आता तरी तिलारीला अभयारण्य म्हणून घोषित करा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |


safd_1  H x W:


मुंबई (अक्षय मांडवकर) : गोव्यामधील म्हादई अभयारण्यात झालेल्या चार वाघांच्या मृत्यूनंतर पश्चिम घाटातील व्याघ्र संवर्धनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असणाऱ्या तिलारी परिसराला 'अभयारण्य' म्हणून घोषित करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. म्हादई अभयारण्य, मांगेली आणि तिलारी या पट्ट्यात वाघांचे अधिवास क्षेत्र आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी जोडणाऱ्या या पट्ट्याला संरक्षित क्षेत्राचा दर्जा देणे आवश्यक असल्याचे मत वन्यजीव संशोधक व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

 

गेल्यावर्षी प्रसिद्ध झालेल्या व्याघ्र गणनेच्या चौथ्या अंदाजपत्रकामधून गोव्यात चार वाघांचा अधिवास असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या आठवड्याभरात गोवा वनविभागाला म्हादई अभयारण्यातील गोळावली परिसरात चार वाघांचे कुजलेले मृतदेह आढळले. यामध्ये वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचा समावेश आहे. शेतकऱ्याने गुरांच्या मृत शरीरातून विष दिल्याने या वाघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, यामधील एका वाघाची नखे गहाळ झाली आहेत. त्यामुळे वाघांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण आहे. म्हादई अभयारण्याचे वनक्षेत्र महाराष्ट्रातील मांगेली आणि तिलारीला जोडते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते म्हादई अभयारण्यादरम्यान असलेला हा परिसर बऱ्याच कालावधीपासून संरक्षणाच्या प्रतिक्षेत आहे. तिलारी आणि मांगेली परिसरात वाघांचा अधिवास असल्याचे सिद्ध झाले आहे. असे असूनही केवळ राजकीय आणि या परिसरात बस्तान बांधलेल्या परप्रांतीय भू-माफियांच्या दबावापोटी वनविभाग तिलारी अभयारण्य घोषित करण्यासाठी दिरंगाई करत असल्याचा आरोप वन्यजीव निरीक्षक आणि पर्यावरणप्रेमी काका भिसे यांनी केला आहे. पश्चिम घाटामध्ये नांदणाऱ्या वाघांच्या भ्रमणमार्गातील (कॉरिडोर) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा उत्तरेकडील शेवटचा टप्पा असल्याची माहिती या भागात वाघांवर काम करणारे संशोधक गिरीश पंजाबी यांनी दिली. व्याघ्र भ्रमणमार्गाच्या अनुषंगाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडण्यासाठी सिंधुदुर्गातील तिलारीचा परिसर महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या परिसराला संरक्षित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी जमीन असल्याने त्यांचे नियोजन करण्याचे आव्हान वनविभागासमोर असल्याचे पंजाबींनी नमूद केले.

 

अधिवास क्षेत्रात भिन्नता

 

विदर्भात व्याघ्र संवर्धनाला ब्रिटिश कालापासून सुरुवात झाली आहे. तेथील अधिवासक्षेत्रही वाघांसाठी पूरक आहे. कारण, त्या ठिकाणी शुष्क प्रकारचे वनक्षेत्र असल्याने भक्ष्याचे प्रमाण अधिक आहे. उलटपक्षी पश्चिम घाटामध्ये डोंगराळ भाग आणि मानवी प्रभावित क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय भक्ष्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने हा भूभाग आव्हानात्मक असल्याचे गिरीश पंजाबी यांनी सांगितले. या सर्व कारणांमुळे पश्चिम घाटामध्ये वाघांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संवर्धनात्मक योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि ठोसपणे करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

 

'तिलारी'ला संरक्षण देणे आवश्यक

 

तिलारीचा संपूर्ण परिसर व्याघ्र भ्रमंतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे या परिसराला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देऊन त्याला संरक्षण देणे आवश्यक आहे. पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात मानवी प्रभावी क्षेत्र असल्याने येथील लोकांना विदर्भातील लोकांप्रमाणे वाघांसोबत सहजीवनाची कला अवगत झालेली नाही. गोव्यामध्ये घडलेली घटना त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे वनविभागाने जनजागृतीच्या दृष्टीने काम करणेही गरजेचे आहे.

 

- अनिष अंधेरिया, अध्यक्ष, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट

@@AUTHORINFO_V1@@