तेज गोलंदाजीचा 'नवदीप'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |
n_1  H x W: 0 x

सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू अशी मजल मारणार्‍या या नवदीप सैनीच्या आयुष्याची संघर्षमय कहाणी सांगणारा हा लेख...

क्रिकेट या खेळाला भारतात मोठ्या प्रमाणात पसंती असून देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात हा खेळ अगदी आवर्जून खेळला जातो. म्हणूनच 'भारतीयांच्या रक्तातील खेळ' म्हणून या खेळ देशातील तरुणाईच्या गळ्यातले अगदी ताईत. गल्लीबोळातील असो, क्लबमधील अथवा शास्त्रशुद्ध क्रिकेट खेळणारा खेळाडू, प्रत्येकजण आंतरराष्ट्रीय स्तरावर एक यशस्वी क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक कमावण्याचे स्वप्न पाहतो. यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. काही जण आपल्या मेहनतीच्या जोरावर आपले हे स्वप्न पूर्ण करतात, तर काहींचे स्वप्न हे स्वप्नच बनून राहते. मात्र, अथांग कष्टाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार्‍या खेळाडूंचे नाव संपूर्ण विश्वात प्रसिद्ध होते. भारतीय संघात नुकताच प्रवेश करणारा जलगदती गोलंदाज नवदीप सैनी हा त्यापैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही.

एकेकाळी केवळ १०० आणि २०० रुपयांसाठी क्रिकेट सामने खेळणारा हा खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक मुख्य गोलंदाज म्हणून ओळखला जातो. 'एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू' अशी मजल मारणार्‍या या नवदीप सैनीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी जीवापाड मेहनत केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू होण्यासाठी त्याने आयुष्यात मोठा संघर्ष केला. आजघडीला भारतीय संघात जलदगती गोलंदाज म्हणून प्रवेश मिळविणार्‍या सैनीकडे एकेकाळी मैदानावर धावण्यासाठी लागणारे बूटदेखील खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी नवदीपला आपल्या क्रिकेट करिअरला पूर्णविराम द्यावा लागला होता.

मात्र, भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर यावेळी सैनीच्या मदतीला धावून आला. त्याने क्रिकेटसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिल्यानंतर नवदीप सैनीचे क्रिकेट करिअर पुन्हा सुरू झाले. सहयोगी खेळाडूने मदतीचा हात दिल्याची जाणीव ठेवत नवदीपने यानंतर आणखी कसून सराव करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. 'रणजी' सामान्यापासून, आयपीएलसह सर्व प्रकारच्या सामन्यांमध्ये त्याने उत्तम कामगिरी करत स्वतःला घडविले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू होण्यात यश मिळविले. त्याच्या या तेज गोलंदाजीची सध्या जगभरात चर्चा होत असून नवदीपवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवदीप सैनी हा मूळचा हरियाणाचा. २३ नोव्हेंबर, १९९२ साली त्याचा जन्म झाला. हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात तरावडी या गावात त्याचे कुटुंब वास्तव्यास आहे. नवदीपचे वडील हे एक टॅक्सीचालक होते. नवदीप आणि त्याचा भाऊ या दोघांनाही लहानपणापासूनच क्रिकेटची आवड. क्रिकेटच्या खेळात मन रमत असल्याने अभ्यासाकडे दोघांचाही ओढा तसा कमीच होता. आपल्या मुलांनी क्रिकेटऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून नोकरी करावी आणि कुटुंबाला हातभार लावावा, असे वडिलांचे मत होते. परंतु, नवदीपचे मन मात्र काही हे मानण्यास तयार होईना. आपल्याला क्रिकेटमध्येच करिअर घडवायचे आहे, याचा अट्टाहास धरून बसलेल्या नवदीपने आपल्या वडिलांजवळ क्रिकेटमध्ये करिअर घडविण्यासाठी क्लबमधील प्रशिक्षण मिळवून देण्याची मागणी केली. मात्र, क्लबमधील प्रशिक्षणासाठी आर्थिक पदरमोड करून पैसे गोळा करणे सैनी कुटुंबीयांना अशक्य झाले. त्यामुळे नवदीपला क्लबमधील प्रशिक्षणही मिळू शकले नाही. टेनिस चेंडूनेच नवदीप सराव करू लागला. क्लबमधील प्रशिक्षणच न मिळाल्याने वयाच्या २१व्या वर्षापर्यंत त्याने टेनिस चेंडूनेच सराव केला.

संपूर्ण कारकीर्द लेदर चेंडूने सराव करूनही अनेकांना क्रिकेटमध्ये करिअर घडवता आलेले नाही. त्यामुळे अल्पावधीतच या चेंडूचा सराव करत नवदीप सैनीने आंतरराष्ट्रीय संघात आपली जागा मिळविली. हे खरंच फार प्रशंसनीय असल्याचे मत अनेक गोलंदाजीचे प्रशिक्षक व्यक्त करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येणार्‍या लेदर चेंडूचा सराव नसल्याने सुरुवातील नवदीपला गोलंदाजी करणे अवघड जायचे. मात्र गंभीरने याही वेळी मनोबल वाढवत त्याला धीर दिला. दिल्लीचे माजी गोलंदाज सुमित नरवाल यांनी करनाल प्रीमियर लीग स्पर्धेत सैनीला टेनिस चेंडूने गोलंदाजी करताना पाहिले. नरवाल यांनी त्याच्या तेज गोलंदाजीतील वैशिष्ट्ये ओळखत सैनीला दिल्लीकडून खेळण्यास संधी दिली.

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हादेखील सैनीच्या गोलंदाजीने प्रभावित झाला. गंभीरने त्याला त्यानंतर क्रिकेटचे साहित्य खरेदी करून दिले आणि त्यानंतर त्याचे आयुष्यच पालटले. येथूनच त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर 'रणजी', 'आयपीएल'सह विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली. 'आयपीएल'मध्ये त्याच्यावर कोट्यवधींची बोलीही लागली. त्यानंतर सैनीने आणखी सराव करत स्वतःला जलदगती गोलंदाज म्हणून सिद्ध केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण करण्यात यश मिळवले. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करणार्‍या या सैनीला दै. 'मुंबई तरुण भारत'कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

- रामचंद्र नाईक




@@AUTHORINFO_V1@@