कोकण किनारपट्टीवरील पाकोळीच्या संशोधनास हिरवा कंदील !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020   
Total Views |

tiger_1  H x W:


'सेकाॅन'चे पक्षीशास्त्रज्ञ करणार भारतीय पाकोळीच्या सद्यस्थितीचा अभ्यास


रेवदंडा (अक्षय मांडवकर) - 'केंद्रीय पर्यावरण व वन विभागा'ने (एमओईएफ) महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर भारतीय पाकोळी पक्ष्यांवरील संशोधन कार्यास मान्यता दिली आहे. 'सालीम अली पक्षीशास्त्र व प्रकृती विज्ञान केंद्रा'चे (सेकाॅन) पक्षीशास्त्रज्ञ पुढील तीन वर्षांमध्ये या पक्ष्यांची गणना,अधिवास आणि त्यांना उद्दभवलेल्या धोक्यांबाबत अभ्यास करणार आहेत. भारतीय पाकोळीच्या घरट्यांना वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यांच्यावर संशोधन करुन संवर्धनात्मक उपायोजना राबविणे आवश्यक आहे.

 

tiger_1  H x W: 
 
 

अलिबाग येथील रेवदंड्यामध्ये शनिवारी ३३ व्या 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना'चा पहिला दिवस पार पडला. यावेळी संमेलनामध्ये कोकण किनारपट्टीवर सुरू होणाऱ्या भारतीय पाकोळी पक्ष्यांच्या संशोधन प्रकल्पाविषयी घोषणा करण्यात आली. भारतात पाकोळीच्या हिमालयीन पाकोळी,भारतीय पाकोळी, ग्लाॅसी पाकोळी आणि एडिबल-नेस्ट पोकळी अशा चार प्रजाती आढळतात. चिमणीच्या आकाराचा हा पक्षी प्रामुख्याने गुहांमध्ये अधिवास करतो. या पक्ष्यांनी त्यांच्या लाळेपासून तयार केलेल्या घरट्यांना वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या पक्ष्यांच्या घरट्यांपासून तयार केलेला सूप प्यायाल्याने लैैंगिकशक्ती वाढत असल्याचा समज आहे. ईशान्य आशियाई देशांमध्ये या सूपला मागणी आहे. त्यामुळे दोन लाख रुपये किलो दराने भारतीय पाकोळीच्या घरट्यांची विक्री करण्यात येते. महाराष्ट्रात प्रामुख्याने रायगड ते सिंधुदुर्गच्या किनारपट्टी क्षेत्रात भारतीय पाकोळीचा अधिवास आहे. 

 
 

चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्ग मित्र' या संस्थेने २००० साली सिंधुदुर्गातील 'वेंगुर्ला राॅक्स' बेटावरुन या पक्ष्यांच्या घरट्यांची तस्करी उघडकीस आणली होती. त्यानंतर या पक्ष्याला संरक्षण देण्यासाठी संस्थेने महाराष्ट्र वन विभागाच्या मदतीने केंद्रीकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून २००३ साली या पक्ष्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षण देण्यात आले. सध्या भारतीय पोकळीला वाघांऐवढे संरक्षण लाभले आहे. आता साधारण वीस वर्षांनंतर या पक्ष्यांच्या सद्यस्थितीचा अभ्यास 'सेकाॅन'चे पक्षीशास्त्रज्ञ डाॅ. शिरीष मंची करणार आहेत. 'एमओईएएफ'ने तीन वर्षांच्या या संशोधन कार्यास मान्यता दिली आहे. यासाठी ४९ लाख रुपयांचा संशोधन निधी पारित करण्यात आला आहे. गेल्या १६ वर्षांपासून डाॅ.मंची अंदमान बेटांवर पाकोळी पक्ष्यांवर संशोधनाचे काम करत आहेत. स्थानिकांच्या मदतीने या पक्ष्यांचे संवर्धन करण्यामध्ये त्यांना यश मिळाले आहे. सद्यस्थितीत केंद्रीय वन विभागाने वन्यजीवांच्या अनुषंगाने संरक्षित नसलेल्या क्षेत्रांमध्ये या पक्ष्यावर संशोधन करण्यास परवानगी दिल्याची माहिती डाॅ. मंची यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. मात्र, येत्या काळात संरक्षित क्षेत्रामध्ये या पक्ष्यावर संशोधन करण्यासाठी 'सेकाॅन'तर्फे महाराष्ट्र वन विभागास प्रस्ताव देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

tiger_1  H x W: 
 
 
सद्यस्थितीचा आढावा 

पुढील तीन वर्षांमध्ये कोकण किनारपट्टीवर सहा सागरी जिल्ह्यांमध्ये भारतीय पाकोळींची गणना त्यांच्या अधिवास आणि धोके यांबाबत अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर संर्वधनात्मक उपाययोजनांबाबत आरखडा तयार करण्यात येणार आहे. - डाॅ. शिरीष मंची, पक्षीशास्त्रज्ञ, सेकाॅन

 
 
 
अभ्यास महत्त्वाचाच 

विशिष्ट कालावधीनंतर एखाद्या पक्ष्याच्या सद्यस्थितीचा अंदाज घेणे आवश्यक आहे. 'सह्याद्री निसर्ग मित्र'ने २००० साली या पक्ष्यांच्या घरट्यांची तस्करी उघडकीस आणली. त्यानंतर गेल्या वीस वर्षांमध्ये या पक्ष्यांच्या अधिवासाबाबत आढावा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता सुरू होणाऱ्या संशोधन प्रकल्पामुळे भारतीय पोकळींच्या अधिवासाची सद्यस्थिती समोर येईल. - भाऊ काटदरे, संस्थापक, सह्याद्री निसर्ग मित्र

 
 
परवानगी देणार

महाराष्ट्राच्या संरक्षित क्षेत्रामध्ये भारतीय पाकोळीचे संशोधन कार्य करण्यासंदर्भात 'सेकाॅन'चे पक्षीशास्त्रज्ञ प्रस्ताव देणार आहेत. त्याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षकांसोबत (वन्यजीव) पाठपुरावा करुन त्यांना परवानगी देण्याबाबत पूर्णपणे प्रयत्न करण्यात येतील. - सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम)

@@AUTHORINFO_V1@@