
नाशिक : "वैश्विक धर्माच्या कल्पनेचे संगोपन विवेकानंदांनी केले. 'नरेंद्र ते स्वामी विवेकानंद' पर्यंतच्या प्रवासात विवेकानंद यांना विविध पातळ्यांवर भावनिक संघर्ष करावा लागला. विवेकानंद यांनी विशाल ध्येयाला प्राधान्य दिले. "रामकृष्ण परमहंस यांनी सेवाभाव विवेकानंद यांच्यात रुजविला," असे प्रतिपादन मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयाम, नाशिकतर्फे गोल्डन हेरिटेज संस्कारमालेतील एक पुष्प असलेल्या," स्वामी विवेकानंद : तो महामानव आणि ते भाषण' या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून संवाद साधला.
स्वामी विवेकानंदांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील विश्व धर्म संमेलनामध्ये दिलेले भाषण त्रिखंडामध्ये गाजले. स्वामीजी अमेरिकेला का गेले? त्या भाषणामागच्या स्वामीजींच्या प्रेरणा कोणत्या होत्या? काय बोलले ते आपल्या भाषणात? त्यामागे दृष्टिकोन कोणता होता आणि तो तयार कसा झाला? खडतर भावनिक प्रसंगांमधून स्वामीजींनी कसा मार्ग काढला?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. याप्रसंगी आयामचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर उपस्थित होते. यावेळी डॉ. नाडकर्णी यांनी विवेकानंद यांच्यावर कुसुमाग्रज यांनी लिहिलेली कविता सादर केली. यावेळी नाडकर्णी यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक व स्वामी विवेकानंद यांच्यातील संबंधांचे वर्णन केले. यावेळी नाडकर्णी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या बालपणाविषयी व महाविद्यालयीन जीवनाच्या प्रवासाविषयी माहिती देत त्यांचा जीवनपट उलगडून दाखविला. स्वामी विवेकानंद यांची वाचण्याची पद्धती व त्यांची विचार करण्याची पद्धती व त्यांचे धर्माबद्दलचे विचार याबाबत नाडकर्णी यांनी विवेकानंद यांनी लिहिलेल्या विविध लेखनाचा संदर्भ देत भाष्य केले. रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्य गटाचे नेतृत्व विवेकानंद यांच्याकडे कसे आले, त्या काळात विवेकानंद यांची भावनिक स्थिती कशी होती, याबाबत माहिती देताना नाडकर्णी यांनी विवेकानंद यांच्या नोंदीचे दाखले यावेळी दिले. भावना आणि अनुभूती प्राप्त करत वाचनाची सवय रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंद यांच्या ठायी रूजवली असल्याचे ते यावेळी म्हणाले. विवेकानंद कसे घडले, याबाबत भाष्य करताना वडिलांच्या पश्चात स्वामी विवेकानंद यांना मोठा भावनिक आधार रामकृष्ण परमहंस यांनी दिला असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बोलताना नाडकर्णी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील विश्वधर्म परिषदेतील सहभागाची माहिती दिली. अमेरिकेत भारतातही मुले आणि तरुण, भारतातील मुस्लीम राजकर्ते अशा विविध विषयांवर स्वामी विवेकानंद यांनी भाषणे केली असल्याचे सांगितले. विवेकानंद यांनी परिषदेत,"माझ्या अमेरिकन बंधु भगिनींनो," अशी ऐतिहासिक सुरुवात केल्यावर विजेचा प्रचंड प्रकाश यावा तसे तेज आणि प्रचंड टाळ्यांच्या कडकडाट झाला. यावेळी विवेकानंद यांनी विश्व धर्म आपल्या ओघवत्या शैलीत आणि अभ्यासपूर्णरित्या मांडल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. तसेच, या धर्म परिषदेच्या माध्यमातून विवेकानंद यांचा पुढील प्रवास कसा सुरू झाला, याबाबतदेखील विविध उदाहरणांच्या माध्यमातून माहिती दिली.