कौशल्यातून महिला सक्षमीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020   
Total Views |
Ruchi _1  H x W


'रुची सामाजिक संस्थे'चा कौतुकास्पद उपक्रम

 

जागतिकीकरणाच्या या युगात महिला शिक्षणाकडे वळत असल्या तरी आजही समाजनिर्बंध, तसेच आर्थिक कमतरता यामुळे स्वखर्चाकडे त्या लक्ष देत नाही. काही परिस्थितीत तर त्या आर्थिक जबाबदारी पेलण्यापेक्षा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहणे पत्करतात. अशा या परिस्थितीत कल्याणमधील 'रुची सामाजिक संस्थे'च्या माध्यमातून या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिले जात आहेत.

 

या माध्यमातून महिलांना प्रमाणपत्रही देण्यात येते. वंदना लोखंडे या मूळ मुंबई येथील विक्रोळी येथे राहणार्‍या जैन कुटुंबातील. त्यांचे २००८ साली लग्न झाले व त्या कल्याणच्या रहिवासी झाल्या. या काळात त्यांना अनुभव आला की, त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या त्यांच्या मैत्रिणीची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्याकारणाने त्या मैत्रिणींना शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. शिक्षण नसल्यामुळे या मैत्रिणींना मनासारखी नोकरी-व्यवसायही करता येत नव्हता. साहजिकच त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीचीच राहत असे. तसे पाहिले तर वंदना यांना शालेय जीवनापासूनच समाजसेवेची आवड होती. त्यांचे कुटुंबही विविध माध्यमातून समाजसेवा करीत असल्याचे त्यांनी लहानपणापासून पाहिले होतेत्यामुळे आपणही समाजासाठी कार्य करावे, अशी इच्छा त्यांच्या मनात होती.

 

मैत्रिणींचे निराशजनक आयुष्य पाहून त्यांनी ठरवले की, आपण मैत्रिणींचे आयुष्य प्रगतिपथावर आणण्यासाठी काम करायचे. त्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी रूची सामाजिक संस्थेची निर्मिती केली. संस्थेच्यावतीने कल्याण परिसरातील गरजू महिलांना रोजगार मिळावा, असा या संस्थेचा प्राथमिक हेतू होता व त्या माध्यमातून त्यांनी कल्याणमध्ये काम सुरू केले. कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देता येऊ शकते, हे वंदना यांच्या लक्षात आले. त्यांनी कौशल्य विकासाबाबत माहिती मिळवली व त्यांनी या कामाची सुरुवात केली.
 

या माध्यमातून त्यांनी महिलांना ब्युटी पार्लर तसेच शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले, तेही घरच्या घरी. घरातले कामधाम आटपून फावल्या वेळात त्या कमावू शकत होत्या. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून शिक्षण घेणार्‍या महिलांना सात हजार रुपये मानधनही देण्यात येते. या संस्थेच्या माध्यमातून सुमारे ५०० हून अधिक मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. वंदना लोखंडे यांचे काम पाहता त्यांना 'सावित्रीच्या लेकी' हा पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. त्यांनी सुरू केलेल्या 'पिंक स्कूल'ची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना तीन वेळा हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 

संस्थेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकीन आदिवासी महिलांना वाटप करण्याची मोहीमही हाती घेण्यात आली. या महिलांना नॅपकीन वापरण्याचे महत्त्व समजावून देतही संस्था काम करीत आहे. १३ जानेवारी रोजी या संस्थेतर्फे नुकतेच कोळसेवाडी येथील नंददीप अनाथाश्रमाला सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आलेसंस्थेचा उद्देश सांगताना वंदना म्हणतात,“अजूनही स्त्रीला माणूसपणाचा दर्जा सहसा दिला जात नाही. एक लैंगिक वस्तू म्हणून तिचा वापर न व्हावा, तिला तिच्या मनानुसार, मतानुसर जगता यावे, तिचा व तिच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे शोषण होऊ नये म्हणून स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. कारण, त्यामुळे स्त्री आवश्यक ते निर्णय विनादडपण घेऊ शकते. महिलांसाठी समान अधिकार, आर्थिक सक्षमीकरण अनिवार्य आहे. नवरा म्हणजे उपजीविकेचे साधन असे मानून कोणत्याही महिलेला जगावे लागू नये. आपण आपल्या पायावर उभे राहायलाच हवे, हे ध्येय प्रत्येक महिलेने जोपासले पाहिजे.”

 

अर्थात, या संस्थेच्या या ध्येयासाठी संस्थेला अनेक टप्पे अजून पार करायचे आहेत. कारण, गरजू महिलांशी संपर्क, संवाद त्यानंतर त्यांच्या गरजेनुसार त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, ते दिल्यानंतर त्या महिलांना रोजगार निर्मितीसाठी आत्मबळ तसेच सर्वच प्रकारचे साहाय्य करणे हे मोठे काम आहे. या कामासाठी सातत्य, तसेच या कामात झोकून देणारे सहकारी, आर्थिक पाठबळ गरजेचे असते. संस्था या दिशेने वाटचाल करत आहे. समाजातील जास्तीत जास्त महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वंदना लोखंडे 'रूची संस्थे'सह अखंड कार्यमग्न आहे.



@@AUTHORINFO_V1@@