वाङ्‌मयीन क्षेत्रातील जातीयवाद...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |

Racism in the War Field_1
 
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रावसाहेब रंगराव बोराडे स्पष्टवक्ते आहेत. उस्मानाबादच्या 93 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी साहित्यक्षेत्रातील जातीयवादाचा मुद्दा उपस्थित केला. वाङ्‌मयाच्या क्षेत्रात उघडउघडपणे जातीयवादाला खतपाणी घातले जात आहे. त्याचा पुरस्कार केला जात आहे. वाङ्‌मयीन क्षेत्राच्या दृष्टीने ही भयानक अवस्था असून, जातीयवादाने सबंध साहित्यच पोखरले जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. जातीयवाद वाङ्‌मयीन क्षेत्राचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आपण जागतिक दहशतवादाबद्दल बोलतो. परंतु, वाङ्‌मयातील या जातीय दहशतवादाबद्दल केव्हा बोलणार, असा सवाल त्यांनी आपल्या भाषणातून केला आहे. या जातीय दहशतवादाचा प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे आवाहनही प्राचार्य बोराडे यांनी केले आहे.
ज्या अर्थी प्राचार्य बोराडे, वाङ्‌मयीन क्षेत्रात जातीयवाद बोकाळला आहे, असे म्हणतात, याचा अर्थ त्याची सुरवात बरीच आधी कधीतरी झाली असली पाहिजे. ती सुरवातच झाली नसती, तर आजची ही भयंकर (बोराडे यांच्या दृष्टीने) स्थिती आलीच नसती आणि या जातीयवादावर उपाय करायचा असेल तर त्याच्या मुळाशी जावे लागेल, इतिहासाकडे बघावे लागेल. अन्यथा, ते उपाय वरवरचेच ठरतील. एक मात्र नक्की की, बोराडे म्हणतात तो वाङ्‌मयीन क्षेत्रात जातीयवाद वाचकांनी किंवा सर्वसामान्यांनी आणलेला नाही. तो आणला आहे साहित्यिकांनीच. याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. साहित्यिकांनीच या क्षेत्रात, हा माझा, हा परका असा भाव तळमळीने जोपासला. या जातीयवादाचा जेवढा फायदा उचलता येईल तेवढा वारेमाप उचलला. परंतु, आता हा जातीयवाद मानगुटीवर बसताना दिसत आहे आणि त्यातून फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची स्थिती दिसत आहे, असे वाटते. आता जातीयवाद कुणी सुरू केला किंवा कोण तो पोसतो, याबाबत प्रत्येक जण दुसर्‍याकडे बोट दाखविणार, यात शंका नाही. हा म्हणेल, याने सुरू केला म्हणून मी त्याला प्रत्युत्तर दिले आणि तो म्हणेल, त्याने सुरू केला म्हणून मी त्याच्या तोडीसतोड उतरलो. या असल्या आरोप-प्रत्यारोपातून काहीही साध्य होणे नाही.
जर समाजातच जातीयवाद असेल, तर तो समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात येणे, खूप काही अस्वाभाविक नाही. ‘खाण तशी माती!’ मग ते राजकारण असो, शिक्षण क्षेत्र असो किंवा व्यापारी क्षेत्र असो. या सर्व क्षेत्रांमध्ये जातीयवादाचा बोलबाला आपल्याला दिसून येतो. यातील राजकारण हे समाजावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे क्षेत्र आहे. त्यामुळे राजकारणातील जातीयवादाचा प्रभाव समाजावर अधिक प्रमाणात पडला. यातून मग साहित्यक्षेत्रही सुटले नाही.
महाराष्ट्राचाच विचार केला, तर राजकारणात जातीयवाद आणणे आणि तो दृढमूल करणे, हे काम इतके वर्षांत सर्वाधिक इमानेइतबारे कुण्या नेत्याने किंवा राजकीय पक्षाने केले, याचे उत्तर शेंबडे पोरदेखील देईल. अतिशय सूक्ष्मपणे हा जातीयवाद या नेत्याने किंवा त्या पक्षाने साहित्यक्षेत्रात पेरला आहे आणि आज आपण त्याची विषफळे भोगत आहोत. राजकारणाच्या किंवा राजकीय स्वार्थापोटी सर्वसामान्य जन जातीयवादाच्या आमिषाला बळी पडत असतील तर ते एकवेळ क्षम्य मानता येईल. परंतु, स्वत:ला प्रतिभावान समजणारे, सर्वसामान्यांपेक्षा स्वत:ला उच्च तसेच वेगळे समजणारे साहित्यिकही जर या आमिषाला बळी पडत असतील तर त्याला काय म्हणावे?
अगदी प्राचार्य बोराडेंपासून ते साहित्यक्षेत्राशी जवळीक ठेवणार्‍या प्रत्येकाने मनाला हा प्रश्न विचारला पाहिजे. का म्हणून साहित्यिकांनी प्रस्थापित राजकारण्यांपासून दूर राहू नये? का म्हणून राजकीय स्वार्थाचा स्वत:ला स्पर्शही होऊ देऊ नये? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे अनेकांना अडचणीत आणणारी ठरतील, पण म्हणून सत्य काही कायमचे दडपले जाऊ शकत नाही. आपल्या देवदत्त प्रतिभेचा आविष्कार करून मानवी जीवनमूल्यांमध्ये मोलाची भर टाकणारी अभिव्यक्ती करण्याचे सोडून ही साहित्यिक मंडळी स्वत:पुरतेच बघण्यात इतकी वाहवत गेली की, आता हीच मंडळी याच जातीयवादाच्या डबक्यात गटांगळ्या खाताना दिसत आहेत. एखाद्याचे मत किंवा विचार मान्य नाहीत म्हणून त्याच्यावर अघोषित बंदी घालण्याचे पापही याच साहित्यिकांनी केले आहे. आता हे पाप निरस्त करण्यासाठी साहित्यिकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. साहित्यिक बोलताना इतके मोठमोठे शब्द उच्चारतो, परंतु आचरणात मात्र तो ते विचार आणत नाही. तोंडाने फुले, शाहू, आंबेडकर यांचा सतत उच्चार करायचा आणि कसोटीची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र हेच साहित्यिक गळपटलेले दिसून येतात. हा विरोधाभास साहित्यिकांनी आपल्या आचरणातून दूर केल्यास, साहित्याला भरभराटीचे दिवस येण्यास फार काळ वाट बघावी लागणार नाही.
सहिष्णुता, मैत्री, जातिविरहित समाज, निर्द्वेषी मन इत्यादी गोष्टी बोलतानादेखील आपण त्या लायकीचे आहोत का, याचा विचार झाला पाहिजे. जो उठतो तो फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत सहिष्णुता, मैत्री, सद्भाव यांच्याच गोष्टी करतो. त्याचे साहित्य किंवा आचरण बघितले तर मान शरमेने खाली जाते. आपापल्या वाचकभक्तांचे कोंडाळे करून बसायचे आणि त्यातच आपल्या नावाचा उदोउदो करून घ्यायचा, हीच आता प्रथा बनली आहे. इतके वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रभावाने असेल कदाचित, साहित्यिकांच्या पाठीचा मणका पिचलेला आहे. राजकारण्यांच्या तालावर नाचायचे, त्यांनी दिलेल्या सत्तारूपी तुकड्यावर शेपट्या हालवायच्या आणि नंतर या राजकारण्यांच्या इशार्‍याने ‘हा आपला, तो परका’ असे करत जातीयवाद पोसायचा. हे काही आता लपून राहिले नाही. एका विशिष्ट जातीचे आहात म्हणून अनेक साहित्यिकांवर आतापर्यंत या वाङ्‌मयीन क्षेत्राने अन्याय केला आहे. समाज हे बघत आहे. शासकीय पुरस्कारापासून ते विद्यापीठात अभ्यासक्रमाला पुस्तक लावेपर्यंत, हाच जातीयवाद पाळण्यात आला आहे.
काहींना तर केवळ आडनावांवरूनच या जातीयवादाचा फटका बसला आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्या वेळी मात्र कुणी या जातीयवादावर बोलले नाही. या जातीयवादाची ज्या वेळी मोठ्या खुबीने सुरवात करण्यात आली, त्या वेळी याचे काय भयानक परिणाम भविष्यात होऊ शकतात याची, ‘सूर्यालाही जे दिसत नाही ते कवीला दिसते’ ही उक्ती मोठ्या गर्वाने मिरवणार्‍या साहित्यिकांना सुतरामही कल्पना आली नसेल, असे कसे मानावे? एका विशिष्ट जातीबद्दल जनमानसात पद्धतशीरपणे द्वेष पसरविण्यात आला. त्याची जात, अपराध ठरविण्यास एक परंपरा निर्माण करण्यात आली. भोवती सामाजिक स्थिती निर्माण करण्यात आली, हा इतिहास कितीही लपवितो म्हटले तरी लपविता येणार नाही. दुसर्‍याला संपविण्याच्या हेतूने विणलेल्या जाळ्यात हे जातीयवादी साहित्यिक स्वत:च अडकलेले आहेत. परंतु, जेव्हा या जातीयवादातून विशिष्ट जातीच्या लेखकांना साहित्यक्षेत्रातून उठविण्याची कट-कारस्थाने रचली जात होती, तेव्हा मात्र कुणीच बोलले नाही. जो कुणी बोलला, त्याला अक्षरश: वाळीत टाकण्यात आले. म्हणून निदान आजतरी, जेव्हा प्राचार्य बोराडे यांच्यासारखा ज्येष्ठ साहित्यिक जातीयवादाचे भीषण रूप प्रकट करत आहे, तेव्हा त्यांच्या काळजीला सर्वांनी समजून घेतले पाहिजे. हा जातीयवादाचा भस्मासुर ज्यांनी उभा केला त्यांनीच या राक्षसाला आटोक्यात आणण्यासाठी पुढे आले पाहिजे, तरच मराठीच्या वाङ्‌मयीन क्षेत्राला काही भविष्य आहे, असे म्हणता येईल. अन्यथा, प्राचार्य बोराडे यांची ही खंत अरण्यरुदनच ठरण्याची शक्यता आहे!
@@AUTHORINFO_V1@@