ओमानला पश्चिम आशियातील स्वित्झर्लंड बनवणारा सुलतान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020   
Total Views |
modi-condoles_1 &nbs


तेलाचे साठे संपत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विकासाची पर्यायी वाट चोखाळून काबूस यांनी दुबई, अबुधाबीसारख्या अमिराती, कतार आणि सौदी अरेबियासारख्या देशांसाठी एक आदर्श घालून दिला.

 

सुमारे पाच दशकं ओमानवर राज्य करणार्‍या सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांनी १० जानेवारीला प्रदीर्घ आजारानंतर इहलोकाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून हळहळ व्यक्त केली जात असताना भारतानेही एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला. तेल, नैसर्गिक वायू आणि राजकीय इस्लाममुळे कायम अस्थिरता, यादवी आणि युद्धाचा शाप लाभलेल्या पश्चिम आशियात आपल्या संयमी आणि सुस्वभावी कूटनीतीमुळे ओमानला स्थैर्य, शांतता आणि विकासाचे बेट बनवले. तेलातून मिळणार्‍या पैशावर अय्याशी न करता तो पैसा पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतवून, लोकांसाठी दर्जेदार आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांना रोजगार पुरवला. विरोधकांना देशाच्या तेल संपत्तीत हिस्सा देऊन त्यांची बंडाळी शांत केली. तेलाचे साठे संपत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विकासाची पर्यायी वाट चोखाळून काबूस यांनी दुबई, अबुधाबीसारख्या अमिराती, कतार आणि सौदी अरेबियासारख्या देशांसाठी एक आदर्श घालून दिला.

 

विशेष म्हणजे, तेलाच्या राजकारणामुळेच काबूस सुलतानपदी विराजमान झाले; तेही ब्रिटिशांच्या पाठिंब्याने आणि आपल्या वडिलांविरुद्ध बंड करून! गेल्या अर्ध्या शतकात ओमानने 'राजेशाही ते मर्यादित लोकशाही' असा प्रवास केला असला तरी त्यावर काबूस यांचाच प्रभाव राहिला. इतका की, काबूस यांचा जन्मदिन ओमानचा 'राष्ट्रीय दिन' म्हणून साजरा केला जातो. काबूस यांच्या कार्यकाळात पश्चिम आशियात अरब आणि इस्रायल यांच्यातील यॉम किप्पुर युद्ध, इराणमधील इस्लामिक क्रांती, अमेरिका-इराक यांच्यातील दोन युद्धे, तालिबान, अल-कायदा आणि इसिस यांचा उदय आणि अस्त, लोकशाहीवादी अरब राज्यक्रांत्या ते सध्या येमेनमध्ये चालू असलेले यादवी युद्ध, अशी प्रचंड उलथापालथ झाली. आजही या भागावर 'इराण विरुद्ध अमेरिका' युद्धाचे सावट आहे, पण असे असूनही ओमानने स्वित्झर्लंडप्रमाणे तटस्थता जपली. एवढेच नाही, तर परस्परांविरुद्ध लढणार्‍या किंवा उभे ठाकलेल्या देशांसाठी ओमान ही शांततेच्या वाटाघाटींची जागा बनली.

 

भौगोलिकदृष्ट्या ओमान हे आखाती अरबस्तानचा भाग असले तरी ते भारत, पाकिस्तान आणि इराणच्याही जवळ आहे. इतके की, सौराष्ट्राच्या किनार्‍यावर उभे राहिल्यास ओमानचा किनारा दिल्लीहून जवळ आहे. त्यामुळे ओमानची ४५ लाख लोकसंख्या ही अरब, आफ्रिका आणि येमेनहून आलेल्या भटक्या जमाती ते दक्षिण आशियातून आलेले व्यापारी अशी संमिश्र आहे. तेलाच्या शोधानंतर आलेल्या सुबत्तेमुळे नोकरी-धंद्यासाठी आलेल्या लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के असून त्यातील सुमारे आठ लाख लोक भारतातून आले आहेत.

 

काबूस यांचे वडील सुलतान सैद बिन तैमूर यांनी ओमानला उर्वरित जगापासून वेगळे पाडले होते. त्यांच्या कार्यकाळात ओमान येमेनमधील टोळ्यांशी यादवी युद्धामध्ये अडकले होते. त्यांनी काबूस यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले असले तरी, १९६५ साली ते तेथून परत आल्यावर त्यांना पाश्चिमात्त्य राष्ट्रांची फूस आहे, या संशयावरून जवळपास सहा वर्षं स्थानबद्धतेत ठेवले होते. ब्रिटनने शांततामय मार्गाने घडवून आणलेल्या उठावातून तैमूरना सत्ता सोडावी लागली. त्यानंतर काबूस यांना त्यांच्या जागी बसवण्यात आले. काबूस यांनी ओमानला जगाशी जोडण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्र, अरब लीग आणि आखाती देशांनी सहकार्य संस्थेचे सदस्यत्त्व घेतले.

 

इराणच्या शहाशी चांगले संबंध असणार्‍या काबूस यांनी १९७९च्या इस्लामिक क्रांतीनंतर अयायुल्ला रुहोल्ला खामेनींशीही चांगले संबंध प्रस्थापित केले. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यात शांततेच्या वाटाघाटी सुरू असताना त्यांनी यित्झाक राबिन आणि शिमॉन पेरेस या दोन इस्रायली पंतप्रधानांचे ओमानमध्ये स्वागत केले. इस्रायलशी पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊ शकले नसले तरी अनौपचारिक संबंध सुरूच राहिले. २०१८ साली इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी ओमानला सपत्नीक भेट दिली. २०१३ साली इराणच्या युरेनियम समृद्धीकरणाला मर्यादा घालण्याबाबतच्या करारापूर्वीच्या अनौपचारिक चर्चेची सुरुवातही ओमानमध्येच झाली.

 

भारत आणि ओमान यांच्यात सुमारे पाच हजार वर्षांपासून संबंध आहेत. ओमानमध्ये सुमारे दोनशे वर्षं जुने शिवमंदिर आहे. भारत आणि ओमान यांच्यातील राजनैतिक संबंधांची सुरुवात १९५५ साली झाली. २००८ साली त्यांना सामरिक भागीदारीच्या स्तरावर नेण्यात आले. फेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओमानला भेट दिली असता, सुलतान काबूस यांनी त्यांच्या सभेसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील रॉयल बॉक्स दिला होता. ओमानला सुमारे १७०० किमी लांबीचा किनारा लाभला असून त्याच्या सभोवतालच्या समुद्रातून जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्ग जातात. येमेनमधील यादवी युद्ध ओमानमध्ये पसरण्याचा धोका असून सोमालिया आणि अन्य भागातील चाच्यांचा आणि दहशतवाद्यांचाही ओमानला फटका बसू शकतो. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असलेल्या भारताने आपल्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी ओमानची अपेक्षा आहे. भारतीय हवाई दल ओमानच्या हवाई दलासोबत सराव करत असून भारतीय नौदलाने चाचेगिरी रोखण्यासाठी तैनात असलेल्या युद्धनौका ओमानच्या बंदरांत सज्ज ठेवल्या आहेत.

 

पंतप्रधान मोदींच्या ओमान भेटीत संरक्षण क्षेत्रातील या सहकार्याला एक नवीन आयाम देण्यात आला. सध्या ओमानची राजधानी मस्कतपासून ५५० किमी अंतरावर असणारे दुकाम बंदर विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करत असून यामध्ये अदानी समूह १.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्याचसोबत दुकाम विशेष आर्थिक क्षेत्रात भारत आणि ओमानच्या संयुक्त विद्यमाने 'लिटल इंडिया' हा पर्यटन विभाग उभारला जाणार आहे. दरवर्षी दुबई आणि अबुधाबीसारख्या ठिकाणी लाखो भारतीय पर्यटक जातात. त्यांच्यातील काही दुकामला आले, तसेच आखातात स्थायिक झालेले प्रवासी भारतीय तिथे सुट्टी घालवण्यासाठी आले, तर ओमानच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल आणि यातून भारतीय कंपन्यांनाही संधी उपलब्ध होतील.

 

मोदींच्या ओमान दौर्‍यात दुकाम बंदरामध्ये भारतीय नौदलाच्या बोटी तैनात करण्याबाबतही करार झाला. दुकामपासून पाकिस्तानमध्ये चीन विकसित करत असलेले ग्वादार बंदर, तसेच जिबूतीमधील चीनचा नाविक तळ हाकेच्या अंतरावर असून विमानाने केवळ ४० मिनिटांत मुंबईला पोहोचणे शक्य आहे. दुकाममुळे इराणमधील चाबहार आणि सेशल्समधील अ‍ॅसम्शन बेटांनंतर हिंद महासागरातील तिसर्‍या बंदरावर भारताला प्रवेश मिळाला आहे.

 

गेल्या महिन्यातच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी इराणहून परतताना ओमानला भेट दिली. ओमानमध्ये त्यांची इराण आणि ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा झाली. सध्या अमेरिका आणि इराणमधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेने इराणविरुद्ध कडक निर्बंध लादले असले तरी, भारताच्या चाबहार प्रकल्पाला त्यातून बाजूला ठेवले आहे. इराण आणि अमेरिकेतील तणाव कमी करण्यासाठी ओमान महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

 

पर्शियन आखातातील स्थैर्य आणि शांतता भारतासाठी महत्त्वाची आहे. सुलतान काबूस यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ओमानचे सांस्कृतिक मंत्री हैतम बिन तारिक अल सैद यांची सुलतान म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यापुढेही ओमानचे स्थैर्य आणि सुरक्षा कायम राखणे आणि तेलाच्या किमती घसरत असताना अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत शोधण्याचे आव्हान आहे. त्यांनी आपण सुलतान काबूसचाच वारसा पुढे चालवणार असल्याचे घोषित केले आहे. त्यांच्या कार्यकाळात भारत आणि ओमानमधील संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा आहे.



@@AUTHORINFO_V1@@