गेल्या वर्षभरात वन्यजीवांच्या डझनभर प्रजाती नामशेष; हवामान बदलाचा परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020   
Total Views |

tiger_1  H x W:

 
 
मुबई (अक्षय मांडवकर) -  ‘सर्वेपि सुखिनः सन्तु’ म्हणताना स्वत:च्या विकासाचा अट्टाहास बाळगणार्‍या मानवी स्वभावातील दांभिकता अनेक वन्यजीवांच्या मुळावर उठली आहे. बदलत्या जागतिक वातावरणामुळे आणि वनक्षेत्रावरील मानवी हस्तक्षेपामुळे २०१९ मध्ये जगभरातून वन्यजीवांच्या डझनभर प्रजाती नामशेष झाल्या आहेत. यामध्ये पक्ष्यांच्या तीन, बेडकाच्या दोन आणि गोगलगाय, उंदीर, शार्क व गोड्या पाण्यातील माशाच्या एका प्रजातीचा समावेश आहे. वन्यजीव शास्त्रज्ञ, शास्त्रीय शोधनिबंध आणि ’इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययुसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. २०१९ची सुरुवातच जगप्रसिद्ध हवाई बेटावर अधिवास करणार्‍या एका गोगलगायीच्या प्रजातीच्या नामशेषाने झाली. झाडांवर अधिवास करणार्‍या ’लॉनेसम गेओर्गे’ गोगलगायीच्या शेवटच्या जीवाच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला यश मिळाले नाही. लाकूडतोड, कोळसा उत्पादन आणि शेतीकरिता वनजमिनींच्या वापरामुळे ब्राझीलमधल्या ’अल्गोअस फॉलिएज-ग्लेअर’ या पक्ष्याचे अस्तित्व नष्ट झाले. २०११ साली या पक्ष्याचे शेवटचे दर्शन झाले होते. त्यानंतर ’आययुसीएन’ने २०१९ साली त्याला ‘नामशेष’ म्हणून घोषित केले. ऑस्ट्रेलिया सरकारनेही वातावरण बदल आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे ’ब्राम्बले के मेलोमाईस’ हा उंदीर नामशेष झाल्याचे जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियातील एका छोट्या बेटावर उंदरांच्या या प्रजातीचा अधिवास होता. समुद्राची पातळी वाढल्याने बेटाचे आकारमान कमी झाले. २००९ सालानंतर उंदराची ही प्रजाती निदर्शनास न आल्याने ऑस्ट्रेलियन सरकारने गेल्यावर्षी त्याला ‘नामशेष’ म्हणून घोषित केले, तर चीनच्या यांगत्से नदीत आढळणार्‍या ’चायनिज पॅडलेफिश’ या माशाचे अस्तित्वही जगातून नष्ट झाले आहे. सागरी संशोधकांनी २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात या माशाचे अस्तित्व आढळून आले नाही. ही प्रजाती गोड्या पाण्यात अधिवास करणार्‍या जगातील सर्वात मोठ्या माशाची प्रजाती होती. पर्यावरणीय परिसंस्थेतील प्रत्येक प्रजाती एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे वर्षभरात डझनभर प्रजाती नष्ट होणे, हे ढासळत्या पर्यावरणीय संतुलनाचा इशारा आहे. सद्य परिस्थितीत जगाने या इशार्‍याची वेळीच गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

 



                                      हवामान बदलाचा परिणाम

 

‘आययुसीएन’ने जाहीर केलेल्या अहवालानुसार वातावरण बदलाचा फटका वन्यजीव प्रजातींच्या नामशेष होण्यावर बसला असून विशेषत्वाने हा बदल जलचरांच्या मुळावर उठला आहे. ’आययुसीएन’ने संकटग्रस्त प्रजातींच्या लाल यादीत २०१९च्या अखेरीस ३० हजार, १७८ प्रजातींचा समावेश केला आहे. आता या लाल यादीत एकूण १ लाख, १२ हजार, ४३२ प्रजातींचा समावेश आहे. या यादीत ३७ टक्के प्रजाती ऑस्ट्रेलियातील गोड्या पाण्यात अधिवास करणार्‍या माशांच्या आहेत. ऑस्ट्रेलियातील ५८ टक्के गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजातींना हवामान बदलाचा थेट फटका बसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पश्चिम हिंद महासागरातील ’शॉर्टटेल नुर्से शार्कप्रजातीचा अधिवासही गेल्या तीस वर्षांत सुमारे ८० टक्क्यांनी कमी झाला आहेसागरातील वाढत्या तापमानामुळे प्रवाळ नष्ट होत आहे. त्यामुळे ही प्रजात नामशेष होण्याचा मार्गावर आहे. वातावरण बदलामुळे सागरी परिसंस्थेत परकीय आक्रमक प्रजातींचा शिरकाव झाला आहे. पाण्याचे बदलते तापमान आणि अंतर्गत प्रवाह बदलामुळे काही प्रजाती एका परिसंस्थेतून दुसर्‍या परिसंस्थेत जात असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील सागरी परिसंस्थेत विशिष्ट कालावधीसाठी आढळणारी ’रेट टूथेड ट्रिगरफिश’ याचे उत्तम उदाहरण आहे. हवामान बदलाचा ’इम्पीरियल पोपट’ या डोमिनिका देशाच्या राष्ट्रीय पक्ष्याच्या अधिवासावरही विपरीत परिणाम झाला आहे. या भागात सातत्याने येणार्‍या तीव्र चक्रीवादळांमुळे या पक्ष्याच्या मृत्यूदरात वाढ झाली असून अधिवास क्षेत्रातही घट झाली आहे. त्यामुळे आता या प्रजातीमधील केवळ ५० पोपट शिल्लक राहिल्याचा अंदाज ’आययुसीएन’ने वर्तवला आहे. गेल्या वर्षभरात काही प्रजाती या जंगलातून नष्ट पावून केवळ बंदिस्त अधिवासात तग धरून राहिल्या आहेत. ’आययुसीएन’ने या गटात सात प्रजातींचा समावेश केला आहे. त्यामध्ये पोपटांमधील प्रसिद्ध ’मकाऊ’ जातीच्या पोपटाची प्रजात आणि माशाच्या सहा प्रजातींचा समावेश आहे. हवामान बदलाचा वन्यजीव प्रजातींवर होणारा हा परिणाम भविष्यातील धोक्याची घंटाच आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@