उस्मानाबाद : साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी काल ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यंदाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "देशात अशी काहीही परिस्थिती नाही. आपण सगळे सुजाण नागरिक आहोत, आपण का अशा हिटलरशाहीच्या मागे जाऊ? असे म्हणत त्यांनी साहित्यिकांवर कोणताही दबाव नसल्याचेही सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि ,"साहित्य आणि समाज यामधल्या बदलांबाबत ९३ व्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे फारसं काही बोलले नाहीत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिब्रेटो यांनी दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्यांचा विषय त्यांनी भाषणात घेतला होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते निरनिराळ्या विषयांवर ते बोलले. सध्या देशात घडणाऱ्या काही गोष्टींचे पडसाद हे संमेलनात उमटणे स्वाभाविक होते तसे ते उमटले. मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्य याबाबत बोलण्यापेक्षा या पडसादांवर जास्त भाष्य करण्यात आले.”
डॉ.अरुणा यांना हिटलरशाहीबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या. "हा प्रश्न तुम्ही का विचारताय माहित नाही पण अशी कोणतीही परिस्थिती सध्या देशात नाही. आपण सगळी सुजाण माणसं आहोत. आपण कशाला हिटलरच्या मागे जाणार आहोत? असं काही होणार नाही. आपण सगळी सुजाण माणसं आहोत. ”
उस्मानाबादमध्ये कालपासून सुरु झालेल्या साहित्य संमेलनात ९३व्या संमेलनाची अध्यक्षपदाची सूत्रे मावळत्या अध्यक्षा डॉ अरुण ढेरे यांनी नवे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे सोपविले. शुक्रवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे असे वक्तव्य केले होते. तसेच मोदी सरकारवरही टीका केली होती.