उत्तर कोरिया आणि आझादी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020   
Total Views |
Kim jon ung _1  


त्या घरात दोन बालके होती आणि घराला भीषण आग लागली. बालकांना बाहेर काढणे म्हणजे आत्मघातच होता. पण, त्यांना बाहेर काढले नसते तर ती बालके आगीने होरपळून जळून राख झाली असती. त्या बालकांच्या आईने आईपणाचे सत्व राखत आगीमध्ये उडी घेतली. आपल्या दोन मुलांचा जीव तिने वाचवला. तिचे दैव बलवत्तर होते, म्हणून तिचे साहस यशस्वी झाले. पण या आदर्श शूर मातेस तुरुंगात डांबण्यात आले.

 

कारण, ही घटना आहे उत्तर कोरियाची. ती महिला नागरिकआहे उत्तर कोरिया या हुकूमशाही देशाची. तिला गुन्हेगार ठरवून तुरुंगात धाडण्यात आले. याचे कारण तिने स्वतःच्या मुलांना वाचवले, पण तिच्या घराच्या भिंतीवर तिच्या राष्ट्राध्यक्षांचा म्हणजेच किम जाँग ऊनचा आणि त्यांच्या पूर्वजांचे फोटो होते. ते फोटो आगीच्या भक्ष्यस्थानी पडून राख झाले. यावरून त्या महिलेला तुरुंगात डांबण्यात आले. कारण, राष्ट्राध्यक्ष किम जाँग ऊनचा आणि त्याच्या पूर्वजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात भिंतीवर लावलेलेच हवे, अशी उत्तर कोरियामध्ये सरकारची सक्ती आहे. इतकेच नव्हे तर या फोटोंना फोटोसारखी वागणूक द्यायची नाही, तर ते फोटो नसून जणू जिवंत माणसे आहेत, असेच त्या फोटोसमोर सगळ्या घरादाराने वागायचे. यात जराशी जरी चूक आढळली तरीसुद्धा तुरुंगवास ठरलेला. त्यामुळे या महिलेने राष्ट्राध्यक्ष आणि त्याच्या पूर्वजांचे फोटो त्या आगीतून का काढले नाहीत म्हणून तिला शिक्षा झाली. ही मूर्खपणाची सक्ती वाटेल, पण असे अनेक अजब नियम उत्तर कोरियामध्ये आहेत.

 

तिथल्या सत्ताधारी पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल एक शब्द जरी विनाकारण काढलात तर शिक्षा ठरलेलीच उत्तर कोरियामध्ये उठसूठ अभिव्यक्त होण्यासाठीही कठोर नियम आहेत बरं. जसे तिथे दूरदर्शनवर तीनच चॅनेल्सचे प्रसारण होते. ही तिन्ही चॅनेल्स सरकारी आहेत. इथे मोजून १२ वृत्तपत्रे आहेत आणि तीही सरकारने तपासून घेतलेली. इंटरनेट जगाचा श्वास झाला आहे. पण, इथे सरकारमध्ये मोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारीच जागतिक संपर्काचे इंटरनेट वापरू शकतात. इतर कुणीही उत्तर कोरियन नागरिक जागतिक संपर्क देणारे इंटरनेट वापरू शकत नाही. हो, पण देशातल्या देशात, संपर्कासाठी इंटरनेट सुविधा सरकार नागरिकांना देते. तसेच सरकारने मान्यता दिलेल्या १५ केशरचनांपैकीच एक केशरचना इथले नागरिक करू शकतात. त्यापलीकडे केशरचना केल्यास तुम्ही चक्क 'गुन्हेगार' ठरता.

 

हो आणि एक, राष्ट्राध्यक्ष किम जाँग ऊनसारखी केशरचना कुणीही करू शकत नाही. तसे करणे म्हणजे दंडनीय अपराध आहे. इतकेच काय? किम जाँग ऊन किंवा त्यांच्या पूर्वजांचे नाव कुणीही आपल्या बाळाला ठेवू शकत नाही. हे सगळे दंडनीय अपराध नागरिक करतात की नाही, हे पाहण्यासाठी किम जाँग ऊनची स्वतंत्र व्यवस्था आहे. असे अपराध कुणी केल्यास त्यांना सरळ अपराधी क्षेत्रवस्तीत टाकले जाते. या परिसराच्या बाजूने विजेच्या तारेची कुंपणे घातलेली आहेत. किमान दीड ते दोन लाख अपराधी या वस्तीत राहतात. अभ्यासकांचे मत आहे की, या तुरुंगात राहणारे लोक कुपोषणाने मरतात, शेतीकाम, खाणकाम, इतर कष्टाचे काम करून मरतात. पण, मरेपर्यंत त्यांची सुटका होत नाही. त्यामुळे उत्तर कोरियाचे नागरिक हे सगळे कायदे मुकाट्याने पाळतात.

 

दुसर्‍या महायुद्धानंतर कोरियाच्या उत्तर भागावर रशियाने वर्चस्व मिळवले, तर दक्षिणेवर अमेरिकेने. पुढे कोरियाचे उत्तर-दक्षिण विभाजन होऊन उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन स्वतंत्र देश जगाच्या नकाशावर आले. त्यानंतरही उत्तर कोरियाने समाजवादी रचना स्वीकारली, पण गाभा कम्युनिस्टांच्या दडपशाहीचाच. समाजवादी रचना स्वीकारलेल्या या देशात नागरिकांची वर्गवारी ५१ भागांत केलेली आहे. देशाच्या राजधानीत प्रथम क्रमांकाचेच नागरिक राहतील, जे सर्वच बाबतीत उच्च स्तरावर असतील. हे उच्चस्तरीय नागरिक कोण, हे देखील सरकारच ठरवणार. हे सगळे पाहून आश्चर्य वाटते. आजही जगाच्या पाठीवर असले कायदे असलेला देश आहे? आपल्या इकडच्या 'आझादी' आणि 'तुकडे तुकडे गँग'साठी खरे कार्यक्षेत्र म्हणजे उत्तर कोरिया. त्यांनी तिथे जाऊन 'आझादी'ची संकल्पना स्पष्ट करावी. आझादी मागावी, घ्यावी, द्यावी. कारण, उत्तर कोरियाच्या मानाने आपला भारत देश तर 'आझादी'चा स्वर्गच आहे.



@@AUTHORINFO_V1@@