"वाङ्मयातील जातीय दहशतवादाबद्दल कधी, कोण बोलणार?"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |
Osmanabad _1  H
 

ज्येष्ठ कथा-कादंबरीकार रा. रं. बोराडे यांचा खडा सवाल


 

धाराशिव : "सध्या वाड्मयाच्या क्षेत्रात उघड उघड जातीयवादाला खतपाणी घातले जात आहे, त्याचा पुरस्कार केला जात आहे. वाड्मयीन क्षेत्राच्या दृष्टीने ही भयानक अवस्था असून जातीयवादाने सबंध साहित्यच पोखरण्याची अवस्था निर्माण होऊ शकते. जातीयवाद वाड्मयीन क्षेत्राचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आपण जागतिक दहशवादाबद्दल बोलतो. परंतु, वाड्मयातील या जातीय दहशतवादाबद्दल कधी, कोण बोलणार," असा खडा सवाल ज्येष्ठ कथा-कादंबरीकार रा. रं. बोराडे यांनी केला.

 

९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन मराठवाडा साहित्य परिषद, उस्मानाबाद शाखेच्या विद्यमाने दि. १०, ११ व १२ जानेवारी या कालावधीत संत गोरोबाकाका साहित्यनगरी, उस्मानाबाद येथे करण्यात आले होते. साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी येथील शाहीर अमर शेख साहित्य मंचावरील कार्यक्रमात करण्यात आला. संमेलनाच्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी वरील सवाल उपस्थित केला. दरम्यान, समारोपाप्रसंगी मंचावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, उषा तांबे, प्रतिभा सराफ, उज्ज्वला मेहेंदळे, भालचंद्र शिंदे, कपूर वासनिक, पुरुषोत्तम सप्रे, राजन लाखे, हेमलता पाटील, बाळासाहेब देशमुख, प्रसाद देशपांडे, कुंडलिक अतकरे, नितीन तावडे आदी उपस्थित होते.

 

वाड्मयातील जातीयवादावर ताशेरे ओढताना रा. रं. बोराडे म्हणाले की, "सध्या वाड्मयात उघडउघड जातीयवाद बोकाळल्याचे दिसते. परंतु, ही परिस्थिती अतिशय भयानक आहे. भविष्यात जातीयवाद सबंध वाड्मयालाच पोखरल्याशिवाय राहणार नाही. आपण जागतिक दहशतवादाबद्दल बोलतो, पण वाड्मयीन क्षेत्रातील जातीयवादाबद्दल का बोलत नाहीत, कधी बोलणार, कोण बोलणार," असा खडा सवाल बोराडे यांनी केला.
 

"लेखक, कलावंताला जात नसते. परंतु, सध्याच्या जातीयवादी प्रवृत्तींनी इथेही जातीयवाद आणला. आपल्या जातीतील लेखकांना वा साहित्यिकांनाच पुरस्कृत केले जाऊ लागले. वाड्मयीन क्षेत्रातील जातीयवादाचा विषय अतिशय गंभीर असून त्याचा सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. अन्यथा जातीयवाद वाड्मयाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही," असे रोखठोक मत यावेळी बोराडे यांनी मांडले.

 

दरम्यान, "उस्मानाबादकरांनी, आयोजकांनी अतिशय उत्तमप्रकारे या छोट्याशा गावात साहित्य संमेलनाचे देखणे आयोजन केले, एक आदर्श निर्माण केला," अशा शब्दांत त्यांनी आयोजकांचे कौतुकदेखील केले. तसेच, "अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने यापुढे महानगरांऐवजी साहित्याची भूक असलेल्या ठिकाणी संमेलनाचे आयोजन करावे," अशी सूचनाही बोराडे यांनी केली. "साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट केवळ मिरवण्याचे नसून आसपासच्या परिसरात साहित्यिक वातावरण निर्माण करण्याचे आहे. उस्मानाबाद व बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यांत साहित्यिक वातावरण, रसिक वाचक, प्रकाशन संस्था, नियतकालिके यांचा अभाव आहे. परंतु, या संमेलनाच्या निमित्ताने ही उणीव दूर करण्याचे काम सुरू होईल," असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

 

संस्कृती कलावंतांनी उभी केली

"साहित्यिकाने आपण स्वत: लिहीत असलो तरी इतरांनी लिहिलेलेदेखील वाचायलाच हवे," असे सांगतानाच बालवाड्मयाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही रा. रं. बोराडे यांनी म्हटले. "कोणताही आई-बाप आपला मुलगा लेखक, साहित्यिक, कलावंत व्हावा अशी इच्छा व्यक्त करत नाही," असे म्हणतानाच "भारतीय संस्कृती मेरिटवाल्यांनी नव्हे तर कलावंतांनीच उभी केली," असे प्रतिपादन रा. रं. बोराडे यांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@