'सीएए' हा देश सुरक्षेचा कायदा : सुनील देवधर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


डोंबिवली : "धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याच्या उद्देशाने 'सीएए' देशात लागू करणे महत्त्वाचे आहे. पारशी, जैन ख्रिस्ती लोक हे कामे मिळत नाही म्हणून, तसेच अत्याचाराला कंटाळून भारतात येतात. त्यांच्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. नागरिकत्व जाईल, असे खोटे सांगितले जात आहे. मोदी, अमित शाह यांची भाषणे ऐका, हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, काढून घेणारा नाही, हे लक्षात घ्या," असे प्रतिपादन त्रिपुरा राज्याचे भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी केले. पूर्वेतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या २३व्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या दत्तनगर येथील संस्थेच्या शाळेच्या पटांगणात हा कार्यक्रम पार पडला. या व्याख्यानमालेचे हे पहिले पुष्प देवधर यांनी गुंफले.

 

या कार्यक्रमात देवधर यांना 'सीएए' वर बोलू नये, अशी ताकीद पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली होती. त्याचा देवधर यांनी योग्य तो समाचार घेतला. ''ज्या राज्यात 'सीएए'बद्दल बोलता येत नाही, हे लांच्छनास्पद आहे. त्यामुळे व्याख्यानाचा विषय 'पूर्वांचलातील बदल' असा असला तरीही मी आधी 'सीएए'वरच बोलणार. मला अटक झाली तरीही चालेल. पोलीस यंत्रणेला मी आव्हान देतो की त्यांनी मला अटक करावी," असेही ते म्हणाले. "भारताचे नागरिकत्व या विषयावर बोलता येत नाही, हे चालणार नाही. आपण कुठे राहतो, हे काय सुरू आहे?," असा सवाल करत त्यांनी सध्याच्या महाविकास आघाडीला टोला लगावला. कम्युनिस्ट हा भारताचा एक नंबरचा शत्रू असल्याचे ते म्हणाले. "त्रिपुरा राज्यात माणिक सरकारचे पितळ आम्ही उघडे केले. त्यामुळे २५ वर्षे तेथे राष्ट्रगान होऊ दिले नाही, ही शोकांतिका होती. त्याची चीड सगळ्यांमध्ये होतीच. जेव्हा भाजपचे सरकार आले, तेव्हा राज्यपाल राज्याच्या अधिवेशनात आले, तेव्हा राष्ट्रगान झाले, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. प्रत्येकाला नागरिकत्व हवे आहे. इंदिरा गांधी, पंडित नेहरू, मनमोहन सिंग यांनी वेळोवेळी 'सीएए' असायला हवे, असे म्हटले होते, पण दिले कोणीच नाही. ते मोदी सरकारने दिले.

 

'अवॉर्ड वापसीवाले' लोक 'अवॉर्ड मॅनेज' करणारे लोक होते, हेदेखील यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. अवॉर्ड दिले, पण त्याची रक्कम नाही दिली. पैसे ठेवले, कागद पाठवून दिले. फक्त मोदी विरोधासाठी हे सगळे केले जात आहे." ''नागरिकत्व आणि एनआररसी हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे भारतात कोण लोक राहतात, याची नोंद असली तर फरक काय पडला, एनआरसी असावे असे कोणी सांगितले? तर ते पंडित नेहरूंनी म्हटले होते. अजून मोदींनी कुठेही 'एनआरसी' मांडले नाही. त्यामुळे कोणालाही अजूनही बाहेर काढले जाणार नाही. भारतात पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांना भारतात थांबता येणार नाही, हे आवर्जून लक्षात घ्यावे," असेही ते म्हणाले. " "परकीय इथे येणार, मुंब्रामध्ये राहणार. आम्हाला 'सीएए'वर बोलू नका असे म्हणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुंब्य्रात जाऊन काय चालले आहे हे आधी बघून यावे." असेही देवधर म्हणाले. ''चितगाव येथून चकमा गायब झालेत, ते आता त्रिपुरा, आसाम, मिझोराम येथे आहेत. ते मूळचे कुठले आहेत, याचा अभ्यास करावा. ७० वर्षांपासून ते भारतात राहात आहेत. त्यांना भारताचे नागरिकत्व नाही, हे त्यांच्यात भय आहे."

 

''आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नका, दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना आम्हीच पाठिंबा दिला, हे विसरू नये. अंत्योदय योजना ही कोणाची याचा विचार करावा. आदिवासी मंत्रालय कोणी निर्माण केले, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी केले. मध्ये १० वर्ष झाली पण मनमोहन सिंग सरकारने काहीच केले नाही. 'माय होम इंडिया'च्या माध्यमातून त्रिपुरा फेस्टिव्हल केला, त्यातून आगरतळा ट्रेन हवी होती, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना कळले, तेव्हा त्यांनी तातडीने ३०२७ मध्ये सुपरफास्ट ट्रेन दिली, हे लक्षात घ्यायला हवे. पाच वर्षांत ईशान्य भारतातील अत्याचाराची घटना सांगावी," असे आव्हान त्यांनी दिले. बांगलादेशी घुसखोरांची पंचाईत होणार हे लक्षात घ्यावे. पण बाकी कोणत्याही धर्मियांनी घाबरण्याचे कारण नाही," असा पुनरुच्चारही त्यांनी केला. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, उपाध्यक्ष विलास जोशी, कार्यवाह डॉ. दीपक कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी संस्था सदस्य विद्याधर शास्त्री यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार अरुण ऐतवडे यांनी मानले. त्यावेळी संस्थेचे नरेंद्र दांडेकर, बाळू जोशी, भाई उंटवाले, वसंत देशपांडे आदींसह संस्थेच्या शाळांच्या विविध शाखांमधील शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते. रा. स्व. संघाचे शशिकांत गाणार व स्वयंसेवक तसेच भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, नगरसेवक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@