'शिव'नामधारी येशूभक्ताची दादागिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020   
Total Views |

Vedh 1 _1  H x

 


ते म्हणतात ना, नावात काय आहे? अहो, पण इथे नावात 'शिव' आणि ओठावर 'येशू' अशी गत! काँग्रेसचे कर्नाटकमधील तुरुंगातून नुकतेच सुटून आले वोक्कलिंग समाजाचे नेते डी. शिवकुमार. या भ्रष्ट नेत्याने कर्नाटकच्या कपाली बेट्टावर (डोंगरावर) चक्क येशू ख्रिस्ताचा आशियातील सर्वाधिक उंच पुतळा उभारण्याचे प्रयोजिले. पुतळ्याची उंची म्हणे ११४ फूट! या विरोधात सोमवारी 'कनकपुरा चलो'चा नारा देत पाच हजार हिंदू बांधवांनी भव्य भगवा मोर्चा काढत येशूभक्त शिवकुमारच्या या दादागिरीला तीव्र विरोध दर्शविला. खरं तर विरोध येशूच्या प्रस्तावित पुतळ्याला नाही, तर त्या पुतळ्याच्या छत्रछायेत होऊ घातलेल्या धर्मांतरणालाच आहे. कर्नाटकातील 'हिंदू जागरण वेदिके' या संघटनेच्या म्हणण्यानुसार, येशूच्या पुतळ्यामागील धर्मांतरणाचा सुप्त उद्देश काही लपून राहिलेला नाही. त्यामुळे उगाच धर्माच्या नावाखाली फूट पाडून ख्रिश्चनांची मते पदरात पाडण्यासाठी शिवकुमारने चालवलेला हा धार्मिक खेळ म्हणावा लागेल. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या जमिनीवर हा पुतळा उभारण्याचे शिवकुमारचे मनसुबे आहेत, ती जमीन सरकारी मालकीची आहे. शिवकुमारच्या मते, त्यांनी ही जमीन कुमारस्वामी सरकार असतानाच योग्य ती रक्कम मोजून खरेदी केली होती. पण, त्यात फारसे तथ्य आढळले नाहीच. उलट, मुन्नेश्वराचे मंदिर असलेल्या या डोंगरावर अगदी गुपचूप 'क्रॉस' ही अवतरला. कालांतराने डोंगरावरील 'क्रॉस' प्रकाशाने झगमगूही लागला. आता याच हिंदूंचे आस्थास्थान असलेल्या पवित्रस्थळी 'येशूचा डोंगर' उभा राहावा म्हणून शिवकुमार आणि त्याचा बंगळुरू ग्रामीणचा खासदार बंधू यांनी एवढा आटापिटा का करावा? शिवकुमारांच्या या षड्यंत्राला हिंदुत्ववादी संघटनांनी वेळीच हाणून पाडले. शिवाय, येडियुरप्पा सरकारने यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. पण, यावरून एक बाब स्पष्ट होते की, काँग्रेसची नामधारी धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ अल्पसंख्याकांचे लांगूलचालनच! आधी मुस्लिमांची यांनी माथी भडकविली आणि आता ख्रिश्चनांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी चाललेला हा खटाटोप सर्वथा निंदनीय, तिरस्करणीय आहे. कर्नाटक सरकारने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देऊन शिवकुमारांसारख्या समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यांना पुन्हा गजाआडच टाकायला हवे.

 

आता हिंदू गप्प बसणार नाही!

 

कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून ८० किमी अंतरावर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे साहजिकच माध्यमांनी डोळेझाक केली. एवढेच नव्हे तर शिवकुमार यांनी यासंबंधी प्रश्न विचारणार्‍या माध्यमांनाही उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले. खरंतर शिवकुमार हे काँग्रेस हायकमांडचे अत्यंत विश्वासू नेते. ते काँग्रेसचे 'संकटमोचक' म्हणूनही ओळखले जातात. पण, 'ईडी'ने आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात त्यांना अटक केली होती. २०१७ मध्येही त्यांच्या संपत्तीवरील छापेमारीत कोट्यवधींचे घबाड सापडले होते, तसेच बिदादीच्या त्यांच्या रिसॉर्टमध्ये तब्बल ३०० कोटींची माया बघून तपास पथकाचेही डोळे चक्रावले होते. तसेच अवैध खाणकामप्रकरणीही त्यांना न्यायालयाने समन्स बजावले होते. पण, तरीही आपले राजकीय वजन वापरत या ना त्या कारणाने शिवकुमार सदैव कर्नाटकच्या राजकारणाच्या केंद्रस्थानीच राहिले. काँग्रेसी संस्कृतीत मुरलेल्या, निर्ढावलेल्या शिवकुमारांच्या बोलचालीत तुरुंगवास भोगल्यानंतरही फरक पडलेला नाहीच. काँग्रेसच्या नेतेसंस्कृतीचा माज या नेत्यामध्ये आजही तितकाच ठासून भरलेला आहे की, “मी विवादास्पद आहे, म्हणूनच मी कामाचा आहे,” अशी विधाने करण्यापर्यंत यांची मजल जाते आणि याच सत्तेच्या धुंदीत भ्रष्टाचाराने या शिवकुमारांचे 'हात' काळे पडले आहेत. या आरोपांचे कदाचित पापक्षालन व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताचा उंच पुतळा उभारण्याचा त्यांना पाद्य्रांनी सल्ला दिला असावा. म्हणूनच सरकारदरबारी चराईचे क्षेत्र असलेल्या जमिनीवरही येशूच्या नावाने कुमारबंधूंनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकीकडे मोक्याची जागाही घशात घालायची आणि दुसरीकडे ख्रिश्चनांची सहानुभूती मिळवत आपली अल्पसंख्याक व्होटबँक अधिक मजबूत करायची. पण, शिवकुमारच्या या षड्यंत्राला प्रखर विरोध करून रस्त्यावर उतरत हिंदू बांधवांनी एकजुटीच्या बळाने हा प्रयत्न सपशेल हाणून पाडला. त्यामुळे शिवकुमार आणि त्यांच्यासारख्या सेक्युलॅरिझमच्या बांगेखाली हिंदूंचे दमन करु पाहणार्‍यांसाठी हा एक कडक संदेश आहे. हिंदूंना नाहक डिवचू नका. आता हिंदू जागा झाला आहे. तो 'सर्वधर्मसमभावा'च्या गोेंडस नावाखालीअशी राजकीय षड्यंत्रं कदापि शिजू देणार नाही, याची पक्की खूणगाठ बांधा!

@@AUTHORINFO_V1@@