही नाही. म्हणूनच मग नेते, उपनेते, आमदार-खासदार वगैरे लोकांना आपल्याबरोबर उभे करण्यासाठी सत्ता हेच एकमेव साधन ते वापरू शकतात. पण, ती सत्ता स्वतःच्या हिमतीवर मिळवण्याची वा चालवण्याची ताकद त्यांच्या मनगटात नाही.
 

ती मिळाली काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने. अशा परिस्थितीत आपला मेहनताना मिळवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वकीलपत्र घेणे, त्यांना हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी म्हणून जनतेपुढे पेश करणे, हे त्या पक्षाच्या प्रवक्त्याचे काम. त्यामुळे आता मिळेल त्या मंचावर पोपटपंची करताना संजय राऊत दिसतात. परंतु, खोटारडेपणा करून काँग्रेस वा गांधी घराण्याला मखरात बसविण्याचा कितीही प्रयत्न शिवसेनेने केला तरी त्या मखराच्या, मखरात बसलेल्याच्या नि मखरात बसवणार्‍याच्या मतदानाच्या माध्यमातून चिंधड्या उडवायला राज्यातला व देशातला हिंदुत्ववादी मतदार तयार आहे, संधीची वाट पाहत!





@@AUTHORINFO_V1@@