'सीएए'वरून तरुणांची दिशाभूल : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |
Narendra Moudi _1 &n
 


कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या जाहीर सभांमधून राज्य सरकारच्या कारभारांवर टीकास्त्रांचे बाण सोडल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालच्या गडाला हादरे बसले. येथील जाहीर सभांमध्ये बोलताना मोदी यांनी पश्चिम बंगालमधील वाढता हिंसाचारावर बोट ठेवले. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) होणार्‍या विरोधाबाबतही त्यांनी भाष्य केले. या कायद्यावरून तरुणांची नाहक दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रसिद्ध बेलूर मठाला भेट दिली. येथील साधू-संतांशी चर्चा करत मोदी यांनी मठात जाऊन यावेळी विवेकानंदांच्या स्मृतीथळाचे दर्शन घेतले. त्यानंतर येथील विशाल जनसमूहाला संबोधित करताना मोदी म्हणाले, "नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल (सीएए) सर्वत्र अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. मात्र हा कायदा नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला आहे. मात्र, काही राजकीय पक्ष जाणूनबुजून समजावून घेत नाही. हा कायदा लागू झाल्यानंतर अल्पसंख्याकांवर अत्याचार का केले, याचे उत्तर पाकिस्तानला द्यावे लागेल. म्हणून त्यांचा थयथयाट झाला आहे. मात्र असे असतानाही काही विरोधक मुद्दाम याविरोधात तरुणांची माथी भडकावून त्यांची दिशाभूल करत आहेत," असे मोदी यावेळी म्हणाले.

 

पुढे ते म्हणाले की, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तरुणांच्या मनात या कायद्याबाबत शंका निर्माण केल्या जात आहेत. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. त्या तरूणांना समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. दुसर्‍या देशातला कुणीही नागरिकत्व घेऊ शकतो हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, हिसकावून घेणारा नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा केवळ सध्याच्या कायद्यात केलेली दुरुस्ती आहे. फाळणीमुळे ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायला पाहिजे असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासहित अनेक दिग्गज नेत्यांना वाटत होते. जे गांधीजींनी सांगितले त्याचे पालन आम्ही केले. आजही कोणत्याही धर्माची व्यक्ती ज्यांचा भारताच्या संविधानावर विश्वास आहे, ते प्रक्रियेनुसार भारतीय नागरिकत्व मिळवू शकते," असे मोदी म्हणाले.

 

'पश्चिम बंगालच्या धोरणकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी'

'माझ्या मनात नेहमीच दुःख राहील आणि पश्चिम बंगालच्या धोरणकर्त्यांना सद्बुद्धी दे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. गरिबांना आयुष्मान योजना आणि शेतकर्‍यांना पीएम शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळावा,' असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

कोलकाता पोर्टचे नामांतर

कोलकाता येथील सभेत बोलताना मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाचे स्वप्न पाहिले होते. पण येथील राज्य सरकारांनी त्याकडे पाठ केली, असा आरोप मोदींनी यावेळी केला. कोलकाता पोर्टला डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट असे नाव देण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. कटमनी मिळत नसल्याने राज्य सरकार केंद्राच्या योजना लागू करत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता केला. पश्चिम बंगालमधील सरकार आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता देईल, त्यावेळी येथील लोकांना या योजनांचा लाभ मिळेल. या योजनांना सरकार मान्यता देईल की नाही हे मी सांगू शकत नाही. जर योजना राबवण्यास मान्यता दिली तर, येथील लोकांना त्यांचा लाभ मिळेल. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून ७५ लाख लोकांना गंभीर आजारपणात मोफत उपचार मिळाले आहेत. त्यात कोणताही मध्यस्थी नाही. कमिशन नाही. त्यामुळं या योजना कोण लागू करणार, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.






 
@@AUTHORINFO_V1@@