साहित्यकृतीच्या सर्व घटकांमध्ये राजकारण हे झिरपतेच : डॉ. हरिश्चंद्र थोरात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020
Total Views |
Thorat _1  H x
 
 

धाराशिव : "कुठलाही माणूस राजकीय भूमिकेशिवाय असू शकत नाही. तशा त्या भूमिका लेखकालाही असतात. म्हणूनच साहित्यकृतीच्या सर्व घटकांमध्ये राजकीय भूमिका झिरपत गेलेली असते," असे मत ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी व्यक्त केले.

 

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत गोरोबाकाका साहित्यनगरीमध्ये शुक्रवारपासून आयोजित करण्यात आले होते. रविवार हा साहित्य संमेलनाचा अखेरचा दिवस. आजही साहित्य संमेलनात कविकट्टा, कथालेखकांशी संवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे, आजचे सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक या विषयावर आयोजित करण्यात आलेला परिसंवाद.

 

सदर परिसंवादात डॉ. श्रीकांत तिडके आणि डॉ. गणेश मोहिते यांनी भाग घेतला, तर परिसंवादाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात होते. हरिश्चंद्र थोरात यांनी यावेळी समाज म्हणजे काय व सामाजिक वास्तव म्हणजे काय, हे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात का? असा प्रश्न विचारून थोरात यांनी समाज म्हणजे विविध संस्थांचे जाळे व त्या संस्थांच्या परस्पर संबंधातून समाज आकाराला येतो, असे सांगितले. तसेच समाज नेहमी गतिशील असतो व ती गती लक्षात घेतली नाही तर समाजाचे वास्तव ध्यानात येत नाही, असे ते म्हणाले.

 

"साहित्य हा संस्कृतीचा भाग असतो पण समाज व संस्कृती वेगळी असते," अशी मांडणी यावेळी थोरात यांनी केली. "तसेच संस्कृती चिन्हांकित असते व संस्कृतीच्या पाठीशी शोषणाचे संबंध असतात. शोषणावर पांघरुण घालण्यासाठी संस्कृती निर्माण केली जाते," असेही ते म्हणाले. दरम्यान, प्रत्येक साहित्यकृती कोणाचे तरी हितसंबंध जपत असते. त्यात सत्ताधार्‍यांचा सर्वाधिक समावेश होतो, असे सांगत डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी सत्ता वा राजकारणाचे मूळ सामाजिक संरचनेत असल्याचे म्हटले. परंतु, चांगल्या दर्जाचे राजकीय भान असलेले लेखक मराठीत कमी आहेत, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
 

"लेखक हा कोणीही सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा निराळा प्राणी नसतो," असेही ते म्हणाले. "लेखकाला सामान्यांपासून बाजूला काढणे योग्य नाही. खरा लेखक व खोटा लेखक असे काहीही नसते. भेद असतो तो केवळ श्रमविभागणीचा. असे सांगत सामान्यांना जशा मर्यादा असतात तशाच त्या लेखकालाही असतात. परंतु, सामान्यांचा जसा राजकारणाशी संबंध असतो तसाच लेखकाशीही असतो आणि म्हणूनच कोणत्याही साहित्यकृतीच्या सर्व घटकांमध्ये राजकीय भूमिका झिरपत गेलेली असते," असे मत थोरात यांनी मांडले.





@@AUTHORINFO_V1@@