हा एक फोन जरूरी आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020   
Total Views |

godakath_1  H x


हरवलेली किंवा परागंदा झालेल्या मुलांना मदत, बाल कामगारांची मुक्तता, लहान मुलांवर कोठेही आणि कोणाकडूनही होणारे अत्याचार यांना प्रतिबंध घालणे आदी स्वरूपाची कामे नवजीवन फाऊंडेशन करते. नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे फलाट क्रमांक ४. या फलाटावर एक छोटे केबिनवजा कार्यालय आपल्या सहज दृष्टीपथास पडते. येथील कर्मचारी अहोरात्र आपली सेवा बजावत असतात. नाशिकमध्ये बालकांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेल्या या संस्थेच्या कामाचा आवाका मोठा आहे. त्या कार्याचा घेतलेला हा वेध...


प्राचीन परंपरा असलेली नाशिक नगरी एक तीर्थक्षेत्रदेखील आहे
. तसेच, शिर्डी आणि मायानगरी मुंबईची भौगोलिक नजीकता नाशिकचे महत्त्व अजूनच वाढवते. त्यामुळे नाशिक नगरीत पर्यटन आणि मुंबई येथे जाण्यासाठीचे नजीकचे शहर यामुळे नेहमीच वर्दळ असल्याचे पाहावयास मिळते. नाशिकमधील अनेक गर्दीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे नाशिकरोड रेल्वेस्थानक. या रेल्वेस्थानकावर भेदरलेली आणि चुकलेली मुलेदेखील पाहावयास मिळतात. अशा मुलांना आपल्या हक्काच्या घरी पाठविण्यात आणि प्रसंगी या मुलांचे पुनर्वसन करण्यात चाइल्डलाईन ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. संस्थेच्या १०९८ या क्रमांकावर येणारा प्रत्येक फोन हा लहान मुलांवरील अत्याचार दूर करण्यास व त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यास साहाय्यभूत ठरणारा आहे. त्यामुळे हा एक फोन नक्कीच जरूरी आहे. नेहमीच गजबजलेल्या नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे फलाट क्रमांक ४. या फलाटावर एक छोटे केबिनवजा कार्यालय आपल्या सहज दृष्टीपथास पडते.


नवजीवन फाऊंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे चाइल्डलाईनचे हे कार्यालय आहे. येथील कर्मचारी २४ तास ७ दिवस अहोरात्र आपली सेवा बजावत असतात. ऑगस्ट २०१९ पासून येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तशी २००३ चाइल्डलाईन ही संस्था नाशिक शहरात आपले कार्य करत आहे. संस्थेचा टोल फ्री क्रमांक १०९८ चा नाशिकमध्ये बर्‍यापैकी प्रसार झाल्याचे दिसून येत आहे. हा क्रमांक राष्ट्रीय क्रमांक असून तो कोणत्याही दूरध्वनीवरून आणि कोठूनही सहज जोडला जात असतो. तसेच, या क्रमांकासाठी मोबाईलमध्ये बॅलन्स असण्याचीदेखील जरूरी नाही. नाशिककर नागरिकांना हा क्रमांक समजावा आणि नाशिक शहर परिसरातील मुलांना मदत पोहोचविता यावी, यासाठी या क्रमांकाचा प्रसार आणि प्रचार संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.


केवळ हरवलेली किंवा परागंदा झालेली मुलेच या संस्थेचे कार्यक्षेत्र नसून मुलांना लागणारी वैद्यकीय मदत, बाल कामगारांची मुक्तता, लहान मुलांवर कोठेही आणि कोणाकडूनही होणारे अत्याचार यांना प्रतिबंध घालणे आदी स्वरूपाची कामेदेखील संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असतात. आजवर १००० पेक्षा जास्त प्रकरणे या संस्थेच्या माध्यमातून सोडविण्यात आली आहेत.


यापूर्वी असा काही टोल फ्री क्रमांक आहे, हेच नागरिकांना माहीत नसल्याने फारसे दूरध्वनी येत नसत. मात्र, आता या कार्यालयात दूरध्वनी येत आहेत. क्रमांक फिरविल्यावर तो दूरध्वनी संस्थेच्या चाइल्डलाईनच्या मुंबई येथील कार्यलयात जातो. तेथून शहरात तत्काळ माहिती पुरविली जाते व चाइल्डलाईनचा चमू तेथे पोहोचत तत्काळ संबंधित मुलास मदत देऊ करतात. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर १२ कर्मचारी तैनात असून त्यात स्वयंसेवक, समुपदेशन, टीम मेंबर, संचालक, समन्वयक यांचा समावेश आहे. नवजीवन फाऊंडेशन या संस्थेचे संचालक महेंद्र विंचूरकर हे रेल्वे चाइल्डलाईनच्या कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करत असतात. या संस्थेची रेस्क्यू व्हॅन असून तिच्यामार्फत मुलांना घरापर्यंत मदत पोहोचविली जाते. तसेच, हरवलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यापर्यंत संस्था कार्यरत असते. याकामी रेल्वे पोलीस दल, शहर व ग्रामीण पोलीस, महिला व बालकल्याणसंबंधी कार्य करणारी शासकीय आस्थापने यांचे मोलाचे सहकार्य रेल्वे चाइल्डलाईनला प्राप्त होत असते. तसेच, लहानग्या मुलांकडून माहिती प्राप्त होण्यात अडचणी निर्माण होतात. त्यावेळी जाहिरात देत त्या मुलांच्या पालकांचा शोध घेतला जातो. नाशिकमध्ये परराज्यातील किंवा परशहरातील मुले आढळून आल्यास त्यांच्या शहरातील चाइल्डलाईनशी संपर्क साधत या मुलांच्या पालकांचा शोध घेतला जातो.


या क्षेत्रात काम करत असताना अनेकदा हृद्य अनुभव आल्याचे सुवर्णा वाघ आवर्जून नमूद करतात. त्या सांगतात की,“एका मुलाच्या आईची हत्या त्याच्या वडिलांनी केली होती. त्यामुळे त्या मुलाचे वडील कारागृहात होते. तीन ते साडेतीन वर्षांचा असणारा तो मुलगा त्याच्या आत्याकडे राहत होता. मात्र, आत्याच्या घरात त्या मुलाकडे कोणतेही लक्ष दिले जात नव्हते. त्याचे कपडे फाटलेले असत. अंगात केवळ एक शर्ट अशा अर्धनग्न अवस्थेत एक मुलगा भेदरलेल्या अवस्थेत बसून असल्याचे संबंधित पोलीस स्थानकास कोणीतरी कळवले. ते अतिशय थंडीचे दिवस होते. अशा स्थितीत तो मुलगा संपूर्ण ओला होऊन एका पाण्याच्या टाकीजवळ बसलेला आढळून आला. त्याच्या पार्श्वभागावर अनेक जखमा झालेल्या होत्या. तेथे जवळ त्याची आत्या, आत्याची मुले ही घरात बसलेली होती. मात्र हा बाहेर आणि तोही अशा स्थितीत हे पाहून डोळ्यात अश्रू तरळल्याचे वाघ सांगतात. पोलिसांनी आत्याला समज देत त्या मुलाला त्याच्या आजी-आजोबांच्या हवाली केले. चाइल्डलाईनमार्फत या प्रकरणाचा अनेकदा मागोवा घेण्यात आला व तो मुलगा आत उत्तम स्थितीत असल्याचे वाघ सांगतात.


काही विशिष्ट प्रकरणांत साधारण सहा महिने किंवा प्रसंगी त्यापेक्षा जास्त काळ मुलांचा फॉलोअप घेतला जातो. रेल्वे चाइल्डलाईन सुरू झाल्यापासून म्हणजेच मागील चार ते पाच महिन्यांत रेल्वेस्थानकावर भरकटलेली ७० च्या आसपास मुले ही पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.


साधारणत: घरातील ज्येष्ठांनी ओरडणे, मुंबई मायानगरीचे आकर्षण, हट्ट न पुरविला जाणे, अमली पदार्थांच्या सेवनाची सवय जडणे आदींसारख्या कारणाने ही मुले परागंदा होत असल्याचे दिसून येते, तर काही वेळा प्रेमविवाह करण्यासाठीदेखील मुले-मुली पळून येत असतात. १८ वर्षांखालील अशा कोणत्याही प्रकरणात चाइल्डलाईन मार्फत मदत केली जाते. यासाठी रेल्वे चाइल्डलाईनचे कर्मचारी सातत्याने नाशिकरोड स्थानकाच्या फलाटावर चक्कर मारत असतात. दिसणार्‍या मुलांशी चर्चा करतात. त्यातील काही मुले ही कायमच रेल्वेस्थानकावर असल्याने त्यांचे कर्मचारी समुपदेशन करत असतात. अमली पदार्थांची सवय या मुलांना जडू नये यासाठी फलाट क्रमांक ४ वर विविध उपक्रमदेखील राबवत या मुलांना व्यस्त ठेवण्याचे काम रेल्वे चाइल्डलाईनचे कर्मचारी करत असतात. केवळ नोकरी म्हणून सुरू केलेलं काम सेवा वाटत आहे. प्रत्यक्ष काम सुरू झालं तेव्हा कळलं की, लहान मुलांवर किती आणि कसे अत्याचार होतात. आज त्यांचे अश्रू पुसण्याची संधी मिळत असल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया येथील कर्मचारी देतात. मुलांवरील अत्याचारास प्रतिबंध होणे आवश्यक आहे. या उद्देशाने कार्य करणारे हे कर्मचारी मुलांनी कोणतीही घटना ही आपल्या जवळच्या व्यक्तीला ताबडतोब सांगावी, हाच संदेश देत असतात.


लहान मूल, युवा पिढी म्हणजे देशाचे भविष्य गणले जाते. हे भविष्य सुरक्षित आणि सुस्थितीत राहावे यासाठी काम करणार्‍या संस्थेचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. आपणही लक्षात घेणे आवश्यक आहे की, अनुचित प्रकार घडत असल्यास १०९८ हा एक फोन जरूरी आहे.

@@AUTHORINFO_V1@@